एरव्ही मराठी माणसांना इतिहासामध्ये रमण्याची फार आवड असते. इतिहासाचे अवलोकन केले असता, प्रत्येक राजाने स्वतःच्या राज्यात काही किल्ले-बालेकिल्ले करून ठेवलेले दिसून येते. बालेकिल्ला म्हणजे असा किल्ला जो शत्रूला बळकावणे अशक्य असे.बालेकिल्ल्याच्या सभोवतालच्या परिसरामध्ये टेहळणी करण्यासाठी बुरूज असत आणि त्यावर असलेले सैनिक 24 तास परिसरावर नजर ठेवून असत. एवढ्यावर कोणी शत्रू आला तर त्याला बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश मिळणे सहजी शक्य नसे. अनेक चोरवाटा, अंधारवाटा आणि याउपर शत्रूने चुकून प्रवेश केला तरी तो कुठल्यातरी तलावात किंवा खंदकात जाऊन पडत असे. बालेकिल्ल्याला शत्रूने वेढा टाकला तर किमान सहा महिने पुरेल एवढी शिबंदी म्हणजेच अन्नधान्य आणि इतर साठा करून ठेवला जात असे. बालेकिल्ला हा अटीतटीचा प्रसंग आला तर राजाला सुरक्षित राहता यावे, यासाठी पण असे.
काळ बदलला तसे आणि लोकशाही प्रणाली स्वीकारल्यानंतर राजकीय नेत्यांनी आपापले मतदारसंघ किल्ल्यासारखे तयार केले. अमुक जिल्हा म्हणजे तमुक नेत्याचा बालेकिल्ला असे म्हटले जाते. विशिष्ट तालुका म्हणजे एखाद्या प्रमुख नेत्याचा बालेकिल्ला अशा प्रकारच्या घोषणा नेहमी होत असतात. समजा, एखाद्या नेत्याच्या मतदारसंघातील नेत्याच्या पक्षाचे काही लोक दुसर्या पक्षात गेले तर ‘बालेकिल्ल्याला खिंडार’ अशा बातम्या पत्रकार मंडळी देत असतात. एखाद्या नेत्याचा एखादा जिल्हा बालेकिल्ला असेल तर बाजूच्या जिल्ह्यामध्ये असणारा विरोधी नेता मूळ जिल्ह्यातल्या नेत्याला शह देण्यासाठी अचानक बालेकिल्ल्यात सक्रिय होतो, तेव्हा ‘बालेकिल्ल्यात नेत्यांना धक्का’ अशा प्रकारच्या बातम्या लागतात. एकंदरीत पूर्वीच्या राजांसारखे आपापले मतदारसंघ बालेकिल्ल्यासारखे करण्याचा प्रयत्न नेते करतात. इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणतात, ती हीच. बालेकिल्ला जिंकण्यासाठी पूर्वीसारखेच प्रयत्न केले जातात.
या द़ृष्टीने आजही राजकारणामध्ये गुप्तहेर पेरले जातात. बरेचदा एखाद्या नेत्याचा चक्क उजवा हातच त्याला सोडून विरोधी पक्षात सामील होतो, तेव्हा तो बालेकिल्ल्याची सगळी गुपिते घेऊन बाहेर पडलेला असतो. अशा प्रकारे एकमेकांचे बालेकिल्ले हस्तगत करण्याची स्पर्धा म्हणजेच ‘लोकशाही’ असे म्हणता येईल. आजकाल कोणताही विशिष्ट मतदारसंघ किंवा जिल्हा विशिष्ट नेत्याचा बालेकिल्ला राहिलेला नाही. विधानसभा निवडणुका मतदार संघातून सलग अनेक पंचवार्षिक निवडून आलेल्या आमदारांना गत विधानसभा निवडणुकीत पराभवाची धूळ चाखावी लागली आहे. बालेकिल्ले उद्ध्वस्त होत राहतील, नेते पण येत-जात राहतील. या सर्वांपेक्षा लोकशाही यंत्रणा मजबूत होणे, जास्त महत्त्वाचे आहे.