‘एआय’चा मानसशास्त्रीय प्रभाव (Pudhari File Photo)
संपादकीय

AI Effect On Human Mind | ‘एआय’चा मानसशास्त्रीय प्रभाव

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय हे मानवी संशोधन आणि तंत्रज्ञानाचे मोठे यश मानले जाते.

पुढारी वृत्तसेवा

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय हे मानवी संशोधन आणि तंत्रज्ञानाचे मोठे यश मानले जाते. कामात गती आणि अचूकता आणण्यासाठी विकसित झालेले हे साधन आज जगाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रवेश करत आहे. तथापि, त्याच वेगाने ते मानवी आयुष्याच्या प्रत्येक पातळीवर प्रभाव टाकत असून काही वेळा ते प्रभाव गंभीर आणि चिंताजनकही ठरत आहेत. सुरुवातीला डिजिटल हस्तक्षेपापुरते मर्यादित असलेले एआय आता मानवी मानसशास्त्र, निर्णय प्रक्रिया आणि विचारांपर्यंत पोहोचले आहे.

सुचित्रा दिवाकर

आजची वस्तुस्थिती अशी की, एआय मानवी डिजिटल फूटप्रिंटचा मागोवा घेत आहे. त्यातून मानसशास्त्रीय लक्षणे ओळखत आहे आणि त्यावर आधारित परिणामकारक सामग्री तयार करत आहे. त्यामुळे एआय केवळ मानवी आदेशाचे पालन करत नाही, तर मानवी वर्तन आणि विचारप्रवाह समजून घेत त्यावर प्रभाव टाकण्याची क्षमता विकसित करत आहे. ही क्षमता एकीकडे चमत्कारिक वाटत असली, तरी दुसरीकडे त्यातून मानसिक नियंत्रणाचा धोका समोर येतो. विचारांचे स्कॅनिंग करून वैयक्तिक मानसिकतेला प्रभावित करणे, दिशाभूल करणे किंवा अगदी ब्लॅकमेल आणि दुष्प्रचार करणे अशा शक्यता आता शास्त्रज्ञही मान्य करू लागले आहेत.

एआय आज मानवी जीवनात इतक्या खोलवर रुजले आहे की, त्याच्यासमोर मनुष्य खुजा भासत आहे, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. मानवी भाषेपलीकडील गुंतागुंतीच्या ‘चेन ऑफ थॉट’ प्रक्रियेत विकसित होणारे एआय मॉडेल्स स्वतःच्याच निर्मात्यांना समजणे कठीण झाले आहे. या पारदर्शकतेच्या अभावामुळे एआय कसे निर्णय घेत आहे आणि कोणती प्रक्रिया वापरत आहे, याचे उत्तर मिळणे कठीण होत आहे. परिणामी, ते एका ‘ब्लॅक बॉक्स’प्रमाणे झाले असून त्यातील त्रुटी आणि संभाव्य धोके ओळखणे अवघड झाले आहे.

जगभरातील नामांकित संशोधन संस्था आणि कंपन्यांचे शास्त्रज्ञ स्वतःच या तंत्रज्ञानाबाबत अनिश्चितता आणि धोका व्यक्त करत आहेत. अनेक संशोधकांचे मत आहे की, एआयच्या पुढील टप्प्यात ते मानवी संवेदनशीलता आणि भावनिक प्रतिसाद समजून घेण्यास सक्षम होऊ शकते. मग, प्रश्न उभा राहतो की, एआयने भिन्न आणि अज्ञात बुद्धिमत्ता विकसित केली, तर ते मानवी समाजाला कशी वागणूक देईल? आज याचे ठोस उत्तर कुणाकडे नाही. ‘डीप टेलरिंग’ या प्रक्रियेद्वारे एआय केवळ आपले चेहरे किंवा बोली भाषा ओळखत नाही, तर मानसिक स्थिती आणि मेंदूतील प्रक्रिया समजून घेते. त्यामुळे पर्सनलायजेशनच्या नावाखाली ते विचारांना अरुंद पट्ट्यात बंदिस्त करते. एखाद्या वापरकर्त्याच्या आवडी-निवडी, मानसिक दुर्बलता आणि वैयक्तिक सवयींचे विश्लेषण करून एआय अशी सामग्री पुरवते, जी त्या व्यक्तीच्या मानसिकतेवर थेट परिणाम करते.

एआय केवळ एक डिजिटल साधन न राहता मानवी मानसिकतेशी थेट खेळ करू शकणारे शस्त्र बनू शकते. यामध्ये सर्वात मोठी चिंता म्हणजे, व्यावसायिक हित. नफा कमावण्यासाठी एआयच्या सीमांचे उल्लंघन केले जात आहे. कंपन्या मानवी जीवनावर होणार्‍या परिणामांकडे दुर्लक्ष करत वेगाने नवे मॉडेल विकसित करत आहेत; मात्र याच वेगाने नियमन आणि देखरेख वाढलेली नाही. परिणामी, भविष्यात एआय नियंत्रणाबाहेर जाऊन मानवी समाजावरच हुकूमत गाजवेल, अशी भीती व्यक्त होत आहे. कदाचित एआय मानवी जीवनात मोठा क्रांतिकारी बदल घडवेल, यात शंका नाही; परंतु तो बदल शाश्वत आणि मानवहितकारी ठरेल की संहारक, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT