आंतरराष्ट्रीय क्षितिजावर ज्या मोजक्या महाराष्ट्रीय वैज्ञानिकांनी छाप सोडली, त्यातील एक म्हणजे महाराष्ट्र भूषण डॉ. जयंत नारळीकर. त्यांच्या निधनामुळे विज्ञानजगतात एक पोकळी निर्माण झाली आहे. डॉ. नारळीकर यांनी 1963 मध्ये प्रा. फ्रेड हॉईल यांच्या मार्गदर्शनाखाली खगोल भौतिकशास्त्रात मौलिक संशोधन करून विशेष गुणवत्तेसह डॉक्टरेट मिळवली. 1972 मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये अध्यापनाचे काम केले. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाचे राष्ट्रीय प्राध्यापक म्हणूनही काम केले. प्रा. हॉईल यांच्यासोबत केलेल्या क्वांटम इलेक्ट्रो डायनॅमिक्सवरील संशोधनाने त्यांना जागतिक कीर्ती मिळाली. ‘हॉईल-नारळीकर सिद्धांत’ म्हणून त्यांचे हे संशोधन प्रसिद्ध आहे. त्यामुळे गुरुत्वाकर्षणासंबंधीचा नवा सिद्धांत तयार झाला. त्याला ‘कन्फॉर्मल थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी’ म्हणून ओळखले जाते. तसेच नारळीकरांंनी भारतातील सहकार्यांसमवेत रेडिओ लहरी, गुरुत्वाकर्षण व अवकाश विज्ञानासंबंधीच्या अनेक संशोधनात भाग घेतला.
भौतिक आणि खगोल विज्ञानाच्या विकासासाठी पुण्यात आंतरविद्यापीठ स्तरावर खगोलशास्त्र व खगोल भौतिकशास्त्र केंद्र (आयुका) कार्यान्वित करण्यात नारळीकरांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यांचे विज्ञान संशोधन व प्रसारातील कार्य इतके मोठे आहे की, त्यांना प्रतिष्ठेचा ‘शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार’ तसेच युनेस्कोचा कलिंग पुरस्कारही मिळाला. ब्रिटनच्या रॉयल सोसायटीने त्यांना सन्माननीय सदस्यत्व दिले, तर कृष्णविवरासंबंधी नारळीकरांनी केलेले महत्त्वपूर्ण संशोधन मैलाचा दगड ठरले. वैज्ञानिक द़ृष्टिकोन जपावा आणि अंधश्रद्धा दूर व्हाव्यात, यासाठी नारळीकर धडपडत राहिले. इंग्रजी-हिंदीप्रमाणेच मराठीतील विज्ञान लेखनात त्यांचा फार मोठा वाटा आहे.
दि. 4 ऑक्टोबर 1957 रोजी सोव्हिएत रशियाने ‘स्पुटनिक-1’ हा जगाच्या इतिहासातील पहिला मानवनिर्मित उपग्रह पृथ्वीभोवतालच्या कक्षेत यशस्वीरीत्या सोडला. या घटनेने तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू प्रभावित झाले आणि अवकाश संशोधन क्षेत्रात कार्य सुरू व्हावे, याद़ृष्टीने त्यांनी देशातील अग्रणी वैज्ञानिकांना प्रोत्साहित केले. 1961 मध्ये अणुशक्ती विभागाचे संचालक डॉ. होमी भाभा यांच्याकडे अवकाश संशोधनाची जबाबदारी सोपवली. नवभारताच्या उभारणीसाठी ज्यांनी अशी अनेक स्वप्ने पाहिली, त्यामध्ये नारळीकरांचा समावेश करावा लागेल. त्यांचे वडील रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणितज्ज्ञ होते आणि केंब्रिजमधून शिकून आले होते. बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक पंडित मदनमोहन मालवीय यांनी त्यांना विद्यापीठात येण्याची आग्रहाची विनंती केल्यानंतर रँग्लर विष्णू हे तेथील गणित शाखेचे प्रमुख बनले. त्यामुळे जन्म कोल्हापुरातील असला, तरी ते वाराणसीतच वाढले. त्यांची आई सुमती याही संस्कृत विदुषी होत्या.
