Future Technology AI | तंत्रज्ञानातील क्रांतीचे वर्ष 
संपादकीय

Future Technology AI | तंत्रज्ञानातील क्रांतीचे वर्ष

पुढारी वृत्तसेवा

शहाजी शिंदे, संगणक अभियंता

मावळते वर्ष हे टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातील अनेक उपलब्धींचे वर्ष म्हणून इतिहासात नोंदवले जाईल. कृत्रिम बुद्धिमत्तेने ‘भविष्यातील तंत्रज्ञान’ ही ओळख मागे टाकत ‘वर्तमानातील वास्तव’ असे स्वरूप धारण केले. संधी वाढल्या; पण सामाजिक आणि नैतिक जबाबदार्‍यांचे ओझेही वाढले.

मानवी संस्कृतीच्या इतिहासात काही वर्षे ही केवळ कालगणनेचा भाग न राहता एका नव्या युगाची नांदी ठरतात. 2025 हे अशाच एका तांत्रिक क्रांतीचे साक्षीदार वर्ष ठरले आहे. मावळते वर्ष तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या इतिहासातील निर्णायक टप्पा म्हणून नोंदले जात आहे. दैनंदिन जीवन, प्रशासन, अर्थव्यवस्था आणि जागतिक सत्तासंतुलन यावर खोलवर परिणाम करणारे हे वर्ष ठरले. भारतापासून ते संपूर्ण जगापर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता, अर्धवाहक तंत्रज्ञान, पाचवी आणि सहावी पिढीची दूरसंचार प्रणाली, हरित तंत्रज्ञान, अंतराळ तंत्रज्ञान आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा हे धोरण आणि विकासाचे केंद्रबिंदू बनले. कृत्रिम बुद्धिमत्तेने ‘भविष्यातील तंत्रज्ञान’ ही ओळख मागे टाकत ‘वर्तमानातील वास्तव,’ असे स्वरूप धारण केले.

जनरेटिव्ह एआय आता केवळ मजकूर लेखन किंवा चॅटबॉटपुरते मर्यादित राहिलेले नाही. आरोग्यसेवेमध्ये रोगांचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान करणे असो, शेतीमधील पिकांचा अंदाज वर्तवणे असो किंवा न्यायव्यवस्थेतील दस्तऐवजांचे विश्लेषण असो, एआयचा शिरकाव सर्वव्यापी झाला आहे. भारतात सरकारी योजनांचे संनियंत्रण, डिजिटल शिक्षण आणि कौशल्यविकासामध्ये एआयचा वापर वेगाने वाढला. जागतिकस्तरावर एआयच्या नियमनाचा मुद्दा गाजला. युरोपियन युनियनने एआय कायद्याद्वारे यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला, तर अमेरिका आणि चीन यांच्यात या क्षेत्रातील नेतृत्वासाठी तीव- स्पर्धा पाहायला मिळाली. एआय जितके शक्तिशाली आहे, तितकीच मोठी जबाबदारी आणि नैतिकतेची गरज आहे, हा धडा 2025 ने जगाला दिला आहे.

हे वर्ष तांत्रिक आत्मनिर्भरतेला जागतिक पातळीवरील एक महत्त्वाचा धोरणात्मक विषय म्हणून पुढे आणणारे ठरले. सेमीकंडक्टर आता केवळ इलेक्ट्रॉनिक घटक न राहता राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक सामर्थ्याचे प्रतीक बनले. भारताने अर्धवाहक म्हणजेच सेमीकंडक्टरनिर्मितीच्या दिशेने ठोस पावले उचलली. जगभरात अमेरिका आणि चीन यांच्यातील तांत्रिक स्पर्धा अधिक तीव- झाली. पुरवठा साखळीला मैत्रीपूर्ण देशांकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू झाला. येणार्‍या काळात तंत्रज्ञान केवळ बाजारपेठेचे नव्हे, तर भू-राजकारणाचेही प्रभावी हत्यार ठरणार असल्याचे संकेत या वर्षात मिळाले.

भारतासह अनेक देशांत पाचव्या पिढीचे दूरसंचार जाळे मोठ्या प्रमाणावर आकाराला आले. मात्र, खरा बदल त्याच्या वापरातून दिसून आला. स्मार्ट शहरे, दूरस्थ आरोग्यसेवा, औद्योगिक ऑटोमेशन आणि स्मार्ट गाव या संकल्पना प्रत्यक्षात उतरू लागल्या. भारतात 5-जीआधारित शिक्षण, शेतीविषयक सल्ला आणि दूरवैद्यकीय सेवा, यामुळे डिजिटल दरी कमी करण्याची आशा निर्माण झाली. जग सहाव्या पिढीच्या तंत्रज्ञानाच्या तयारीला लागले. वेग, अतिशय कमी विलंब आणि संशोधन प्रयोगांमधून पुढील दशक हे अतिजोडलेल्या समाजाचे असेल, याची चाहूल लागली. ग्रीन हायड्रोजनच्या निर्मितीमध्ये भारताने घेतलेली झेप ऐतिहासिक आहे. बॅटरी स्टोअरेज तंत्रज्ञानातील सुधारणांमुळे सौर आणि पवनऊर्जेची साठवणूक करणे आता अधिक स्वस्त झाले आहे. इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ आता केवळ शहरी भागापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरच्या विस्तारामुळे ती ग्रामीण भागातही पोहोचली आहे.

