खासदार सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
राजकारणातील रोखठोक, कार्यतत्पर लोकनेता म्हणून लाखो नागरिकांचे अत्यंत जवळचे असणारे अजितदादा पवार यांचे अपघाती निधन अत्यंत क्लेशदायी आहे. राजकारणातील अनेक चढउतार आम्ही एकत्रितपणे पाहिले आणि दादांच्या खंद्या पाठिंब्यामुळे आलेल्या प्रत्येक आव्हानाचा निडरपणाने मुकाबला करत आलो आहोत. दादांविना राजकारण- समाजकारण ही कल्पनाच मनाला न पटणारी आहे. त्यांच्या जाण्यानं पोरकेपणाची भावना मनात निर्माण झाली आहे. मन विषण्ण करणारी दादांची एक्झिट आहे.
राजकारणातील काही नेते लोकप्रियतेवर, तर काही नेते निर्णय क्षमतेवर ओळखले जातात. अजितदादा हे दुसर्या गटातले नेते होते. कर्तृत्वावर त्यांचा विश्वास होता. भाषणांनी भावनिक लाट निर्माण करणारे ते नेते नव्हते. राज्य चालवण्याचा अनुभव, प्रशासनाची अचूक समज आणि वेळेवर निर्णय घेण्याची धाडसी हिंमत या गुणांमुळे ते लोकप्रिय होते. अजितदादा गेले, ही कल्पनाच मनाला करवेना!
अजितदादांना मा. शरद पवार यांचा वारसदार म्हणून पाहिले गेले; पण माझ्या मते ते केवळ वारसदार नव्हते, तर राज्यकारभाराचे व्यवस्थापकसुद्धा होते. राज्यातील महत्त्वाचे अर्थ, जलसंपदा आणि उपमुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीचा वापर त्यांनी ग्रामीण भागातील विकासासाठी केला. आतापर्यंतचा त्यांचा स्वभाव आणि कामगिरी पाहिली, तर आपल्या खात्याचे कामकाज आणि निर्णयावर विश्वास ठेवणारा नेता ही त्यांची ओळख होती.
2019 मधील पहाटेचा शपथविधी आणि 2023 मध्ये भाजपसोबत जाण्याचे त्यांचे निर्णय सोपे नव्हते. स्वतःच्या राजकीय भवितव्यापेक्षा त्यांनी सत्तेत स्थिरता आणि विकासाची गती राखण्यासाठीच त्यांनी हे निर्णय घेतले होते, असे मला वाटते. काळानुसार राजकारणाची गणितेही बदलतात. अजितदादांनी पक्ष आणि कार्यकर्त्यांच्या भविष्यासाठी वेगळा होण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय सत्तेसाठी नव्हता, तर जनहिताचे निर्णय घेण्यासाठी त्यांनी सत्ता मार्ग निवडला होता. त्यांच्या धाडसी निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा एक घटक सत्तेत सहभागी आहे. राजकारण हे केवळ नात्यांवर चालत नाही, तर कालानुरूप भूमिका बदलण्यावर चालत असते. अजितदादांनी तो बदल स्वीकारला आणि स्वतःची स्वतंत्र राजकीय दिशा ठरवली. धाडस आणि त्याची किंमत मोजण्याची हिंमत अजितदादांकडे होती.
सिंचन, अर्थकारण, पायाभूत सुविधा या विषयांवर त्यांची पकड मजबूत होती, हे त्यांच्या निर्णयांवरून मला अनेकदा जाणवले. दादा संपूर्ण महाराष्ट्राचे होते. त्यांनी स्वतःला सीमित ठेवले नाही. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांचा निवडणूक प्रचार करत असताना पक्षाच्या नेत्यांनी बोलविल्यानंतर ते बाजूच्या महानगरपालिका निवडणूक प्रचारलाही तातडीने गेले होते. राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळे पक्षाच्या प्रदेश कार्यालयात त्यांचा वावर कमी होता; पण कोणत्याही जिल्ह्यात दौरा असला, तरी ते प्रदेश कार्यालयाच्या संपर्कात असत. महायुती सरकारमध्ये अजितदादा हे केवळ उपमुख्यमंत्री नव्हते, तर प्रशासन आणि राजकारण यांच्यातील ते दुवा होते. निवडणुकीत आपल्या पक्षाला अधिक जागा मिळाव्यात, ही नैसर्गिक भावना इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांप्रमाणे त्यांच्याही मनात होती; पण पक्ष हितापेक्षाही त्यांनी स्थिर सरकारला महत्त्व दिले. अजितदादा हे स्वार्थाच्या राजकारणात कधी अडकले नाहीत. वास्तव स्वीकारणारे आणि निर्णय घेणारे ते नेते होते.
स्वतः राजकारणात यशस्वी झालेल्या अजितदादांनी आजवर अनेकांना उभं केलं असून मीही त्यापैकीच एक आहे. मोठ्या साहेबांचा राजकीय वारसा अजितदादा पवार यांनी तरुण वयातच स्वीकारला आणि मोठ्या जिद्दीने त्यांनी अनेक जबाबदार्या स्वीकारून त्या यशस्वीही केल्या. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट झाल्यानंतर पक्षाची संपूर्ण धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतल्यानंतर विधानसभा निवडणुकांत सर्वाधिक स्ट्राईक रेट राखत 41 आमदार दादांच्या नेतृत्वाखाली विजयी झाले. आजपर्यंतच्या त्यांच्या अविरत राजकीय वाटचालीचे हे फलित होते.
प्रशासनावर असलेली मजबूत पकड आणि कार्यक्षम निर्णय घेण्याची त्यांची क्षमता अतुलनीय होती. अजितदादांनी मागील चाळीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत राज्य सरकारमध्ये विविध विभागांच्या मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली. विशेषतः अर्थ आणि जलसंपदा खात्यांत अनेक महत्त्वाचे आणि जलद निर्णय घेतले. 2047 पर्यंत महाराष्ट्राला विकसित राज्य करण्याच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यात अशा नेतृत्वाची नितांत गरज होती. दादांविषयी काय काय आणि किती बोलावे! त्यांच्या कार्याचा महासागर शब्दांमध्ये मावणारा नाही.
दूरद़ृष्टीपणा, स्पष्टवक्तेपणा, रोखठोक, मिश्कील, वक्तशीरपणा, शिस्त अशा अनेक गुणांचा समुच्चय म्हणजे दादा. त्यांच्या कामाची पद्धत थेट आणि स्पष्ट होती. वेळेवर निर्णय घेणे आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे ही त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये होती. यामुळे त्यांना प्रशासकीय स्तरावर एक कार्यक्षम नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे दांडगा जनसंपर्क आणि प्रचंड शिस्तप्रियता. ते लोकांमध्ये मिसळत, त्यांच्या समस्या ऐकून घेत आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत. यामुळे लोकांना हा घरचा, हक्काचा दादा वाटायचा. दादांच्या संघटन कौशल्याचा मी मागील अनेक वर्षांचा साक्षीदार आहे. अनेक अवघड निर्णय घेतल्यानंतर ते सत्यात उतरवताना संघटनेवरील पकड मजबूत ठेवण्यात ते मातब्बर होते. त्यांच्या या गुणामुळे राष्ट्रवादी पक्ष पुन्हा भरारी घेताना दिसला. अलीकडील काळात दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येत असल्याने दादा सुखावले होते.
बारामती लोकसभा मतदारसंघातून आणि नंतर बारामती विधानसभा मतदारसंघातून अनेकवेळा निवडून येणे, हे त्यांच्या स्थानिक पातळीवरील मजबूत पकडीचे द्योतक होते. सहकारी संस्था, साखर कारखाने, दूध संघ आणि बँकांमध्ये त्यांनी महत्त्वाची पदे भूषवली. ही सर्व पदे नागरिकांशी थेट संबंध निर्माण करून देणारी आहेत. किंबहुना ही पदे भूषवताना संबंधित सभासदांशी थेट संपर्क ठेवावा लागतो. यामुळे त्यांचा ग्रामीण आणि सहकारी क्षेत्रातील कार्यकर्त्यांशी आणि लोकांशी जवळचा संबंध राहिला. यातूनच त्यांना कार्यकर्त्यांचे मोठे जाळे उभे करता आले आहे.
राजकीय यश आणि परखडपणा या तशा एकमेकांशी विसंगत वाटणार्या बाबी; पण अजितदादा हे स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जात. ते आपले विचार थेटपणे मांडत आणि निर्णय घेण्यास कचरत नसत. हा थेटपणा त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि जनतेलाही आकर्षित करायचा. वक्तशीरपणा आणि कामाचा वेग याबाबत दादांनी घालून दिलेला आदर्श पुढील अनेक पिढ्यांसाठी दीपस्तंभासारखा राहील. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात त्यांनी उद्योगपूरक वातावरण निर्माण करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. कौशल्य विकास केंद्रांच्या उभारणीतही ते सक्रिय राहिले.
सरकारी योजनांची अंमलबजावणी आणि विकासकामांना प्राधान्य देणे हे त्यांची कार्यपद्धती होती. ते केवळ घोषणा करण्याऐवजी प्रत्यक्ष कामे पूर्ण करण्यावर भर देत. उपमुख्यमंत्री म्हणून ते राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीचा विचार करून वास्तववादी निर्णय घेत असत. दादा नेहमीच राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दल स्पष्टपणे बोलताना दिसून आले. उपमुख्यमंत्रिपदावर असतानाही त्यांचा स्पष्टवक्तेपणा कायम राहिला. सरकारच्या धोरणांबद्दल किंवा विरोधकांच्या टीकेला ते थेट उत्तरे देत. उगाचच बाष्कळ बडबड करणे किंवा मतांच्या आकर्षणासाठी लांगुलचालन करणे दादांना कधीच जमले नाही. जे आहे ते स्पष्टपणाने मांडणे, हा दादांचा स्वभावपिंड होता. असा लोकनेता पुन्हा होणे दुर्मीळ आहे. दादांचा वियोग ही आयुष्यातील सर्वांत मोठी हानी आहे. कधीही न भरून येणारी..! त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!