American Indian businessman | कल सोमानी 
संपादकीय

American Indian businessman | कल सोमानी

राजस्थान रॉयल्स संघाला नवीन मालक

पुढारी वृत्तसेवा

युवराज इंगवले

2008 पासून सुरू झालेल्या मर्यादित म्हणजे 20 षटकांच्या इंडियन क्रिकेट प्रीमियर लीगमुळे (आयपीएल) क्रिकेट विश्वाचा चेहरा बदलला. यातील गुंतवणुकीतून मिळणार्‍या मोठ्या परताव्यामुळे बॉलीवूड सेलिब्रिटीपासून ते उद्योग जगतातील अनेक दिग्गजांनी मोठ्या बोली लावून संघ खरेदी केले होते. त्यानंतरही वेळोवेळी होत असलेल्या लिलावातून तगडी रक्कम मोजून उत्तमोत्तम खेळाडू संघासाठी खरेदी केले जातात. दरवर्षी भरणार्‍या या स्पर्धेत लिलावाद्वारे क्षमतेनुसार खेळाडूंना खरेदी केले जाते. आता आयपीएलच्या नव्या सीझनचे बिगुल वाजले आहे आणि एक मोठी बातमीही समोर आली आहे, ज्यामुळे सर्वजण थक्क झाले आहेत. आयपीएल 19 व्या सीझनला सुरुवात होण्याआधी राजस्थान रॉयल्स संघाला नवीन मालक मिळाले आहेत.

आयपीएल स्पर्धेचा पहिला विजेता असलेल्या या संघाला एका प्रभावशाली मालकाने खरेदी केले आहे. ही काही साधीसुधी डील नसून आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या डीलपैकी एक असल्याचे मानले जात आहे. हा व्यवहार सुमारे 1.63 अब्ज डॉलर म्हणजे 15,000 कोटी रुपयांमध्ये झाला आहे. या संघाचे नवीन मालक आहेत अमेरिकन भारतीय उद्योगपती कल सोमानी.

सोमानी हे तंत्रज्ञान आणि गुंतवणूक क्षेत्रातील बडे नाव आहे. ते अमेरिकेतील अ‍ॅरिझोना राज्यातील स्काटस्डेलचे रहिवासी आहेत. ते इंट्रा एज नावाच्या टेक कंपनीचे संस्थापक आणि सीईओ आहेत. त्यांची कंपनी जागतिक स्तरावर सेवा पुरवते. याशिवाय त्यांनी ट्रयो आणि ट्रयो एआय यासारखे प्लॅटफॉर्मही तयार केले आहेत. हे प्लॅटफॉर्म डेटा प्रायव्हसी आणि एआय गव्हर्नन्स क्षेत्रात कार्यरत आहेत. सोमानी हे गेल्या 15 वर्षांपासून तंत्रज्ञान, डेटा आणि एआय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी अनेक कंपन्या उभ्या केल्या आणि त्या यशाच्या शिखरावर पोहोचवल्या. विशेष म्हणजे ते स्वतः आयपीएलचे प्रायोजक राहिले आहेत. सोमानी यांना क्रीडा क्षेत्राचीही खूप आवड आहे. ते मोटर सिटी गोल्फ क्लबचे सहमालक आहेत आणि त्यांनी टीजीएल गोल्फ लीग तसेच टीएमआरडब्लू स्पोर्टस् या यांसारख्या उदयोन्मुख उपक्रमांमध्येही गुंतवणूक केली आहे.

सोमानी यांचे राजस्थान रॉयल्सशी संघाशी जुने नाते आहे. 2021 पासून ते या संघाशी जोडले गेलेले आहेत. आयपीएलमधील मोठ्या डीलमुळे सोमानी यांच्या संपत्तीबाबत सर्वत्र चर्चा रंगली आहे. त्यांच्या नेटवर्थबाबत वेगवेगळे आकडे समोर येत आहेत. सोमानी यांची नेटवर्थ 110 अब्ज डॉलरपर्यंत असल्याचे बोलले जात आहे. पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आयपीएलमधील नवीन डीलचे वैशिष्ट्य म्हणजे सोमानी यांच्या संयुक्त भागीदारीला अनेक बड्या गुंतवणूकदारांचा पाठिंबा लाभला आहे. यामध्ये रॉब वॉल्टन यांचा समावेश असून ते वॉलमार्ट कुटुंबाचे वारसदार आणि एनएफएल टीम डेनवर ब—ॉन्कोसचे मालक आहेत. इतकेच नाही तर फोर्ड कुटुंबाशी संबंधित शीला फोर्ड हॅम्पही यांनी सोमानी यांच्या डीलमध्ये भागीदारी नोंदवली असून त्या डेट्रॉईट लायन्सच्या मालक आहेत. यावरून हे स्पष्ट होते की, हा व्यवहार केवळ एक खरेदी नसून जागतिक गुंतवणूकदारांनी आयपीएलवर लावलेला एक मोठा डाव आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT