अष्टपैलू सूर लाभलेल्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधनामुळे भारतीय संगीत साम्राज्याच्या एका स्वरसम्राज्ञीचा अस्त झाला आहे. गेली आठ दशके त्यांनी आपल्या मनमोहक आणि अष्टपैलू सुरांनी कोट्यवधी रसिकांना मोहीत केले होते. गानसरस्वती लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रात झालेली पोकळी आशाताईंच्या निधनामुळे अधिकच गहिरी झाली आहे. या गुणवान बहिणींनी गेली अनेक वर्षे भारतीय संगीत सृष्टीची सेवा केली.
लता मंगेशकर यांच्यासारख दैवी प्रतिभेच्या गायिकेसमोर स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण करणे आशाजींसाठी अत्यंत अवघड गोष्ट होती, पण त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करून आपली वेगळी गायकी निर्माण केली आणि लता मंगेशकर यांच्या जोडीने आवर्जून त्यांचेही नाव घेतले जाऊ लागले. लता मंगेशकर ज्या प्रकारची गाणी गाऊ शकत नव्हत्या अशा प्रकारची गाणी आशा भोसले यांनी लीलया गायिली. कारकिर्दीच्या प्रारंभी लतादीदी लोकप्रिय होत असताना शमशाद बेगम, गीता दत्त या तगड्या गायिकांची स्पर्धा असल्याने आशा भोसले यांना मोठा संघर्ष करावा लागला, पण जेव्हा त्यांच्या आयुष्यात ओ. पी. नय्यर आणि एस. डी. बर्मन यांच्यासारखे संगीतकार आले, तेव्हा त्यांच्या गायकीला एक वेगळीच दिशा मिळाली आणि आघाडीच्या गायिकांमध्ये त्यांचे नाव घेतले जाऊ लागले. ओपींना लतादीदीच्या आवाजाचा वापर न करताही संगीत लोकप्रिय होऊ शकते हे दाखवून द्यायचे होते. यासाठी त्यांनी लता मंगेशकर यांना कधीही गाणे दिले नाही. त्यांनी आशा भोसले यांच्या आवाजालाच प्राधान्य देऊन आपले संगीत लोकप्रिय केले. ओ. पी. नय्यर, एस. डी. बर्मन आणि नंतरच्या कालावधीमध्ये आर. डी. बर्मन यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली आशा भोसले यांनी अवीट, अविस्मरणीय आणि अजरामर गाणी दिली.
क्लबमध्ये नाचणार्या हेलन किंवा बिंदू यांचा आवाज म्हणून आशा यांच्यावर शिक्का बसत असतानाच्या कालावधीमध्ये तो प्रयत्नपूर्वक दूर करत अनेक वेगळ्या प्रकारची गाणी देऊन त्यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटवला. संगीतकार खय्याम यांनी जेव्हा ‘उमराव जान’ चित्रपटासाठी आशा यांना गझल गाण्यासाठी करारबद्ध केले तेव्हा त्या स्वतः साशंक होत्या. कारण त्यांच्या नेहमीची आवाजाची पट्टी सोडून त्यांना दोन सूर खाली गायचे होते, पण प्रचंड मेहनत करून त्यांनी ही गाणी गायली आणि त्या मेहनतीबद्दलच त्यांना आणि संगीतकार खय्याम यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला. गद्य पद्धतीने लिहिलेल्या ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है’ या गाण्याला आर. डी. बर्मन यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली एक वेगळाच आवाज आशाजींनी दिला आणि आज ते गाणे एक ‘कल्ट साँग’ ठरले आहे. या गाण्यासाठीही त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पडद्यावर कोणती नायिका आहे याचा विचार करून आवाजात बदल केल्यामुळेच त्यांनी गायलेली गाणी पाहताना रसिक प्रेक्षक रमून जातात. सिनेसंगीताचे विश्व त्याकाळी आजच्याइतके प्रगत नव्हते. अशा काळात नायिकेच्या आवाजाशी साधर्म्य राखणार्या स्वरात गीतातील आशय संगीतकाराने लावलेल्या चालीतून उतरवताना त्यातील माधुर्य, अवीटपणा आणि सुश्राव्यता जपण्याचे कसब आशा भोसले यांच्यासारखे फार कमी गायिकांमध्ये दिसते. शंभर वर्षांपेक्षा जास्त इतिहास असलेल्या भारतीय संगीत क्षेत्राचा विचार केला तर सर्वात लोकप्रिय गाण्यांच्या यादीमध्ये आशा भोसले यांच्या अनेक गाण्यांचा समावेश करता येतो.
