Algorithms | ‘अल्गोरिदम’च्या हाती विषयांचे भवितव्य 
संपादकीय

Algorithms | ‘अल्गोरिदम’च्या हाती विषयांचे भवितव्य

पुढारी वृत्तसेवा

वीरेंद्र सोनवणे

डिजिटल युगात आपल्या पसंतीचा आणि विचारांचा ताबा अदृश्य अल्गोरिदमने घेतला आहे. सनसनाटीच्या शर्यतीत गंभीर विषय मागे पडत असून, एकांगी जनमत तयार होण्‍याचा धोका निर्माण झाला आहे. अशावेळी तंत्रज्ञानाच्या आहारी न जाता स्वतःची स्वतंत्र विचारक्षमता व विवेक जपण्याची नितांत गरज आहे.

सकाळी उठल्या उठल्या हातात फोन घेणे आणि स्क्रीनवर अंगठ्याची सरकवणूक सुरू होणे, हा आता आपल्या जगण्याचाच एक भाग बनला आहे. आपण एक छोटीशी बातमी, एखादा व्हिडीओ किंवा मित्राची पोस्ट पाहण्यासाठी स्क्रीन उघडतो आणि पुढचा अर्धा-एक तास नकळत कुठे वाहून जातो, हे आपले आपल्यालाही कळत नाही. कधी स्वयंपाकाची एखादी सोपी कृती, कधी एखाद्या कलाकाराचा डान्स, तर कधी एखादा अचानक समोर आलेला वादग्रस्त व्हिडीओ आपण एक संपला की, दुसरा पाहत राहतो; पण या सगळ्या प्रवासात आपण कधी विचार केला आहे का, की हे सगळे विषय आपल्यासमोर एकापाठोपाठ एक कसे येत आहेत? हे आपण स्वतः निवडत आहोत की, पडद्यामागून दुसरेच कोणीतरी आपली आवड आणि आपले विचार ठरवत आहे? आजच्या डिजिटल युगात आपल्या स्क्रीनवर काय दिसावे, हे ठरवण्याचे काम एक अदृश्य यंत्रणा करत आहे, ज्याला आपण ‘अल्गोरिदम’ म्हणतो. सोप्या भाषेत सांगायचे, तर आपल्या डिजिटल पावलांचा मागोवा घेऊन, आपल्याला काय आवडते आणि आपण कशावर जास्त वेळ थांबतो, याचा अभ्यास करून माहिती पुरवणारी ती एक स्वयंचलित गणिती प्रणाली आहे. पूर्वी वृत्तपत्रांचे संपादक किंवा ज्येष्ठ विचारवंत ठरवत असत की, समाजासाठी कोणता विषय महत्त्वाचा आहे आणि कशावर चर्चा व्हायला हवी.

आज मात्र तो अधिकार या अदृश्य अल्गोरिदमच्या हातात गेला आहे. आज कोणता विषय कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचणार आणि कोणता महत्त्वाचा विषय पडद्यामागे झाकला जाणार, याचे भवितव्य ही प्रणाली ठरवत आहे. अर्थात, या तंत्रज्ञानाची एक खूप सुंदर आणि सोयीची बाजूही आहे. अफाट पसरलेल्या माहितीच्या महासागरातून आपल्याला हवी ती माहिती क्षणार्धात शोधून देणे, आपला वेळ वाचवणे आणि आपल्या आवडीच्या गोष्टी सहज उपलब्ध करून देणे, यात या प्रणालीचा मोठा वाटा आहे. एखाद्या नव्या विषयाची माहिती घ्यायची असेल किंवा आपल्या आवडीचे संगीत ऐकायचे असेल, तर हे तंत्रज्ञान एका मित्रासारखे मदतीला धावून येते. सुविधा म्हणून हे नक्कीच कौतुकास्पद आहे. परंतु, सोय आणि परावलंबित्व यातील पुसटशी रेषा कधी ओलांडली जाते, हे आपले आपल्यालाही समजत नाही. या सुविधेचा सर्वात मोठा फटका माहितीच्या वास्तविक मूल्याला बसत आहे. आज ‘महत्त्वपूर्ण’ आणि ‘लोकप्रिय’ या दोन शब्दांमधील फरक धूसर होत चालला आहे. ज्या विषयांमध्ये सनसनाटीपणा आहे, जिथे तीव्र भावना चिथाडल्या जातात किंवा जिथे करमणूक जास्त आहे, अशा विषयांवर लोक जास्त वेळ थांबतात.

अल्गोरिदम या थांबण्याला ‘पसंती’ मानतो आणि तशाच प्रकारचा मजकूर आणखी वेगाने पसरवतो. या शर्यतीत शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, ग्रामीण जीवन किंवा गंभीर सामाजिक प्रश्न यासारखे खरोखरचे महत्त्वाचे आणि वैचारिक विषय कुठेतरी मागे पडतात. गंभीर विषयांवर शांतपणे विचार करण्यासाठी लागणारा वेळ आणि संयम आजच्या वेगवान डिजिटल जगात दुर्मीळ होत चालला आहे. याचा आणखी एक मोठा धोका म्हणजे, एकाच प्रकारच्या विचारांच्या चौकटीत अडकणे. आपण ज्या गोष्टींवर क्लिक करतो किंवा ज्या प्रकारच्या मतांशी सहमत होतो, अल्गोरिदम आपल्याला वारंवार तसेच विचार दाखवत राहतो. यामुळे आपल्या नकळत आपल्याभोवती एकाच मताची भिंत उभी राहते. आपल्याला वाटते की, संपूर्ण जग असाच विचार करत आहे; परंतु प्रत्यक्षात आपण दुसऱ्या बाजूचा विचार ऐकण्याची क्षमताच गमावून बसतो.

वेगळे दृष्टिकोन समजून न घेतल्यामुळे समाजात संवाद कमी होतो आणि मतभेद अधिक तीव्र होऊ लागतात. जनमताची जडणघडण जेव्हा अशा एकांगी माहितीवर होऊ लागते, तेव्हा ते वैचारिकदृष्ट्या निरोगी समाजाचे लक्षण राहत नाही. शेवटी, पडद्यावर काय दिसावे हे तंत्रज्ञान नक्कीच ठरवू शकते; पण त्या दाखवलेल्या गोष्टींपैकी कशाला किती महत्त्व द्यायचे, हा निर्णय अजूनही मानवी मेंदू आणि विवेकाच्याच हातात आहे. डिजिटल प्रवाहात वाहून न जाता माहितीची सत्यता तपासणे, वेगवेगळ्या बाजू समजून घेणे आणि स्वतःची स्वतंत्र विचारक्षमता जपणे ही आजची खरी गरज आहे. तंत्रज्ञान आपले मार्ग सोपे करू शकते; पण आपली वाट कोणती असावी, याचा नकाशा आपण स्वतःच आखायला हवा. आपल्या हातातील स्क्रीन ही जगाकडे पाहणारी एक खिडकी जरूर आहे; पण त्या खिडकीवर नक्की कोणता पडदा असावा आणि पलीकडचे जग कसे पाहावे, यावर जर त्या अदृश्य प्रणालीचेच नियंत्रण राहणार असेल, तर विचार करायला हवा की, खिडकीतून बाहेर पाहणारे आपण आहोत की, आपल्याला हवी तशी दृश्ये दाखवून चालवणारा तो अल्गोरिदम!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT