इस्रायल आणि इराण संघर्षात अमेरिकाही सामील होऊ इच्छित आहे. याद़ृष्टीने हालचाली सुरू झाल्या असून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावरून तसे संकेतही मिळत आहेत. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर आणि ट्रम्प यांच्यात दुपारच्या मेजवानीचे आयोजन ही याद़ृष्टीनेच करण्यात आले होते. या भेटीत दोन्ही देशांचा स्वार्थ दडलेला असून एकीकडे अमेरिकेला तळ म्हणून पाकिस्तानचा वापर करायचा आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानला भारतावर दबाव आणण्यासाठी अमेरिकेला मदत करायची आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ या भारताच्या यशस्वी मोहिमेनंतर प्रथमच पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये दुपारच्या भोजनाच्या वेळी झालेल्या या भेटीला सर्वार्थाने महत्त्व असून ते जाणून घेणे क्रमप्राप्त आहे. इस्रायल-इराण संघर्षात अमेरिकेला हस्तक्षेप करण्याची तीव— इच्छा आहे, ही बाब लपून राहिलेली नाही. तथापि, मुनीर यांच्या भेटीतून याला पुष्टी मिळाल्याचे दिसून येते. अमेरिकेने या संघर्षात उडी घेतली, तर त्यांना पाकिस्तानच्या हवाई तळाची गरज भासणार आहे आणि म्हणूनच त्यांनी मुनीर यांच्या भेटीचा घाट घातला. एकप्रकारे या भेटीमागे प्रामुख्याने सामरिक कारणच होते. दुसरे म्हणजे रणनीतीचे. इराणविरोधात अमेरिका मैदानात उतरेल तेव्हा मुस्लीम देश एकत्र होण्याचा धोका आहे. अशावेळी पाकिस्तानला हाताशी धरल्याने त्याची तीव—ता कमी राहू शकते आणि याचा अमेरिकेला फायदा होईल. त्याचवेळी पाकिस्तान अमेरिकेसमवेत असल्याने मुस्लीम जग इराणच्या बाजूने नसल्याचाही संदेशही जगभरात जाईल. तिसरे कारण कूटनीतीचे. इराणमध्ये सत्तांतर झाल्यास नवीन शासकालाही मुस्लीम देशांची गरज भासणार आहे. अशावेळी पाकिस्तानला सोबत ठेवत अमेरिका या स्थितीचा लाभ घेण्याच्या तयारी करत आहे.
यानिमित्ताने एक गोष्ट स्पष्ट होते आणि ती म्हणजे, अमेरिकेने पाकिस्तानला कधीही शत्रू मानलेले नाही. पाकिस्तान हा प्रत्यक्षात अमेरिकेसाठी सामरिकद़ृष्ट्या महत्त्वाचा आणि फायद्याचा देश राहिला आहे. पाकिस्तानच्या भौगोलिक स्थितीचा अमेरिकेने अनेकदा फायदा उचलला आहे. शिवाय पाकिस्तान हा मुस्लीम देश असूनही एक कमकुवत देश असल्याने अमेरिकेला त्याला मुठीत घेणे सहज शक्य होत आले आहे. तो भारतासारखा सक्षम लोकशाहीप्रधान देश नाही. पाकिस्तानात लोकशाही पद्धतीतील निवडणुकांच्या माध्यमातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या हाती सत्तासूत्रे सुपूर्द केली जात असली आणि पंतप्रधानांसह मंत्रिमंडळाकडून राज्यकारभार पाहिला जात असला, तरी प्रत्यक्षात त्यांच्या निर्णय प्रक्रियेवर, धोरणांवर सर्वथा पाकिस्तानी लष्कराचा प्रभाव आणि दबाव असतो. त्यामुळे एकदा पाकिस्तानच्या सैन्याला ताब्यात घेतले की, मग तुम्हाला वाट्टेल तसे काम करून घेता येते. हेच अमेरिकेने ओळखलेले आहे. तसेच पाकिस्तानात लोकशाहीवादी नेत्यांना फारशी किंमत नाही आणि त्यांची आतापर्यंत कोणतीही ठोस भूमिका राहिलेली नाही. शिवाय अमेरिकेला टाळी दिल्याने पाकिस्तानच्या लष्कराला अनेक फायदे होतात. बक्कळ प्रमाणात पैसा, सैनिकी साहित्य मिळते. धार्मिक कट्टरतेच्या आधारावर पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांच्या तुकड्या तयार होत असल्या, तरी ज्या दहशतवाद्यांपासून अमेरिकेला धोका आहे, त्यांना पाकिस्तान सहजपणे हवाली करतो. अबोटाबाद येथील अमेरिकी सैनिकांनी लादेनविरोधात केलेली कारवाई हा त्याचाच परिपाक आहे. यावरून भारताच्या तुलनेत पाकिस्तानशी सौदेबाजी करण्यात अमेरिकेला सोपे जाते. त्यामुळे मुनीर आणि ट्रम्प यांची लंच डिप्लोमसी खळबळ उडविणारी नाही.
इराण आणि इस्रायल संघर्षात अमेरिकेने उडी घेतल्यास आणि या कारणामुळे अमेरिकाविरोधी वातावरण तयार झाल्यास पाकिस्तान त्यांच्या मदतीला धावून जाईल. यासाठी डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनाही पाचारण करू शकतात; परंतु प्रत्यक्षात पंतप्रधानांपेक्षा लष्करप्रमुख जनरल मुनीरच तेथे वरचढ असल्याने ते अधिक फायद्याचे राहू शकतात, हे अमेरिकेला ठाऊक आहे. म्हणूनच त्यांनी मुनीर यांच्याशी चर्चा केली.
सध्या दहशतवाद हा अमेरिकेच्या अजेंड्यावर नाही. आता त्यांचे ध्येय इराणला अण्वस्त्रसज्ज होण्यापासून रोखणे हे आहे. यासंदर्भात इस्रायलकडून वारंवार इशाराही दिला जात आहे. इराणला वेळीच आवरले नाही, तर तो अण्वस्त्रे तयार करून त्याचा वापर करू शकतो आणि ते जगासमोर मोठे संकट असेल, असे इस्रायलकडून सांगितले जात आहे. म्हणूनच इस्रायलकडून इराणवर सातत्याने हल्ले केले जात आहेत. सध्याची स्थिती पाहिली, तर सौदी अरेबियापासून ते कतार आणि पाकिस्तानपर्यंतचा प्रत्येक मुस्लीम देश हा इस्रायलवर नाराज आहे आणि ही बाब अमेरिका आणि इस्रायलला चांगलीच ठाऊक आहे. पाकिस्तानचे सैन्य अप्रत्यक्षपणे अमेरिकेची मदत करत असले, तरी पाकिस्तानच्या दूरचित्रवाणीवर नजर टाका. पाकिस्तानच्या वाहिन्यांवर इस्रायलविरोधात विखारी प्रचार केला जात आहे.
एकप्रकारे पाकिस्तानात विरोधाभासात्मक चित्र पाहावयास मिळत आहे. पाकिस्तानमध्ये श्रीमंतच नाही, तर गरीबदेखील इस्रायलच्या विरोधात आहेत; परंतु या देशाचे सर्वेसर्वा इस्राईलविरोधात भूमिका घेऊ शकत नाहीत. अमेरिका हा नेहमीप्रमाणे अनेक मार्गांनी पाकिस्तानचा वापर करेल आणि स्वत:चे हित साध्य करेल. पाकिस्तानच्या हवाई तळावर अमेरिकन विमान उतरतील, मुक्काम करतील, इंधन भरतील आणि हल्ल्यासाठी उड्डाणेही घेतील. याचा सारासार विचार करत मुनीर यांना भोजनाचे निमंत्रण दिले. ट्रम्प यांचे म्हणणे मान्य केल्याशिवाय मुनीर यांच्यासमोर दुसरा पर्याय नाही आणि त्यांचे म्हणणे ऐकण्यात स्वार्थही आहे. भारतीय उपखंडातील स्थितीची त्यांना चांगली जाणीव असून याकडे ते एक संधी म्हणून पाहत आहेत. अमेरिकेला आताच मदत केली, तर भारतावर दबाव आणण्यासाठी तो अमेरिकेकडे गळ घालू शकतो. भारत-पाकिस्तान यांच्यात अनेक मुद्द्यांवरून तणाव आहे आणि सध्या सर्वात महत्त्वाचा व कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे, सिंधू पाणी वाटप करार. आगामी काळात पाकिस्तान अमेरिकेला पुढे करत भारतावर चर्चा करण्यासाठी दबाव आणू शकतो. तसेच पाकिस्तानला यानिमित्ताने भारताविरोधात मुद्दे मांडण्याची संधी मिळाली आहे.