तंत्रज्ञानाच्या आघाडीवर 2025 मध्ये भारताची सर्वात मोठी ओळख डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमुळे निर्माण झाली. आधार, यूपीआय, डिजिलॉकर आणि खुल्या डिजिटल मंचांमुळे देशांतर्गतच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारत एक आदर्श म्हणून पुढे आला. तंत्रज्ञानाच्या लोकशाहीकरणाचा विचार केला, तर भारताचे ‘डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर’ (डीपीआय) हे जगासाठी अभ्यासाचा विषय ठरले आहे. यूपीआयच्या यशाने जागतिक आर्थिक संस्थांना अचंबित केले असून, 2025 मध्ये अनेक युरोपिय आणि आग्नेय आशियाई देशांनी हे तंत्रज्ञान स्वीकारले आहे. केवळ आर्थिक व्यवहारच नव्हे, तर आरोग्यसेवांसाठी आभा कार्ड आणि शिक्षणासाठी अपार आयडी यासारख्या डिजिटल ओळखपत्रांमुळे नागरिकांचे जीवन सुसह्य झाले आहे. डेटाच्या देवाण-घेवाणीसाठी बनवलेले ओपन नेटवर्क जगाला एका नव्या दिशेने घेऊन जात आहे. यामुळे मक्तेदारी मोडीत निघून छोट्या उद्योजकांनाही मोठ्या प्लॅटफॉर्मवर समान संधी मिळत आहे.

भारतात खासगी अंतराळ स्टार्टअप्सनी उपग्रह, प्रक्षेपण याने आणि अंतराळ डेटाच्या विश्लेषणाच्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली. ‘इस्रो’च्या यशस्वी कामगिरीबरोबरच खासगी कंपन्यांच्या सहभागामुळे अंतराळ अर्थव्यवस्थेला नवी गती मिळाली. जागतिकस्तरावरही अंतराळ तंत्रज्ञान, क्वांटम संगणक आणि जैवतंत्रज्ञान या क्षेत्रांत स्टार्टअप्सनी हे सिद्ध केले की, नवोन्मेष आता केवळ सिलिकॉन व्हॅलीपुरता सीमित राहिलेला नाही.

मावळत्या वर्षाने काही अत्यंत कठीण प्रश्नही उपस्थित केले आहेत. स्वयंचलित यंत्रणांमुळे (ऑटोमेशन) रोजगारावर होणारा परिणाम हा चिंतेचा विषय बनला. आयटी क्षेत्रातील एंट्री लेव्हलच्या नोकर्‍या एआयमुळे कमी होत आहेत. यामुळे ‘रि-स्किलिंग’ म्हणजेच पुनर्कौशल्य आत्मसात करणे ही अनिवार्य बाब बनली आहे. डिजिटल असमानता ही अजून एक मोठी समस्या आहे. ज्यांच्याकडे तंत्रज्ञानाची उपलब्धता आहे आणि ज्यांच्याकडे नाही, अशा दोन वर्गांमधील दरी वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

सायबर सुरक्षेच्या क्षेत्रातही हे वर्ष आव्हानात्मक राहिले. रॅन्समवेअर हल्ले आणि वित्तीय फसवणुकीचे प्रकार अधिक जटिल झाले आहेत. क्वांटम कम्प्युटिंगच्या उदयामुळे प्रचलित एन्क्रिप्शन पद्धती मोडीत निघण्याची शक्यता निर्माण झाली असून, आतापासूनच ‘क्वांटम सुरक्षित’ सॉफ्टवेअर बनवण्याची गरज भासू लागली आहे. एकूणच पाहता, 2025 हे वर्ष तंत्रज्ञानाच्या महामार्गावरचा एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरले आहे. आपण अशा एका टप्प्यावर उभे आहोत जिथे तंत्रज्ञान हे केवळ साधन राहिलेले नाही, तर ते मानवी उत्क्रांतीचा पुढचा भाग बनले आहे. भारत आज या प्रवासात केवळ एक प्रवासी नसून एक चालक म्हणून जगाचे नेतृत्व करत आहे. तंत्रज्ञान हे वरदान ठरावे यासाठी आपल्याला त्याच्यासोबत विवेकाची आणि नैतिकतेची जोड देणे अनिवार्य आहे. मावळत्या वर्षाने आपल्याला हेच शिकवले आहे की, वेग महत्त्वाचा आहेच; पण दिशा त्यापेक्षा अधिक महत्त्वाची आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT