जिगरबाज सेनादलांनी पाकिस्तानचे जबर नुकसान केल्यानंतर कंबरडे मोडल्याची कबुली त्या देशाचे दुबळे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना द्यावी लागली. पाकिस्तान हा कसा दहशतवादाचा पोशिंदा आहे, हे सांगण्यासाठी आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देण्यासाठी जगातील प्रमुख देशांमध्ये खासदारांचे शिष्टमंडळ पाठवण्याचे सरकारने ठरवले आहे. माझ्यामुळेच भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध संपले, अशा वल्गना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्या आणि त्यानंतर त्या वक्तव्यावर पलटीही मारली. आपण भारताचे मित्र आहोत, असा ट्रम्प यांचा दावा असला, तरीही त्यांचा भर केवळ अमेरिकेचे हितसंबंध सुरक्षित करण्यावरच आहे. त्यामुळेच ‘अॅपल’ कंपनीने आपल्या स्मार्ट फोनचे भारतातील उत्पादन थांबवावे आणि ते अमेरिकेत सुरू करावे, अशी सूचना कंपनीचे मुख्याधिकारी टिम कुक यांना केल्याची माहिती ट्रम्प यांनी दिली आहे. टिम हे माझे मित्र असून, त्यांना मी नेहमीच चांगली वागणूक दिली आहे; पण ते आता भारतात निर्मिती क्षमता वाढवत असल्याचे समोर येत आहे. भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो.
माझ्या सूचनेनंतर आता अॅपलची अमेरिकेतील निर्मिती क्षमता वाढवली जाणार आहे, असेही ट्रम्प यांनी ठोकून दिले. अमेरिकेतील उत्पादन क्षमता वाढवण्याबद्दल कुक यांनी जाहीरपणे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. तसेच प्रत्यक्षात अॅपलने भारतातील गुंतवणूक कमी करणार नसल्याची ग्वाही भारत सरकारला दिली आहे. थोडक्यात, अॅपलने ट्रम्प यांच्या मागणीला केराची टोपली दाखवली आहे. उलट भारतात आणखी मोठी निर्मिती सुविधा स्थापण्याचा अॅपलचा विचार आहे. अॅपलने चीनमधील उत्पादन घटवण्याचा निर्णय घेतला असून, हा व्यवसाय भारताकडे वळण्याच्या मार्गावर आहे. ट्रम्प यांच्यामुळे अॅपलने भारतातील उत्पादन समजा घटवले, तर त्याचा मोठा फटका येथील उत्पादन क्षेत्राला बसू शकतो.
अॅपलकडून भारतात आयफोनची निर्मिती केली जाते. जगभरातील एकूण आयफोन उत्पादनापैकी 15 टक्के आयफोन्स भारतात तयार होत आहेत. कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात दीड लाख कोटी रुपयांच्या आयफोन्सची निर्यात केल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली होती. अॅपल ही भारतातील सर्वात जास्त रोजगार निर्माण करणार्या कंपन्यांपैकी एक आहे. अॅपलमुळे देशात 2 लाखांची रोजगारनिर्मिती होत आहे. असे असताना अॅपलला भारतातील उत्पादन गुंडाळण्यास सांगणे, याचा अर्थ भारतातील नोकर्या घालवणे असा होतो. ट्रम्प यांनी स्वतःच्या देशाचे हित सांभाळताना दुसर्या देशाच्या मुळावर येण्याचे कारण नाही. अॅपलने भारतात दोन ठिकाणी टाटा इलेक्ट्रॉनिक्सला आणि एका ठिकाणी फॉक्सकॉन कंपनीला कॉन्ट्रॅक्ट-मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन्सचे काम दिले आहे. म्हणजे, या कंपन्या अॅपलसाठी भारतात फोन बनवून देतात.
कंपनीचे देशभरात 60 पुरवठादार असून, त्यामध्ये कास्टिंग आणि बॅटरीच्या उत्पादकांचाही समावेश आहे. याप्रकारे मोठ्या प्रमाणात अप्रत्यक्ष रोजगारही तयार होत आहेत. भारतात प्रचंड कर लावले जातात, अशी टीका ट्रम्प नेहमी करत असतात; पण भारताने या कंपनीला प्रचंड कर सवलतीची ऑफर दिली आहे. अमेरिका व चीन व्यापाराबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून, म्हणूनच कंपनीला चीनमधील 25 टक्के उत्पादन भारतासारख्या देशात स्थलांतरित करायचे आहे; पण गेल्या आठवड्यात अमेरिका आणि चीन यांनी परस्परांवर लावलेले उच्च कर हे कमी पातळीवर आणले आहेत. त्यामुळे परिस्थिती पुन्हा पूर्वीइतकी भारतासाठी अनुकूल राहिलेली नसली, तरीही केवळ कर आकारणी हा एकमेव मुद्दा नाही.
भारताने इलेक्ट्रॉनिक्समधील जागतिक उत्पादन केंद्र म्हणून स्थान मिळवण्यासाठी 2020 पासून पद्धतशीर योजना आखलेली आहे. पाच वर्षांपूर्वी भारताने स्मार्ट फोन्सच्या निर्मितीसाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना (पीएलआय) लागू केली. देशात उत्पादन व्हावे, यासाठी दिल्या जाणार्या अनुदानाची ही योजना. त्यामुळे ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे भारताने अस्वस्थ होण्याचे कारण नाही. वाढत्या पायाभूत व्यवस्था आणि ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’मध्ये होणारी प्रगती यामुळे जगभरातील उत्पादक देशाकडे आकर्षित झाले आहेत. शिवाय टिम कुक हे शेवटी भागधारकांना उत्तरदायी आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष काय म्हणतात, यापेक्षा कंपनीचा फायदा नेमका कशात, याचाच ते प्राधान्याने विचार करणार. चीन हुकूमशाही देश असून, त्या देशाच्या धोरणाबाबत कोणतीही शाश्वती देता येत नाही. त्यामुळे एकाच ठिकाणी निर्मिती करण्यापेक्षा अन्य देशांतही उत्पादन करणे, हे एकप्रकारे अॅपलच्या द़ृष्टीने जोखीम कमी करण्यासारखेच आहे. शिवाय भारताने फक्त अॅपलपुरता मर्यादित विचार करता कामा नये. शिवाय केवळ वस्तूंच्या जुळणीचे काम न होता, संपूर्ण उत्पादन व्हावे, याद़ृष्टीने वातावरण तयार करण्याची गरज आहे. वाहन व सुट्या भागांच्या क्षेत्रात भारताने अगोदरच किमया साधली आहे. हीच गोष्ट स्मार्ट फोन्स, संगणक आणि कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रात घडून यायला हवी.
चीनप्रमाणे भारतातही देशांतर्गत विशाल बाजारपेठ आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावरील (लार्ज स्केल) उत्पादनास वाव आहे. प्रचंड उत्पादन क्षमतेचे कारखाने प्रस्थापित झाले की, खर्चही तुलनेने कमी होतो. अॅपलने भारतात केवळ स्मार्ट फोन्स नव्हे, तर आपली अन्य उत्पादनेही येथेच निर्माण करावीत आणि सुटे भागही भारतातूनच विकत घ्यावेत, यासाठी केंद्र सरकारने योग्य ती पावले टाकली पाहिजेत. विदेशांतून जेवढी गुंतवणूक भारतात येईल, तिचे स्वागतच आहे. तंत्रकुशल तरुण-तरुणींच्या फौजा उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडत असून, त्यांना उत्तम दर्जाचा रोजगार मिळाला पाहिजे. जागतिक व्यापाराशी संतुलन राखण्यासाठी आणि तूट भरून काढण्यासाठी आवश्यक त्या धोरणाच्या दिशेने पडणारे सकारात्मक पाऊल स्वागतार्ह असले, तरी देशी उद्योग आणि उद्योजकांना तितकेच पाठबळ मिळणेही गरजेचे आहे. रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे, त्यासाठी पुढे येणार्या उद्योगांना खर्या अर्थाने ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’साठी अनुकूल वातावरण उपलब्ध करून देणे यासारखे मार्ग अवलंबले जातील, ही आशा!