यहाँ हर चीज बिकती हैं। सब पैसों का खेल हैं। पालिका इलेक्शन में सब उमीद्वार बेचे जा चुके हैं। इंडिया की डेमोक्रस्सी खतरे में है..। असे संजय राऊतजी याचे म्हणणे आहे. खरं तर देशातील एक गोष्ट संजयजींच्या इच्छेप्रमाणे होईल तर शपथ! आखिरकार वोटरोंका क्या होगा? हा संजयजींचा उद्विग्न करून टाकणारा प्रश्न ऐकून काळीज चर्र झाले. एखादा माणूस रोज उठून जर बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत असेल, तर देशातल्या कुणीतरी ते ऐकले पाहिजे, असे बाळकुंजे नामक एका ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे. खरंच संजयजी आणि बाळकुंजे यांचे म्हणणे सोळाआणे सच आहे.
यहाँ हर चीज बिकती हैं... खरं तर गुरुदत्तच्या तोंडी शोभणारा हा डायलॉग आहे. मोहब्बत के खेल मैं नाकामयाब झालेला नायक सार्या दुनियेकडे असाच संशयाने बघत असतो. त्याला सगळे कस्मे वादे, प्यार वफाएँ म्हणजे नुसत्या गप्पा वाटू लागतात. वैतागून वैतागून तो म्हणू लागतो, ‘ये जो मुहब्बत हैं, बस उनका हैं काम...’ आमचे काम नव्हेच ते! म्हणून जेव्हा आम्ही यारों हसीनों की गलियों से गुजरतो, तेव्हा हम निकलते हैं बस दूर ही से करके सलाम! तसं निवडणुका आणि राजकारण यातून गायब व्हायची वेळ संजयजी यांच्यावर आली की काय, अशी भीती वाटत आहे; पण शेवटी या देशातील मतदारांचे काय होणार, हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो; पण संजयजी, तुम्ही मतदारांचा विचारही आता सोडून द्यावा. कारण, तुम्ही म्हणता तसे मतदारसुद्धा विकले जात आहेत. क्यूंकी यहाँ हर चीज बिकाऊ हैं।
मतदारांना शहाणे करण्यात आपण कमी पडलो संजयजी! निवडणूक बिनविरोध होऊ लागली, तर मग निवडणुका घ्यायच्या तरी कशाला? कुस्ती न करताच पैलवान विजयी? पेपर न देताच पास झाला, तर पेढे कशासाठी वाटायचे? हे म्हणजे कलिंगडाला भाव मिळाला नाही म्हटल्यावर त्यावर रोटावेटर फिरविल्यासारखे आहे. उदाहरण थोडे चुकल्यासारखे वाटते का? यहाँ हर चीज बिकती हैं... हे आपले म्हणणे मात्र संजयजी खटकल्यावाचून राहत नाही. कारण, निवडणूक म्हटली की, बॅनर, मफलर, झेंडे, वडापाव, मिसळ, चहा, गुटखा इत्यादींची विक्री ही होणारच!