2011 मध्ये गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस्ने त्यांना जगातील सर्वात जास्त रेकॉर्डिंग केलेल्या कलाकार म्हणून गौरवले. ‘दम मारो दम’ किंवा ‘पिया तू अब तो आजा’ यांसारख्या गाण्यांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या गळ्याची जादू किती विलक्षण आहे याचे दर्शन सर्वांना घडवले. ‘नया दौर’ मधील ‘उडे जब जब जुल्फें तेरी’ असो किंवा ‘हावडा बि-ज’मधील ‘आईये मेहरबान’मधील त्यांच्या आवाजातील मादकता आणि लचक आजही प्रेक्षकांना भुरळ घालते. सध्या गाजत असलेल्या ‘धुरंधर’ चित्रपटामध्ये आशाजींच्या काही जुन्या गाण्यांचा वापर झाला आहे. त्यांना ‘क्वीन ऑफ इंडिपॉप’ म्हणून ओळखले जात होते. आपल्या 80 वर्षांच्या प्रदीर्घ गायन प्रवासात मधुबाला, वैजयंतीमाला यांसारख्या जुन्या अभिनेत्रींप्रमाणेच ‘रंगिला’मध्ये उर्मिला मातोंडकरला सुद्धा त्यांनी आवाज दिला. केवळ हिंदीच नव्हे तर भारतातील अनेक भाषांमध्ये त्यांनी मुक्तपणे कारकीर्द घडवली. मूळ मराठी असल्यामुळे भक्तिगीते, मराठी गझल, भावगीते, नाट्यगीते आणि चित्रपट गीते यांचा एक खजानाच त्यांनी निर्माण करून ठेवला.
वैयक्तिक आयुष्यातील चढ-उतारांमुळे त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. दुसरीकडे व्यावसायिक पातळीवरही स्पर्धा करावी लागली; पण प्रचंड मेहनतीने त्यांनी आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली. एकाच घरातील कलाकारांची नेहमीच तुलना होते. श्रेष्ठ-कनिष्ठ यावरून वादविवाद केला जातो. असा संघर्ष आशाजींच्या वाट्यालाही आला; पण नंतरच्या कालावधीमध्ये लता आणि आशा या बहिणींना एकाच मोजपट्टीमध्ये मोजले जाऊ लागले. स्वतःच्या अष्टपैलू गायकीच्या बळावर स्त्री गायकांमध्ये त्यांनी स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले. वैयक्तिक आयुष्यसुद्धा त्या मोठ्या हिंमतीने जगल्या. स्टेज शो असो किंवा स्वतःच्या नावाची रेस्टॉरंटची साखळी निर्माण करणे असो किंवा एखाद्या कार्यक्रमाला गेल्यावर उत्स्फूर्त संवाद असो, आशाजींनी नेहमीच प्रत्येक ठिकाणी आपला अमिट ठसा उमटवला. या महान गायिकेला दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मात्र कोणत्याही पुरस्कारापेक्षा अधिक मोठा सन्मान म्हणजे रसिक श्रोत्यांच्या मनातील त्यांचे अढळ स्थान. भारतीय संगीतसृष्टीचा समग्र इतिहास लिहिला जाईल तेव्हा त्या इतिहासातील अनेक पाने निश्चितच त्यांच्यासाठी समर्पित केली जातील. रसिकश्रोत्यांचे मन अतृप्त ठेवून ही स्वरआशा दूरच्या प्रवासाला निघून गेली. या अष्टपैलू स्वरसम-ाज्ञीला आदरांजली!