विज्ञानात बी. एस्सी.मध्ये ते प्रथम क्रमांकावर उत्तीर्ण झाले आणि केंब्रिजमध्ये त्यांनी उच्च शिक्षण प्राप्त केले. तेथेच रँग्लर ही पदवी आणि खगोलशास्त्राचे ‘टायसन मेडल’ त्यांना मिळाले. केंब्रिजच्या एका निबंध स्पर्धेत त्यांना व जगद्विख्यात वैज्ञानिक स्टिफन हॉकिंग यांना विभागून पुरस्कार मिळाला. खगोलशास्त्रात प्रथम क्रमांक मिळत राहिल्यामुळे केंब्रिजमध्ये त्यांना गुरूची निवड करण्याचीही संधी मिळाली. त्यामुळे हॉईल यांच्या हाताखाली त्यांना अध्ययन करता आले. पुढे त्यांच्यासमवेतच नारळीकरांनी जगद्विख्यात सिद्धांत मांडला आणि वयाच्या 26व्या वर्षी ‘पद्मभूषण’ हा किताब त्यांना मिळाला. हा सिद्धांत नेमका काय आहे, त्याबद्दल व एकूणच विज्ञानाबद्दल प्रबोधनपर अशी व्याख्याने देत त्यांनी भारतभ—मण केले. तेव्हा नारळीकरांच्या व्याख्यानांना तोबा गर्दी होत असे. चेन्नईत झालेल्या सभेस इतके लोक जमले की, सभेच्या अध्यक्षांनाच व्यासपीठावर येता आले नाही.
दिल्लीत ‘महाराष्ट्राचा चिंतामणी’ म्हणून ज्यांचा गौरव झाला, ते सी. डी. देशमुख हे नारळीकरांच्या सभेच्या अध्यक्षस्थानी होते. त्यावेळी गर्दी इतकी ओसंडून वाहू लागली की, कित्येक मान्यवरांना सभास्थानी शिरता आले नाही. इंदिरा गांधी यांनाही तेव्हा विंगेत उभे राहून भाषण ऐकावे लागले होते, अशी आठवण नारळीकर नेहमी सांगत असत. ‘आयुका’सारखी संस्था उभारण्यात नारळीकरांनी व्यवस्थापकीय कौशल्यही पणाला लावले आणि आज ही संस्था केवळ पुण्याचेच नाही, तर देशाचे भूषण ठरली आहे; मात्र वैज्ञानिक संस्थेत शास्त्रज्ञांना मतभेद व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असणे आवश्यक आहे. विदेशात विज्ञान संशोधन संस्थांत कोणते नवे संशोधन केले आहे, याला अधिक महत्त्व असते, असे नारळीकर म्हणत असत.
अध्ययनात फलज्योतिषशास्त्र हा विषय म्हणून घेण्याचे जेव्हा ठरत होते, तेव्हा त्यास प्रा. यशपाल व नारळीकर यांनी स्पष्टपणे विरोध केला होता. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यातही नारळीकरांनी वाटा उचलला होता. ज्या गोष्टी तपासून न पाहता मान्य केल्या जातात, त्या अंधश्रद्धा होत. प्रत्येक बाब तार्किकतेच्या कसोटीवर तपासून पहिली पाहिजे, हा त्यांचा आग्रह होता. आधुनिक जगात ज्ञान-विज्ञानाला महत्त्व आहे आणि म्हणूनच विज्ञानकथेच्या रूपाने विज्ञान प्रसार होईल, हे नारळीकरांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी ‘यक्षांची देणगी’ हा कथासंग्रह लिहिला. ‘उजव्या सोंडेचा गणपती’ ही त्यांची कथा विशेष गाजली. त्यांच्या या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. दुर्गा भागवत यांनी नारळीकरांच्या कथा लेखनाचे सर्वात आधी कौतुक केले.
‘अंतराळातील भस्मासुर’, ‘अंतराळातील स्फोट’, ‘टाईम मशिनची किमया’, ‘प्रेषित’, ‘वामन परत न आला’, ‘व्हायरस’, ‘अंतराळ आणि विज्ञान’, ‘आकाशाशी जडले नाते’, ‘गणितातील गमतीजमती’, ‘नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान’ अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांच्या दिवंगत पत्नी डॉ. मंगला नारळीकर या प्रसिद्ध गणिती. त्यांच्या समवेत नारळीकरांनी ‘नभात हसरे तारे’ हे पुस्तकही लिहिले. विदेशात असताना जगद्विख्यात लेखक ई. एम. फोर्स्टर हे त्यांचे शेजारी होते. फोर्स्टर यांची ‘पॅसेज टू इंडिया’ यासारखी पुस्तके प्रचंड गाजली. जयंत, मला तू विज्ञान समजावून सांग, असे नारळीकरांच्या सुमारे तिप्पट वयाचे फोर्स्टर त्यांना म्हणायचे. त्यानंतर फोर्स्टर यांनी ‘द मशिन स्टॉप्स’ नावाची अप्रतिम कथाही लिहिली. कीर्ती मिळवूनही डॉ. नारळीकर हे विनम—, निगर्वी आणि कमालीचे सच्चे होते. त्यांची विज्ञाननिष्ठा ही ध्रुव तार्याइतकीच अढळ होती.