आशिष शिंदे
परदेशात फिरण्याची आवड प्रत्येकालाच असते. पण, परदेशात सर्वात मोठा अडथळा उभा राहतो तो म्हणजे भाषा. विमानतळावर चौकशी करताना, हॉटेलमध्ये चेक-इन करताना, टॅक्सीवाल्याशी बोलताना, व्यावसायिक मीटिंगमध्ये सहभागी होताना किंवा अगदी साधा चहा मागतानाही भाषा समजत नसेल, तर संवाद थांबतो. अशावेळी मोबाईलमधील ट्रान्सलेशन अॅप्स् उपयोगी पडतात खरे; पण स्क्रीनकडे पाहणे, शब्द टाईप करणे, समोरच्याचा आवाज नीट पकडला जातोय का याची सतत चिंता, हे सगळे प्रवासात सोयीचे ठरत नाही. मात्र, सध्याच्या गॅजेट वर्ल्डमध्ये या अडचणीवर थेट उपाय करणारे एक भन्नाट एआय ट्रान्सलेटर डिव्हाईस आले आहे. हे डिव्हाईस थेट तुमच्या स्मार्टफोनच्या मागे चिकटते आणि क्षणार्धात तुमचा वैयक्तिक दुभाषा बनते. समोरची व्यक्ती कोणत्याही भाषेत बोलू दे, हे एआय ट्रान्सलेटर त्या शब्दांचा अर्थ लगेच समजून घेतो आणि तुम्हाला तुमच्याच भाषेत सांगतो. केवळ भाषांतरच नाही तर हे डिव्हाईस तुमच्याच आवाजात समोरच्या व्यक्तीशी संवाद साधते. म्हणजे तुम्ही इंग्रजीत बोललात तरी समोरच्याला ते फ्रेंच, जर्मन किंवा चायनीज भाषेत तेही तुमच्याच आवाजात ऐकू येईल.
एआय ट्रान्सलेटर वापरणेही अतिशय सोपे आहे. फोनच्या मागे ट्रान्सलेटर चिकटवायचा, संबंधित अॅप ओपन करायचे आणि बोलायला सुरुवात करायची. हातात फोन धरून टायपिंग करण्याची गरज नाही, स्क्रीनकडे वारंवार पाहण्याची गरज नाही. समोरासमोर संवाद असो, फोन कॉल असो, व्हिडीओ कॉल असो किंवा व्हॉटस्अॅपसारख्या अॅपवर चॅट, सगळीकडे तुम्हाला ट्रान्सलेटर भाषांतर करून देईल. आणखी एक आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे व्हॉईस क्लोनिंग. काही सेकंद तुमचा आवाज या एआय ट्रान्सलेटरमध्ये रेकॉर्ड केल्यानंतर हे डिव्हाईस तुमच्या आवाजाची ढब, टोन आणि लय शिकून घेते. त्यानंतर जेव्हा भाषांतर होते, तेव्हा तो अनुवाद परक्या भाषेत असला तरी आवाज तुमचाच वाटतो. त्यामुळे संवाद अधिक नैसर्गिक, आपुलकीचा आणि प्रभावी होतो. व्यावसायिक मीटिंगसाठी गंभीर टोन, तर मित्रांसोबत गप्पांसाठी हलकाफुलका टोन असे वेगवेगळे आवाजही सेट करता येतात.
इंटरनेट नसलेल्या ठिकाणी अडचण येऊ नये म्हणून ऑफलाईन ट्रान्सलेशनची सुविधाही यात आहे. आधीच लँग्वेज पॅक डाऊनलोड करून ठेवल्यास नेटवर्क नसतानाही संवाद सुरू राहतो. त्याचबरोबर मीटिंग रेकॉर्डिंग, ट्रान्सक्रिप्शन, नोटस् तयार करणे अशा अतिरिक्त सुविधा याला आणखी स्मार्ट बनवतात. याच्या बॅटरीबाबत विचार केल्यास साधारण 15 तासांचा वापर एका चार्जमध्ये सहज होतो. आठवडाभर बॅगेत पडून राहिले तरी बॅटरी टिकून असते. एकूणच, हा एआय ट्रान्सलेटर म्हणजे परदेशातील प्रवासात, आपल्याच देशातील दुसर्या कोणत्या शहरात गेल्यानंतर भाषेची भीती दूर करणारा खरा साथीदार आहे. भाषा न समजल्यामुळे होणारा संकोच, गैरसमज आणि अडचणी यामुळे कमी होऊ शकतात. बाजारात अशा एआय ट्रान्सलेटरच्या किमती सुमारे 18 ते 20 हजार रुपयांपासून सुरू होतात.