Pahalgam Attack | दहशतवादाचा क्रूर चेहरा (Pudhari File Photo)
संपादकीय

Pahalgam Attack | दहशतवादाचा क्रूर चेहरा

पुढारी वृत्तसेवा

जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन पठार येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या नृशंस दहशतवादी हल्ल्याला वर्ष पूर्ण झाले. खरे पाहता भारताने इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या रूपाने दोन पंतप्रधान दहशतवादी हल्ल्यांमध्ये गमावले आहेत. त्यांतून राष्ट्रविरोधी कारवायांचा भेसूर चेहरा आपण पाहिला. अमेरिकेत वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या 9/11 च्या महाभयंकर हल्ल्यामुळे दहशतवादाचा भस्मासूर कुणालाही गिळंकृत करू शकतो, याची कल्पना जगाला आली. डॅनियल पर्लची हत्या, पेशावर येथे शाळेवरील दहशतवादी हल्यातील चिमुकल्यांचा मृत्यू, ‘चार्ली हेब्दो’ वरील हल्ला, आयसिसने घडवलेले मृत्युकांड यामधून दहशतवाद्यांचे वाढत चाललेले क्रौर्य आणि बदलती कार्यपद्धती याविषयी जग सजग झाले. पश्चिमी देश सुरुवातीला दहशतवादी हल्ल्यांकडे विभागीय समस्या म्हणून पाहत होते.

फ्रान्स, जर्मनी, ब्रिटनमध्ये झालेल्या भीषण हल्ल्यांनंतर ‘इस्लामफोबिया’ म्हणत त्यांनी दहशतावादाविरुद्ध रणशिंग फुंकले. ट्विन टॉवर्सवरील हल्ल्यांनंतर तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष जॉर्ज बुश यांनीही ‘क्रुसेड’ म्हणत धर्मयुद्ध ललकारले होते. पहलगाममधील हल्लाही धर्माची विचारणा करूनच झाला होता. त्यामागे भारतात धार्मिक द्वेष वाढवण्याची सुनियोजित रणनीती होती. प्रत्यक्ष युद्धात भारताला पराभूत करणे शक्य नाही, हे लक्षात आल्यानंतर पाकिस्तानने दहशतवादी कारवायांस सुरुवात केली. याला ‘प्रॉक्सी वॉर’ किंवा ‘छद्म युद्ध’ म्हणतात. वास्तविक, भारतात गेल्या 30-35 वर्षांत झालेले दहशतवादी हल्ले, त्यामध्ये पकडलेले संशयित, त्यांचे टार्गेट, दहशतवाद्यांना मदत करणारे स्लीपर सेल्स या सर्वांमध्ये विशिष्ट धर्माच्या लोकांचा सहभाग असल्याचे दिसत असूनही अमेरिकेप्रमाणे भारताने ‘धर्मयुद्ध’ म्हणून या प्रश्नाचा बभ—ा केला नाही. भारत सुरुवातीपासूनच दहशतवाद ही जागतिक समस्या आहे आणि तिचा बिमोड सामूहिकरीत्या करणे आवश्यक आहे, ही भूमिका मांडत आला आहे, तरीही 193 देश सदस्य असणार्‍या संयुक्त राष्ट्राला अद्याप दहशतवादाची परिपूर्ण व्याख्या करता आलेली नाही. कारण, प्रत्येक देश स्वहितसंबंधांतून दहशतवादाकडे पाहतो.

यामुळेच राष्ट्रांचा संरक्षण व्यवस्थांवरचा खर्च अब्जावधी डॉलर्सनी वाढूनही दहशतवादाचे आव्हान संपलेले नाही. पहलगाम हल्ल्यानंतर पाकला धडा शिकवण्यासाठी राबवलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ ही दहशतवादविरोधातील भारताची पहिली कारवाई नव्हती. यापूर्वी उरी हल्ल्यानंतरचा सर्जिकल स्ट्राईक, पुलवामा हल्ल्यानंतरचा एअरस्ट्राईक आणि अन्य अनेक कारवायांमधून भारताच्या जाँबाज जवानांनी पाकड्यांना धूळ चारली आहे; पण त्या कारवाया आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ यांमध्ये गुणात्मक फरक होता. भारत जगातील अत्यंत जबाबदार अण्वस्त्रधारी देश आहे, तरीही पाकिस्तानी लष्करी अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या अणुयुद्धासंदर्भातील इशार्‍यांचा भारत गांभीर्याने विचार करत आला. पहलगाम हल्ल्यानंतरही अशा धमक्या पाककडून दिल्या गेल्या; पण त्यांना भीक न घालता भारताने हे मिशन राबवले आणि केवळ पाकव्याप्त काश्मीरच नव्हे, तर कराची, इस्लामाबादसह पाकिस्तानातील एकही शहर भारतापासून सुरक्षित नाही, याची झलक दाखवून दिली. या ऑपरेशनने भारताला ‘न्यूक्लियरफोबिया’तून बाहेर काढले.

युद्ध संघर्षातील सर्व तपशील सार्वजनिक पटलावर येत नाहीत; पण तपशिलांपलीकडे पाकिस्तानचे भारतीय सैन्याने नुकसान केले आहे, हे निश्चित! वर्षभरात थंडावलेल्या पाकिस्तानी कारवाया ‘ऑपरेशन सिंदूर’ने काय साधले, याचे उत्तर देत आहेत. हल्ल्यानंतर काही महिन्यांत पर्यटक संख्येत मोठी घट झाली. भीती आणि असुरक्षिततेच्या भावनेमुळे अनेक पर्यटकांनी दौरे रद्द केले; मात्र स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा दलांनी परिस्थिती हाताळण्यासाठी ठोस पावले उचलली. आज पहलगामच्या बाजारपेठा पुन्हा गजबजल्या आहेत. हल्ल्याची जबाबदारी घेतलेल्या ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या लष्करे तैयबाशी संलग्न दहशतवादी संघटनेचे तीन प्रमुख पाकिस्तानी दहशतवादी जुलै 2025 मध्ये सुरक्षा दलांनी राबवलेल्या ‘ऑपरेशन महादेव’अंतर्गत चकमकीत मारले गेले. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही 100 हून अधिक दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने कंठस्नान घातले. लष्कराने दाखवलेले शौर्य अजोड आहे; पण आपण जीवाची बाजी लावणार्‍या सैनिकांच्या पाठीशी ठामपणाने उभे राहतो का, याचा विचार वर्षपूर्तीनंतर होणे गरजेचे आहे. पहलगाम प्रकरणात परवेझ अहमद आणि बशीर अहमद जोथाड या स्थानिकांनी अवघ्या 3000 रुपयांसाठी दहशतवाद्यांना आश्रय दिला होता.

दोघांनाही अटक झाली आणि स्थानिक जनतेने त्यांचा निषेध केला; पण राजकीय पक्षांचे काय? ‘ऑपरेशन महादेव’सारख्या महत्त्वाकांक्षी मिशनबाबत विरोधी पक्षांचे नेते संशयाचे वातावरण तयार करत असतील, तर दहशतवादाचा मुकाबला करायचा कसा? दहशतवाद्यांना आश्रय देणार्‍यांमध्ये आणि लष्कराचे मनोधैर्य खच्ची करणार्‍यांमध्ये फरक काय? या प्रश्नांचा राष्ट्रहिताच्या अनुषंगाने गांभीर्याने विचार केल्याखेरीज या युद्धातील यशाला अर्थपूर्णता नाही. हीच बाब जगाची आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सरकारने विविध देशांत शिष्टमंडळ पाठवले. यामध्ये भारताच्या भूमिकेला कुणी विरोध केला नसला, तरी समर्थन देऊन पाकविरोधात कारवाईसाठीही पुढाकार घेतला नाही. उलटपक्षी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भिकेकंगाल पाकला भरीव आर्थिक मदत दिली. ट्रम्प अध्यक्ष बनल्यापासून तर अमेरिकेचे पाकप्रेम उफाळून आले आहे. दहशतवादाविरुद्धच्या जागतिक लढाईसाठीच्या सीटीसी समितीचे उपाध्यक्षपद पाकिस्तानला देण्यापर्यंत या प्रेमाचे भरते आले. इराणविरुद्ध संघर्षातही ट्रम्प यांची खुशामत केल्यानेच पाकिस्तान मध्यस्थ बनला. हा भारताला डिवचण्याचा आणि सौदेबाजीचा भाग असला, तरी 9/11 च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड ओसामा बिन लादेन अबोटाबादेत सापडला होता, हे अमेरिकेने विसरू नये. चीनही भारताविरुद्धचे कार्ड म्हणून पाकचे चोचले पुरवतो. अशा दुतोंडी आणि आपमतलबी भूमिकांनी दहशतवादाविरुद्धची लढाई जिंकता येणार नाही. तहरीक ए तालिबान पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील तालिबान्यांच्या भेदक हल्ल्यांच्या रूपाने पाकिस्तान आपल्या कर्माची फळे भोगत आहे. येणार्‍या काळात हा देश फुटणार, हे अटळ आहे; पण उर्वरित जगाचे काय? दहशतवादमुक्त जग ही उद्दिष्टपूर्ती कधी होणार?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT