Balendra Shah Pudhari
संपादकीय

Balendra Shah: बालेंद्र शाह

35 वर्षीय बालेंद्र शाह, ज्यांना नेपाळची जनता प्रेमाने ‌‘बालेन‌’ म्हणून ओळखते, त्यांनी नेपाळच्या प्रस्थापित आणि सरंजामी राजकारणाला धक्का दिला आहे

पुढारी वृत्तसेवा
मुरलीधर कुलकर्णी

काठमांडूच्या गजबजलेल्या रस्त्यांवर एकेकाळी भष्टाचाराविरुद्ध रॅप गाणी गाणारा एक तरुण आज जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक असलेल्या नेपाळची धुरा सांभाळायला सज्ज झाला आहे. 35 वर्षीय बालेंद्र शाह, ज्यांना नेपाळची जनता प्रेमाने ‌‘बालेन‌’ म्हणून ओळखते, त्यांनी नेपाळच्या प्रस्थापित आणि सरंजामी राजकारणाला असा धक्का दिला आहे की, ज्याची चर्चा आता केवळ हिमालयाच्या पायथ्याशीच नव्हे, तर दिल्ली आणि बीजिंगपर्यंत होत आहे.

बालेन शाह यांचा हा प्रवास कोणत्याही चित्रपट कथेला साजेसा असाच आहे. दि. 27 एप्रिल 1990 रोजी काठमांडूमध्ये जन्मलेल्या बालेन यांचे मूळ मधेस प्रांतातील महोत्तरी जिल्ह्यात आहे. त्यांचे वडील डॉ. राम नारायण शाह हे आयुर्वेद तज्ज्ञ होते, ज्यांच्याकडून बालेन यांना समाजसेवेचे बाळकडू मिळाले. प्राथमिक शिक्षण नेपाळमध्ये पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी भारताची वाट धरली. कर्नाटकातील विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये एम.टेक. पूर्ण केल्यामुळे त्यांच्याकडे विज्ञानाची दृष्टी आणि नियोजनाचे कौशल्य आले. हेच कौशल्य पुढे त्यांच्या राजकीय कारकिर्दीत मैलाचा दगड ठरले.

राजकारणात येण्यापूर्वी बालेन हे नेपाळमधील तरुण पिढीचे ‌‘आयकॉन‌’ होते. ‌‘नेफ-हॉप‌’ (नेपाळी हिप-हॉप) क्षेत्रात त्यांनी आपल्या धारदार शब्दांनी व्यवस्थेवर प्रहार केले; मात्र केवळ गाणी गाऊन बदल घडणार नाही, हे उमजल्यावर त्यांनी 2022 मध्ये काठमांडू महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केली. कोणतीही मोठी राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांना धूळ चारली आणि काठमांडूचे महापौर झाले. महापौर म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा धडाका आणि शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी घेतलेले धाडसी निर्णय यामुळे त्यांची लोकप्रियता नेपाळच्या कानाकोपऱ्यांत पोहोचली. जानेवारी 2026 मध्ये त्यांनी महापौरपदाचा राजीनामा देऊन ‌‘राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी‌’मध्ये प्रवेश केला आणि नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला.

बालेन शाह यांचे पंतप्रधान होणे हे भारत-नेपाळ संबंधांसाठी एक नवीन वळण ठरणार आहे. ते स्वतः मधेसी समुदायाचे असून मैथिली भाषिक आहेत, ज्यामुळे उत्तर भारताशी त्यांचे भावनिक आणि सांस्कृतिक नाते जोडलेले आहे. भारतामध्ये शिक्षण घेतल्यामुळे त्यांना भारतीय समाज आणि प्रशासनाची जवळून ओळख आहे; मात्र बालेन हे अत्यंत बाणेदार आणि प्रखर राष्ट्रवादी नेता म्हणून ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी अनेकदा नेपाळच्या सार्वभौमत्वाच्या मुद्द्यावरून भारताच्या काही धोरणांवर जाहीर टीका केली आहे. त्यामुळे ते पंतप्रधान झाल्यावर भारत आणि नेपाळमधील ‌‘रोटी-बेटी‌’चे नाते अधिक घट्ट करतील की नेपाळच्या हितासाठी काही कठोर भूमिका घेतील, याकडे दक्षिण आशियाचे लक्ष लागले आहे.

बालेन शाह नेपाळमधील बदलत्या राजकीय मानसिकतेचे प्रतीक आहेत. जुन्या पिढीतील कम्युनिस्ट आणि काँग्रेस नेत्यांच्या राजकारणाला कंटाळलेला नेपाळी तरुण आज बालेन यांच्या रूपाने आपला नवा नायक पाहत आहे. एका हातात इंजिनिअरिंगचा प्लॅन आणि दुसऱ्या हातात जनतेच्या प्रश्नांची जाण घेऊन निघालेला हा तरुण नेता नेपाळला प्रगतीच्या कोणत्या शिखरावर नेतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT