स्मार्ट ग्लासेसमध्येही अवतरले एआय Pudhari File Photo
संपादकीय

स्मार्ट ग्लासेसमध्येही अवतरले एआय

तुमची स्पीड, तुमचा टर्न घेतानाच्या अँगलपासून सर्व गोष्टी हे स्मार्ट ग्लासेस तुम्हाला सांगेल

पुढारी वृत्तसेवा
आशिष शिंदे

आजकाल फिट राहण्याचा जणू एक नवा ट्रेंडच सुरू आहे. या ट्रेंडमध्ये सायकलिंगचे वेड सध्या सर्वांना लागले आहे. विकेंडला तर्‍हेतर्‍हेचे गिअर असणार्‍या हायटेक सायकल घेऊन रेसिंग करणे हा अनेकांचा आवडीचा छंद झाला आहे; मात्र ही रेस पूर्ण करताना दरवेळी मोकळा, डोंगराळ भाग निवडला जातो; पण हे ट्रॅक जितके रोमांचकारी तितकेच धोकादायकही; मात्र तुम्ही आता खर्‍याखुर्‍या सायकल रेसिंगमध्ये भाग घ्या किंवा मित्रांसोबत विकेंडच्या रेसमध्ये भाग घ्या, तुमची काळजी एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता घेणार आहे. सध्याच्या गॅजेट वर्ल्डमध्ये स्मार्ट ग्लासेसमध्ये एआय अवतरले आहे. हे स्मार्ट ग्लासेस डोंगराळ वाटांवरून सायकल चालवताना तुमच्या सर्व चुका रेकॉर्ड करेल व पुन्हा ती चूक होऊ देणार नाही. तुमची स्पीड, तुमचा टर्न घेतानाच्या अँगलपासून सर्व गोष्टी हे स्मार्ट ग्लासेस तुम्हाला सांगेल.

सध्या अनेक नवनवी हायटेक उपकरणे क्षणागणिक तुमच्या सेवेत दाखल होत आहेत. आता तर एआयचा बोलबाला सुरू आहे. एआयमुळे प्रत्येक उपकरण आणखी स्मार्ट होत चालले आहेत. आपल्या सर्वांना ज्ञात असलेल्या स्मार्ट ग्लासेसमध्येही एआय आले आहे. हे स्मार्ट ग्लासेस तुमच्या डोळ्यावर असले की बस्स! सायकल चालवताना एक अचूक मार्गदर्शक, एक अ‍ॅक्शन कॅमेरा, एक संगीतसखा आणि तुमचा डिजिटल सहप्रवासी म्हणून हे काम करेल. खास सायकलिंगसाठी तयार करण्यात आलेल्या या स्मार्ट ग्लासेसमध्ये देण्यात आलेले भन्नाट फिचर्स तुम्हाला थक्क करून सोडतील.

या ग्लासेसचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये वापरलेले एआय तंत्रज्ञान. या स्मार्ट ग्लासेसमध्ये एआय कॅमेरा बसवला आहे, जो सायकलिंग करताना तुमचा प्रवास व्हिडीओ किंवा फोटोच्या स्वरूपात टिपतो. 120-डिग्री वाईड अँगल लेन्समुळे अधिकाधिक द़ृश्य एका फ्रेममध्ये येते. तुम्ही सायकल चालवत असताना अचानक वळण घेतले, एकदम वेग वाढवला किंवा काही आपत्कालीन स्थिती आली, तर त्या क्षणाचा व्हिडीओ सिस्टीम स्वतःहून रेकॉर्ड करते व सेव्ह करून ठेवते. त्यामुळे तुमच्या चुका तुम्हाला लक्षात येतात व अपघातासारख्या घटना टाळता येतात व पुढील वेळी त्या चुका टाळता येऊ शकतात.

या ग्लासेसच्या काड्यांमध्ये इनबिल्ट स्पीकर्स आहेत, जे इतके स्पष्ट आणि प्रखर आवाज देतात की, गर्दीच्या ठिकाणीही तुम्हाला स्पष्ट आवाज ऐकू येतो. यासाठी इअरफोनची गरजच भासत नाही. फ्रेमवर हलके टॅप करून गाणी ऐकणे, थांबवणे किंवा बदलणे सहज शक्य आहे. यामध्ये हँडस्फ्री व्हॉईस कंट्रोलचाही पर्याय असून, राईडच्या वेळी मोबाईलला हात न लावता सगळं नियंत्रित करता येते. या स्मार्ट ग्लासेसना आयपी 54 प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे ते पावसात, धुळीतही काम करू शकतात. वजनाने हलके आणि डोळ्यांचा नंबर असणार्‍यांसाठी क्लिप-ऑन इन्सर्टस्च्या सोयीसह हे ग्लास उपलब्ध आहेत. या स्मार्ट ग्लासेसच्या किमती 30 ते 40 हजार रुपयांपासून सुरू होतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT