बकरी ईद विशेष Pudhari File Photo
संपादकीय

Bakri Eid Special | त्याग आणि मानवतेचा संदेश

पुढारी वृत्तसेवा

शफीक देसाई

प्रेषित हजरत इब्राहिम (अ.) यांचे जीवन हे त्याग, समर्पण, एकेश्वरवाद आणि मानवतेच्या सेवेसाठी दिलेल्या संघर्षाचे अद्वितीय उदाहरण आहे. ईद-ए-कुर्बानीच्या माध्यमातून त्यांच्या बलिदान, श्रद्धा आणि विश्वबंधुत्वाच्या संदेशाचे स्मरण केले जाते.

आज ज्यांची आठवण आणि स्मरण म्हणून ईद- ए-कुर्बान (ईद-उल-अजहा) साजरी करतो, ते प्रेषित म्हणजे हजरत इब्राहिम (अ.) हे अनेक वंशाचे मूळ पुरुष आहेत. त्यांच्या व त्यांच्या मुलांचा वारसा अनेक धर्म संस्कृतीचे मूळ आहे. ते एकेश्वरवादाचे पुरस्कर्ते होते. एक परमेश्वरावरील निस्सीम भक्ती, एकेश्वरवादाच्या प्रसारासाठी केलेला त्याग व समर्पण आणि मानवतेसाठी केलेली नि:स्पृह सेवा याचे एक अद्वितीय उदाहरण म्हणजे प्रेषित हजरत इब्राहिम अलै. सलाम होय. म्हणूनच त्यांना ‘खलिलुल्लाह’ म्हणजे ‘परमेश्वराचा मित्र’ ही पदवी बहाल केली. त्यांनी दाखवलेल्या अद्भुत त्याग, बलिदान, सेवा, समर्पणाचे स्मरण एक सण व उत्सव म्हणून साजरा केला जातो. अर्थात, या मानवतेच्या कार्यामध्ये अनेक प्रेषितांनी आपले जीवन समर्पित केले. अशा प्रेषितांचीही आठवण आपण यानिमित्ताने करतो.

प्रेषित हजरत इब्राहिम (अ.) यांनी परमेश्वराच्या गौरवार्थ अंधश्रद्धा व कर्मकांडाला प्रखर विरोध केला. यातील अज्ञान, पोकळपणा अशिष्ट, अपरिपक्व व अशुद्ध भक्तीचे स्वरूप स्पष्ट केले. तत्कालीन समाज, राजसत्ता व जुलमी राजा नमरूद, जो स्वतःलाच देव समजत होता त्यांना एकेश्वरवादाचे आवाहन केले. त्यांचे वडील स्वतः मूर्तिकार व मूर्तिपूजक होते. या सर्वांनी त्यांचा विरोध व छळ केला. वडील अनेक मूर्ती बनवायचे. घरातच अनेक लहान-मोठ्या मूर्ती असल्याने प्रेषित लहानपणी त्यांच्याभोवती खेळायचे. त्यांचे अवलोकन करायचे. वडिलांना अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडायचे. मूर्ती काही बोलत नाहीत. हालचाल करत नाहीत. काही खातपीत नाहीत, तर या मूर्ती आपले कसे काय भले करणार, असे प्रश्न विचारायचे. वडील रागावून त्यांना गप्प करत. एकदा त्यांनी कुर्‍हाडीच्या सहाय्याने लहान मूर्तींना हानी पोहोचवली व ती कुर्‍हाड त्यांनी मरदुख नावाच्या मोठ्या मूर्तीच्या खांद्यावर ठेवली. वडिलांनी हा सगळा प्रकार पाहिला आणि संतापले; परंतु प्रेषितांनी कुर्‍हाडधारी मोठ्या मूर्तीकडे बोट दाखवले.

पुढे अनेक अंधश्रद्धा, कर्मकांड, भोंदूगिरी अशा रीतीरिवाजविरुद्ध प्रचार आणि प्रबोधन सुरूच ठेवले. यामुळे मूर्तिपूजक वडिलांचा विरोध व रोष पत्करावा लागला. वडिलांनी त्यांना दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला. स्वयंघोषित देव, जुल्मी राजा नमरूदची जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार प्रेषितांना व समाजाला सहन करावा लागला. बादशहाने त्यांना आगीत लोटून मारायचा प्रयत्न केला; परंतु ते सुदैवाने सहीसलामत सुटले. अज्ञान, अंधकारात खितपत पडलेल्या समाजाची अधोगती त्यांना पाहवत नव्हती. धर्म आणि उपासना पद्धती कोणतीही असो, त्यामध्ये मानवी हित व कल्याण, मानवतेचा अंश नसेल, तर तो धर्म कुचकामी ठरेल. सच्च्या धार्मिक माणसाची खरी बांधिलकी शाश्वत जीवनमूल्ये आणि मानवतेशी असते ना की रितीभाती, कर्मकांड व अंधश्रद्धेशी असते. पूजाअर्चा व उपासनेचे अवडंबरही नसते. कोणताही दिखावा नसतो. पुढे टोकाच्या संघर्षामुळे त्यांनी देशत्याग केला. मक्केत येऊन त्यांनी मुलगा हजरत इस्माईल अलै. सलाम यांच्या मदतीने काबागृहाचे पुनर्निर्माण केले. देश, समाज आणि मानवतेसाठी न भूतो न भविष्यति अशाप्रकारचा त्याग, बलिदान, सेवा, समर्पणाचे उदाहरण म्हणजे प्रेषित हजरत इब्राहिम अलै. सलाम यांचे जीवन व कार्य होय. त्यांना व त्यांच्या तिन्ही मुलांना प्रेषित्व प्राप्त झाल्याचे हे इतिहासातील एकमेव उदाहरण आहे.

कोणत्याही धर्माची आजच्या लोकशाही मूल्य व्यवस्थेशी सांगड जुळत नसेल, तर तो धर्म कालबाह्य आणि अप्रस्तुत आहे. त्यामुळे धर्माने ठोकळेबाजपणा आणि कट्टरता न जोपासता उदार मानवी मूल्ये, आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, सर्वसमावेशक प्रगती व विकास यांची कास धरावी, तरच तो शाश्वत व चिरंतन होईल. धर्माच्या बाबतीत कोणतीच जोरजबरदस्ती उपयोगाची नाही. दया, क्षमा, शांती, परोपकार आणि मानवता हा धर्माचा पायाभूत आधार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT