Anant Nag Honoured | अनंत नाग 
संपादकीय

Anant Nag Honoured | अनंत नाग

पुढारी वृत्तसेवा

मुरलीधर कुलकर्णी

कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते अनंत नाग यांना जाहीर झालेला २०२४ चा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ हा त्यांच्या पाच दशकांच्या उत्तुंग आणि समर्पित कलाप्रवासाचा यथोचित गौरव आहे. २२ सप्टेंबर २०२६ रोजी गुजरात येथील केवडिया येथे ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना भारतीय सिनेसृष्टीतील हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात येणार असून, डॉ. राजकुमार यांच्यानंतर हा पुरस्कार मिळवणारे ते कन्नड सिनेसृष्टीतील दुसरे मानकरी ठरले आहेत.

बालपण कर्नाटकात व्यतीत झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी मुंबई गाठली. मुंबईत ‘युनियन बँक’मध्ये नोकरी करताना त्यांचा कल कलाक्षेत्राकडे झुकला. स्वतःच्या मेहनतीने, अभ्यासाने आणि कलागुणांच्या जोरावर या क्षेत्रात त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले. १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात मुंबईतील प्रायोगिक नाट्य चळवळीतून त्यांच्या अभिनयप्रवासाचा श्रीगणेशा झाला. येथे त्यांना सत्यदेव दुबे आणि गिरीश कर्नाड यांचे मार्गदर्शन व सहवास लाभला, ज्यांनी त्यांच्यातील अभिनेत्याला आकार दिला. त्यांनी कोकणी, कन्नड, मराठी आणि हिंदी अशा विविध भाषांमधील नाटकांमध्ये अभिनय करून आपल्या अष्टपैलूत्वाची प्रचिती दिली.

१९७३ मध्ये ‘संकल्प’ या कन्नड चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. त्यानंतर दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी ‘अंकुर’ (१९७४) या चित्रपटाद्वारे त्यांना हिंदी समांतर चित्रपटांमध्ये आणले. त्यानंतर ‘निशांत’, ‘मंथन’, ‘भूमिका’ आणि ‘कलियुग’ या हिंदी चित्रपटांतील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. पाच दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांत काम केले असून, त्यात २५० पेक्षा जास्त कन्नड चित्रपट आहेत. कन्नड सिनेसृष्टीत ‘बायलू दारी’, ‘चंदनद गोंबे’, ‘ना निन्ना बिडलारे’, ‘बेंकिया बाले’, ‘हेंडथिगे हेलबेडी’, ‘गणेशना मदुवे’ आणि ‘गौरी गणेशा’ हे त्यांचे चित्रपट लोकप्रिय ठरले. अभिनेत्री लक्ष्मी यांच्यासोबत त्यांची ऑन-स्क्रीन जोडी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. या जोडीने २५ हून अधिक सुपरहिट चित्रपट दिले. आर. के. नारायण यांच्या कथांवर आधारित आणि धाकटा भाऊ कै. शंकर नाग यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मालगुडी डेज’ या मालिकेतील त्यांच्या व्यक्तिरेखांनी त्यांना देशपातळीवर घराघरांत पोहोचवले.

अलीकडच्या काळात ‘गोधी बन्ना साधारण मायकट्टू’, ‘केजीएफ : चॅप्टर १’, ‘सरकारी हि. प्रा. शाले’ आणि ‘७७७ चार्ली’ या चित्रपटांतील त्यांच्या परिपक्व अभिनयाने नव्या पिढीलाही भुरळ घातली. राजकारणातही त्यांनी ठसा उमटवला. कर्नाटकात आमदार आणि विधान परिषद सदस्य असताना १९९६ ते १९९९ या काळात ते मंत्रीही होते. त्यांना ६ फिल्मफेअर ॲवॉर्डस्‌ आणि ५ कर्नाटक राज्य चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. भारत सरकारने २०२५ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले होते. सहज-सुंदर अभिनय, भाषांवर प्रभुत्व आणि अफाट लोकसंग्रह यांच्या जोरावर अनंत नाग यांनी भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात आपले नाव सुवर्णअक्षरांनी कोरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT