पुढारी तडका आर्टीकल Pudhari File Photo
संपादकीय

बिबट्यांनो परत फिरा रे..!

छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन बिबट्यांनी धुमाकूळ

पुढारी वृत्तसेवा

मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या चार-पाच दिवसांत दोन बिबट्यांनी धुमाकूळ घातलेला आहे. बिबट्या हा निशाचर प्राणी असल्यामुळे रात्रीच्या वेळी तो सक्रिय होतो आणि पहाटेपर्यंत भक्ष्याच्या शोधात फिरत राहतो. विदर्भात भरपूर जंगल आहे. त्यामुळे कधी शहरात, कधी जंगलात असे करत बिबट्यांना उदरनिर्वाहाची काळजी करण्याची गरज पडली नसती. बिबट्या पहिल्यांदा या शहरात दिसला तो भल्या पहाटे फिरायला जाणार्‍या लोकांना. पहाटेच पाच वाजता तयार होऊन टी-शर्ट, स्पोर्टस् शूज आदी घालून बाहेर पडलेल्या लोकांना त्याचे प्रथम दर्शन झाले. साहजिकच दुसर्‍या दिवशीपासून लोक सावधगिरीने सकाळी फिरायला लागले. जीवावर आल्यासारखे आणि डॉक्टरांनी सांगितले म्हणून कसेबसे फिरायला जाणार्‍या लोकांनी तत्काळ सकाळच्या प्रभातफेरीचा उपक्रम बंद करून टाकला. सहाजिकच आहे. जीव वाचला तरच कोलेस्ट्रॉल कमी करता येईल आणि हृदयविकाराचा धोका टाळता येईल; पण बिबट्याच्या हल्ल्यात जीवच गेला, तर कोलेस्ट्रॉल कितीही कमी असले तरी त्याचे काय करायचे, हा प्रश्न बर्‍याच लोकांच्या पुढे उभा राहिला.

अशीच काहीशी परिस्थिती रात्री पार्टी करून घरी उशिरा येणार्‍या लोकांची पण झाली. मित्रांबरोबर यथेच्छ पार्टी करून अस्वलासारखे झुलत झुलत घरी परतणार्‍या लोकांनी बिबट्याच्या दहशतीने जे काय अपेयपान करायचे ते घरीच करायला सुरुवात केली. यामुळे महिलावर्गाला मात्र सुखाची बरसात झाल्यासारखे वाटत असेल. पहिली गोष्ट म्हणजे, संध्याकाळच्या घातक वेळी नवरा डोळ्यांसमोर राहणार आहे म्हणून त्यांनी बिबट्याचे आभारच मानले असतील. दुसरी तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे देर राततक भटकत स्वतःच्या शरीराची हानी करून घेणारा नवरा निमूट घरी बसल्यामुळे महिलांचे कुंकू बळकट झाले म्हणूनही त्या बिबट्यांचे आभार मानत असतील. छत्रपती संभाजीनगरमधील महिलांनी बिबट्यांना या गावामध्ये नियमित फिरा, अशी विनंती केली, तर आश्चर्य वाटू देऊ नका.

ज्या गावातील वाहतूक व्यवस्था पूर्णत: कोलमडलेली आहे, ज्या गावांमध्ये मनपाच्या नळाला दहा -दहा दिवस पाणी येत नाही, ज्या गावात धुळीचे आणि दुर्गंधीचे साम—ाज्य पसरलेले आहे त्या गावांची निवड बिबट्याने करावीच का, असा प्रश्न उभा राहतो. दिवसा नाहीतर कमीत कमी रात्री फिरून तरी किमान पक्षी या अस्ताव्यस्त पसरलेल्या शहराला नियंत्रणात आणण्याचे काम बिबटे मंडळी करत आहेत, याबद्दल त्यांचे अभिनंदन! पिंजरे एका ठिकाणी लावलेले असताना तो संपूर्ण भाग वगळून बिबटे भलत्याच ठिकाणी सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहेत. छत्रपती संभाजीनगरात आल्यामुळे बिबट्यांनाही एक वाईट सवय लागलेली आहे असे दिसून येते. प्रोझोनसारख्या भल्या मोठ्या मॉलमध्ये चार तास विंडो शॉपिंग करून एकही रुपया खर्च न करता परत येताना मात्र शंभर रुपयाची भेळ खाऊन विंडो शॉपिंगचा आनंद घेण्याची प्रवृत्ती बिबट्यांमध्ये दिसून आलेली आहे. सीसीटीव्ही कॅमेर्‍यात एक बिबट्या मॉलमध्ये मनसोक्त फिरताना दिसला. समोर बिबट्या आला, तर काय करावे यासंदर्भात वन विभागाने काही मार्गदर्शक सूचना जनतेसाठी पाठविल्या आहेत. यातील महत्त्वाची सूचना म्हणजे बिबट्या समोर आला तर वाकू नका, अशी आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT