आशिष शिंदे
अनेकदा ऑफिसला, कॉलेजला जायला उशीर होत असताना वाटते हॉलीवूडचा वेगवान सुपरहीरो फ्लॅशसारखी ताकद पायात आली तर किती बरे झाले असते! ट्रॅफिक आणि गर्दीतून पायी वाट काढणे म्हणजे आजकाल सहनशक्तीची कसोटीच; पण आता चालणे म्हणजे केवळ पायांची हालचाल नाही, तर तंत्रज्ञानाचा एक अद्भुत अनुभव ठरणार आहे. कारण, शूजमध्ये देखील आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अवतरले आहे. हे स्मार्ट एआय शूज तुम्हाला फक्त चालायला नाही, तर उडायला शिकवतील.
हे शूज पायात घालताच तुमचा चालण्याचा वेग तब्बल 250 टक्क्यांनी वाढेल. या शूजमधील भन्नाट फीचर्स तुम्हाला थक्क करून सोडतील. हे दिसायला नेहमीच्या शूज सारखेच आहेत; पण याचा लूक हटके आणि स्मार्ट आहे. थोडेसे रोलर शूजसारखे दिसणारे पण पायात चढवले की जणू शरीराला नव्या ऊर्जेचे इंजिन मिळाल्यासारखे वाटेल. चालायला लागला की हे शूज तुमच्याशी संवाद साधतात. पावलांचा वेग, हालचाल, जमिनीच्या पृष्ठभागाचा प्रकार आणि बॅलन्स हे सगळे ते काही सेकंदात समजून घेतात. शूजमध्ये बसवलेले एआय सेन्सर्स तुमच्या चालण्याची पद्धत सतत टिपतात आणि त्यानुसार त्यांचे मोटराईज्ड व्हील्स वेग आपोआप समायोजित करतात. म्हणजे तुम्ही जितके वेगात चालाल, तेवढेच हे शूज तुमच्याबरोबर वेग वाढवतात. चालताना जणू एखाद्या एअरपोर्टच्या मूव्हिंग वॉकवेवरून जातोय असा अनुभव मिळतो. एका पावलानंतर दुसरे पाऊल टाकताना हे शूज तुमचा वेग तब्बल 250 टक्क्यांनी वाढवतात. तरीही त्यांचा कंट्रोल पूर्णपणे तुमच्याच हातात असतो. म्हणजेच तुम्ही चालता तेव्हाच ते अॅक्टिव्ह होतात.
या एआय शूजमध्ये आठ पॉलीयुरेथेन व्हील्स आणि इलेक्ट्रिक मोटर बसवलेली आहे; पण काळजी नको हे स्केटस् नाहीत! उभे राहिल्यावर त्यांची चाके आपोआप लॉक होतात, त्यामुळे तुम्ही स्थिर उभे राहू शकता किंवा सहज जिने चढू-उतरू शकता. चालायला लागलात की ते स्वतः सक्रिय होतात. यात दोन मोडस् आहेत. लॉक आणि शिफ्ट. लॉक मोडमध्ये तुम्ही निश्चल राहू शकता, आणि शिफ्ट मोडमध्ये एआय अल्गोरिदम तुमचा वेग, पृष्ठभाग आणि चालण्याची पद्धत ओळखून शूजला संतुलित ठेवतो. 1.5 तास चार्ज केल्यानंतर हे शूज जवळपास 10 किलोमीटरपर्यंत चालतात. ते कोणत्याही पृष्ठभागावर जसे की शहरातील रस्ते, काँक्रीट, किंवा पेव्हिंग ब्लॉक रस्त्यांवर वापरता येतात.
वजनाने हलके आणि डिझाईन आकर्षक असल्यामुळे ते चालतानाही अडथळा निर्माण करत नाहीत. एआय शूज चालताना फक्त वेगच वाढवत नाहीत, तर तुमचा संतुलन आणि आराम राखतात. चाके लॉक होतात, त्यामुळे स्लिप होण्याची शक्यता कमी होते. चालताना गुडघे किंवा पायावर ताण येत नाही. उलट पावले जणू सहजपणे पुढे सरकतात. त्यामुळे जास्त अंतर चालताना थकवा कमी होतो. हे शूज रोजच्या प्रवासासाठी, फिटनेससाठी किंवा शहरात फिरण्यासाठी आदर्श आहेत. ऑफिस, कॉलेज, मार्केट, कुठेही हे शूज घातले की गर्दी आणि अंतर दोन्ही क्षणात संपेल, हे नक्की. या एआय शूजची किंमत सुमारे 1.15 लाखाच्या घरात आहे.