अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशाची राजधानी दिल्लीमध्ये भरले आहे, याचा आनंद समस्त मराठी जनास होत असून, साहित्यिक मंडळींमध्ये तर उत्साहाची लाट पसरली आहे. गावोगावचे छोटे-मोठे लेखक, कवी, समीक्षक आणि एकंदरीत साहित्यिकवर्ग रेल्वेने भरभरून दिल्ली येथे पोहोचला आहे आणि वार्षिक साहित्य सोहळ्यात आनंदाने सहभागी होत आहे. दिल्लीच्या तख्तावर याआधी आपल्या पराक्रमी पुरुषांनी कित्येकदा धडक दिली होती आणि दिल्ली काबीज केली होती. त्याच परंपरेला अनुसरून आज मराठी साहित्यिक दिल्लीपर्यंत धडक मारत आहेत, याचे कौतुक व्हायलाच हवे.
लोक का लिहितात? या प्रश्नाचे उत्तर शोधले तर ते स्वप्रेरणेने लिहितात, असे उत्तर येईल. व्यक्त व्हावेसे वाटण्याची अनेक माध्यमे आहेत. कोणी चित्र काढेल, शिल्प तयार करेल, गीते लिहील, कविता तयार करेल किंवा गद्य साहित्य लिहील. ही सर्व अभिव्यक्त होण्याची साधने आहेत. असे अभिव्यक्त होणारे साहित्यिक दिल्लीत एकत्र येत आहेत, त्याअर्थी या संमेलनातून काही ना काही तरी शाश्वत असे मराठी साहित्याला मिळेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
मराठीमध्ये गेल्या कित्येक शतकांपासून उत्कृष्ट दर्जाचे साहित्य निर्माण होत आहे. हे साहित्य अनेकजणांच्या लहानपणीच्या भावविश्वाचा उत्कट भाग आहे. तुम्ही आठवून पाहा, कॉलेजच्या जीवनात तुम्ही काय अभ्यास केलाय तो तुम्हाला आठवणार नाही; परंतु प्राथमिक शाळेमधील प्रत्येक धडा आणि प्रत्येक कविता लेखक-कवीसह तुम्हाला आठवते. याचे कारण हे सर्वात महत्त्वाचे भावविश्व असते. वाचन संस्कृती संपत आली आहे का? याचा शोध घेतला असता ती अजिबात संपत नाही तर ती वाढत आहे, असा आश्चर्यकारक निष्कर्ष काढता येईल. पुणे येथे भरलेला पुस्तक मेळा आणि प्रकाशक मंडळींना साहित्य संमेलनामध्ये मिळणारे प्रचंड संख्येने वाचक, यांचा आवाका पाहता मराठी माणसे आजही वाचन करतात, असे दिसून येईल. नवीन पिढीचे वाचन कुठल्या प्रकारचे आहे याचा शोध घेतला तर मात्र ही पिढी जुनेच वाचत आहे, असे दिसून येते. आजही ‘मृत्युंजय’, ‘छावा’, ‘श्रीमानयोगी’, ‘ययाती’ आणि ‘देवयानी’ या सर्व जुन्याच पुस्तकांना भरपूर मागणी आहे. ग्रामीण भागाच्या शंकर पाटील, दमा मिरासदार यांच्या कथा आजही वाचल्या जातात, असे तुम्हाला दिसून येईल. पुन्हा जुनेच वाचले जात असेल, तर नव्याने काही चांगले निर्माण होत नाही का? या प्रश्नाला साहित्य क्षेत्रामधून उत्तर मिळत नाही. कवी कमी आणि कवडेच फार, अशी काव्य क्षेत्राची परिस्थिती आहे. आपल्या त्याच त्या लोकप्रिय कविता व्यासपीठांवरून सादर करणारे कवी कंटाळलेले नाहीत; परंतु जाणकार श्रोते आणि वाचक मात्र त्याच त्याच कवींना कंटाळले आहेत. साहित्य संमेलनाची पत्रिका पाहिली तर तीच ती साहित्यिक मंडळी वर्षानुवर्षे या पत्रिकांवर आणि व्यासपीठांवर जागा अडवून बसलेली दिसतात. जुन्या लोकांनी थोडेसे बाजूला राहून नवीन लोकांना पुढे आणले, तर नवीन पिढीपर्यंत हे साहित्य जाऊ शकेल. प्रत्यक्षात तसे होत नाही.