तयारी गगनयान मोहिमेची pudhari photo
संपादकीय

तयारी गगनयान मोहिमेची

Gaganyaan Mission: अवकाश क्षेत्रात भारताने गेल्या काही वर्षांत विक्रम प्रस्थापित केले आहेत

पुढारी वृत्तसेवा
प्रा. विजया पंडित

अवकाश क्षेत्रात भारताने गेल्या काही वर्षांत विक्रम प्रस्थापित केले आहेत. आगामी काळात एकानंतर एक अनेक महत्त्वाच्या मोहिमा पार पाडण्याबरोबरच ‘गगनयान’सारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भारतीय अवकाश क्षेत्रासाठी ऐतिहासिक क्षणाची नोंद करणारा ठरणार आहे. तत्पूर्वी ‘गगनयाना’त जाणारे अंतराळवीर अवकाश प्रवास करणार असून ते एकप्रकारे ‘रेकी’ करणार आहेत, असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

अलीकडच्या काळात अवकाश क्षेत्रात भारताकडून ऐतिहासिक कामगिरी केली जात आहे. चांद्रयान-3 आणि आदित्य एल-वन मिशनच्या यशानंतर इस्रोने लहानसहान उपग्रह सोडण्यासाठी ‘एसएसएलव्ही-डी-3’ची तीनदा यशस्वी चाचणी घेतली. या माध्यमातून उपग्रह प्रक्षेपण करण्याच्या उद्योगात भारताने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याचवेळी आगामी मार्च-एप्रिल2025 मध्ये भारत आणखी एक ऐतिहासिक कामगिरीची नोंद करत आहे. कॅप्टन राकेश शर्मा यांच्यानंततर दुसरे भारतीय अंतराळवीर म्हणून विंग कमांडर शुभांशू शुक्ला यांची नोंद होण्याची शक्यता आहे. पर्यायी साथीदार ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्ण नायर यांच्यासमवेत ते अवकाशात जाण्याची तयारी करत आहेत. भारतासाठीच नाही तर चीन आणि अन्य स्पर्धकांच्या नजरेतूनही शुक्ला हे दुसरे अंतराळवीर असून ते आगामी महत्त्वाकांक्षी प्रकल्पापूर्वी अवकाश स्थानकाची रेकी करण्यासाठी जात आहे. महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेसाठी चौघांची निवड करण्यात आली असून त्यात शुक्ला आणि नायर यांचा समावेश आहे. शिवाय अजित कृष्णन अणि अंगद प्रताप यांचा समावेश आहे.

काही दिवसांपूर्वी इस्रोचे प्रमुख एस.सोमनाथ यांनी एका मुलाखतीत ‘इस्रो’च्या आगामी चांद्रमोहीम चांद्रयान-4 याबद्दल माहिती दिली. ती पृथ्वीवर चंद्रावरचे काही नमुने परत घेऊन येणार आहे. मात्र, आपले खरे लक्ष्य गगनयान मोहीम असेल. यात भारत आपल्या तंत्रज्ञानाच्या बळावर आणि रॉकेटच्या मदतीने चार अंतराळवीरांना अवकाशात पाठवेल. कालांतराने भारताचे अंतराळवीर चंद्राच्या पृष्ठभागावरही उतरतील. आपली आगामी एक मोहीम ‘जीवन’ असून ती एक अनमॅन क्रू मिशन आहे. त्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. यात व्योम मित्र अ‍ॅक्टिव्ह मॉडेल स्पेस ऑर्बिटलमध्ये पाठविण्यात येईल. त्याचबरोबर त्याला परत आणायचेही आहे. इस्रो आणि नासा यांच्या संयुक्त मोहिमेनुसार भारताचे अंतराळवीर आगामी काळात आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात जात आहेत, याबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे मावळते अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी बरेच दिवस अगोदर घोषणाही केलेली आहे. यानंतर उभय देशांच्या अवकाश संस्थांनी त्यावर संयुक्तपणे काम करण्यास सुरुवात केली. अनेक महिन्यांची तयारी आणि प्रशिक्षणानंतर भारताकडून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक मोहिमेसाठी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आणि ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर यांची निवड केली. त्यांची पहिली पसंती शुक्ला आहे. एखादी अडचण आल्यास कॅप्टन नायर हे राखीव अंतराळवीर असतील. या दोघांची निवड नासा मान्यताप्राप्त सेवा कंपनी ऑक्सीओम स्पेस इंकच्या मदतीने करण्यात आली. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकासाठीच्या चौथ्या मोहिमेत व्यग्र असलेल्या अमेरिकेच्या अ‍ॅक्सिओम स्पेस इंकसमवेत ‘इस्रो’ने एक अवकाश उड्डाणाचा करार केला आहे. ऑक्सिओम स्पेस इंक या मोहिमेला व्यावहारिक रूप देत असून त्यांची ही चौथी अवकाश मोहीम आहे.

गगनयान मोहिमेतील अंतराळीवीरांचा अवकाश स्थानकावर जाण्याचा विषय असेल तर यासंदर्भात एस. सोमनाथ म्हणतात, आजकाल अमेरिकेत बहुतांश अवकाश मोहिमा खासगी संस्थांमार्फत पार पाडल्या जात आहेत. नासा या संस्थांमार्फतच शास्त्रज्ञांना अवकाश स्थानकात पाठवत आहे. यासाठी या संस्थेला पैसे भरावे लागतात. या मोहिमेसाठी आपल्या वाट्याला आलेली रक्कम भरत आहोत. मात्र, या मोहिमेवरील जादा खर्चावरून काही जण प्रश्न विचारत आहेत. त्यांच्या मते, आपल्याला लवकरच गगनयान मोहीम करायची असताना पुन्हा गगनयात्री मोहिमेनुसार आपल्या अंतराळवीरांना एखाद्या खासगी संस्थांच्या मार्फत का पाठवत आहोत? अशी विचारणा करत आहेत. यावर प्रमुख म्हणतात, आपण त्याद़ृष्टीने उच्च तंत्रज्ञानाकडे वाटचाल करत असलो तरी अजूनही गगनयान मोहीम पूर्ण झालेली नाही. अशावेळी काही जादा पैसे मोजून अन्य माहिती गोळा करण्यात आणि अतिरिक्त कौशल्य मिळवण्यात काय अडचण आहे? गगनयात्री मोहिमेनुसार अवकाशात जाणारा अंतराळवीर हा त्याच्या अनुभवाचा फायदा गगनयान मोहिमेला देईल.

एकूणात गगनयान मोहिमेच्या अगोदर आपले गगनयात्री अभियान हे एकप्रकारच्या आपली मोहीम कौशल्यपूर्ण तडीस देण्यासाठी रेकी करणारे अभियान म्हणता येईल. गगनयात्री मोहीम ही काही टुरिस्ट मिशन नसेल आणि ते प्रत्यक्षात सायंफिटिक मिशन असेल. डॉ. सोमनाथ म्हणतात, गगनयात्री मोहीम सायंटिफिक मिशन असेल आणि त्यासाठी त्याचे प्रशिक्षण देखील महत्त्वाचे आहे. या मोहिमेनुसार एक नाही पाच वेळा महत्त्वाचे प्रयोग केले जाणार आहेत. यात इस्रो आणि नासाचे अंतराळवीर सहभागी होतील. त्यामुळे तेथे प्रयोग कसे करायचे याचा अनुभव मिळेल आणि शून्य गुरुत्वाकर्षणात कसे काम करायचे आणि विपरित स्थितीचा कसा सामना कसा करायचा, याचा अनुभवही गगनयात्रीला मिळेल. अशा प्रकारची सर्व उपयुक्त माहिती गगनयात्री अभियानातून मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT