एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
आज अजितदादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो लोक दर्शनासाठी आले होते. त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू दादांविषयी त्यांची आत्मियता किती होती ते दाखवणारे होते. हे सगळं पाहताना मन सुन्न झालं आणि अजितदादांविषयीच्या अनेक आठवणी मनात आल्या.
महायुतीचं आमचं सरकार म्हणून त्यांच्याबरोबर घालवलेले क्षण, गंभीर चर्चा, हास्यविनोद, एकत्र घेतलेले निर्णय, सगळं काही डोळ्यांसमोर आलं. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर अजितदादांशी अधिक जवळून काम करण्याची संधी मिळाली. ते माझ्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री म्हणून कार्यरत होते. पण आमचं नातं केवळ पदापुरतं कधीच मर्यादित राहिलं नाही. अनुभवाने, विचाराने आणि मनाने ते माझ्यासाठी नेहमीच मोठ्या भावासारखे होते.
राज्यातील महिलांसाठी काहीतरी भरीव, टिकाऊ आणि सन्मान देणारी योजना असावी, ही भावना मनात सतत घर करून होती. त्यातूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा विचार जन्माला आला. ही कल्पना मी देवेंद्रजी आणि अजितदादांसमोर मांडली. आर्थिक शिस्तीचा कठोर आग्रह धरणारे अजितदादा ही योजना ऐकून थांबले नाहीत. त्यांनी या योजनेला केवळ पाठिंबा दिला नाही, तर काही दिवसांतच ‘ही योजना कशी चालेल, तिच्यासाठी निधी कसा उभा राहील आणि ती पुढील अनेक वर्षे कशी टिकेल’ याचा सखोल आराखडा तयार करून दाखवला. तेव्हा जाणवलं, हा माणूस फक्त वित्तमंत्री नाही तर समाजाची नाडी ओळखणारा नेता आहे. महायुती सरकारमध्ये सामाजिक न्यायाच्या योजना असोत किंवा राज्यातील भव्य पायाभूत प्रकल्प, अजितदादांनी विकासाच्या बाबतीत कधीही तडजोड केली नाही. एखादी कल्पना आली की, ते लगेच विचारायचे, याचा सामान्य माणसाला काय उपयोग होणार आहे? हा प्रश्न त्यांच्या प्रत्येक निर्णयाच्या केंद्रस्थानी असायचा. तरुण आमदारांना ते कधी कधी कठोर शब्दांत सुनावत; पण त्या शब्दांमागे राग नव्हता, तर त्यांना घडवण्याची तळमळ होती.
राज्यातील अनेक जलसंपदा प्रकल्प वर्षानुवर्षे रखडले होते. मंत्रिमंडळात हे प्रस्ताव आले की, अजितदादा ठामपणे सांगायचे, आता निधी देतोय. त्यामुळे काम वेळेत पूर्ण झालंच पाहिजे. त्यांच्या आवाजातला आत्मविश्वास अधिकार्यांनाही जबाबदारीची जाणीव करून देणारा असायचा. एखादा प्रस्ताव अवघड असेल, तर ते थेट साध्या शब्दांत त्याचा अर्थ सांगायचे. मंत्रिमंडळात बसलेल्यांच्या चेहर्यावर समाधान दिसायचं. लोकांमध्ये मिसळणं, गरज पडली तर कानउघाडणी करणं आणि चांगल्या कामावर मनापासून पाठ थोपटणं, हा त्यांचा स्वभाव होता. मात्र बेशिस्तपणा त्यांना अजिबात खपत नसे. मलाही त्यांनी अनेकदा हसत हसत, एकनाथराव, तुमच्या भोवती ही एवढी गर्दी कशाला? असं सांगितलं आहे. त्या वाक्यामागेही काळजीच होती. अजितदादा खर्या अर्थाने दिलदार होते. स्वतःची चूक झाली, तर ती मान्य करण्याचं धैर्य त्यांच्यात होतं. फाईल हातात घेतली की, काही क्षणांत त्यातील बारकावे हेरण्याची त्यांची नजर विलक्षण होती. सहकार, कृषी, जलसंपदा, ऊर्जा, पायाभूत सुविधा या विषयांवरचा त्यांचा अभ्यास थक्क करणारा होता. बैठकीत खाली पडलेला कागदाचा कपही त्यांच्या नजरेतून सुटत नसे. इतकी शिस्त त्यांनी स्वतःपासूनच सुरू केली होती.
संकट कितीही मोठं असो, अजितदादांना मी कधीच निराश होताना पाहिलं नाही. उलट अशा वेळी ते अधिक शांत, अधिक ठाम दिसायचे. अकरा वेळा अर्थसंकल्प मांडणार्या या वित्तमंत्र्याला कायम टीकेला सामोरं जावं लागलं. पण त्या प्रत्येक टीकेला त्यांनी संयमाने, अभ्यासाने आणि प्रसंगी मिश्कील शैलीत उत्तर दिलं. अवास्तव आश्वासनं देणं हा त्यांचा स्वभाव नव्हता. जे शक्य आहे ते करून दाखवणं, हीच त्यांची खरी ओळख होती. कामाच्या निमित्ताने आमचं सतत बोलणं व्हायचं. कार्यक्रमांमध्ये आम्ही अनेकदा एकत्र असायचो. काही दिवसांपूर्वीच मुंबईत मा. सरन्यायाधीशांच्या सत्कार समारंभात आम्ही एकत्र होतो. तेव्हा निवडणुका, विजय-पराजय, पुढील काळ यावर मनमोकळ्या गप्पा झाल्या. सरकारमध्ये आम्ही सहकारी होतो, पण आमचं नातं पदांच्या चौकटीत अडकलेलं नव्हतं. वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ असूनही त्यांनी मला नेहमीच धाकट्या भावासारखी साथ दिली. महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्या हातात होत्या. पण त्यांचं मन नेहमी जनतेसाठी खुलं होतं. यंदाचा अर्थसंकल्प सादर करण्याची त्यांची तयारी सुरू असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली, हे आजही मान्य करणं कठीण आहे.
अजितदादा म्हणजे शिस्त, वेळेचं भान आणि अभ्यासू वृत्ती यांचा संगम होता. त्यांच्या थेट बोलण्यात कधी कधी फटकळपणा जाणवायचा. पण त्या शब्दांमागे राज्याचं भलं आणि समोरच्या माणसाचं हित हीच भावना असायची. चार दशकांहून अधिक काळ राजकारणात राहूनही त्यांनी साधेपणा आणि जमिनीवरचा पाय कधीच सोडला नाही. मी अनेकदा गमतीने म्हणायचो, मी, देवेंद्रजी आणि अजितदादा, आम्ही तिघेही कामाच्या बाबतीत वेडे आहोत. दादांचा दिवस पहाटे सुरू व्हायचा. कोव्हिडच्या भीषण काळात मंत्रालयातील नियंत्रण कक्षात बसून अधिकार्यांना मार्गदर्शन करणारे दादा आजही डोळ्यांसमोर उभे राहतात. राजकारणात मतभेद असतात. पण अजितदादा खर्या अर्थाने अजातशत्रू होते. विरोधकांवर ते नेमकी, मार्मिक टीका करायचे. पण कधीही खालच्या पातळीवर गेले नाहीत. स्वतःची उंची त्यांनी कधीच कमी होऊ दिली नाही. आज महाराष्ट्राने एक खंबीर, निर्भीड आणि अनुभवी नेता गमावला आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. शिवसेनेच्या वतीने आणि वैयक्तिकरीत्या माझ्या या मोठ्या भावाला, जिवलग मित्राला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.