आशिष शिंदे
अंगावर आदळणारी ऑफिसची टार्गेटस्, घड्याळाच्या काट्यावर पळणारी जीवघेणी स्पर्धा, अपुरी झोप आणि रात्री डोक्यात सतत फेर धरणारे विचारांचे चक्र. आजच्या डिजिटल युगातील ही प्रत्येक माणसाची एक अपरिहार्य; पण अस्वस्थ कहाणी बनली आहे. मनात साचणारा हा अदृश्य ताणतणाव पळवून लावण्यासाठी कोणी ध्यानाचा मार्ग निवडते, तर कोणी मोबाईलमधील ॲप्सचा आधार घेते; पण प्रत्येकवेळी मनाला शांती मिळतेच, असे नाही. शरीराची हीच तडफड ओळखून, आपल्या नर्व्हस सिस्टीमला अवघ्या काही मिनिटांत नैसर्गिकरीत्या शांत करण्यासाठी ‘गॅजेट वर्ल्ड’मध्ये न्यूरोसायन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा एक अद्भुत संगम अवतरला आहे. आपण एरव्ही गळ्यात गाणी ऐकण्यासाठी जसा ब्लूटूथ हेडफोन सहज अडकवतो, अगदी तशीच रचना असणारे हे स्मार्ट नर्व्ह स्टिम्युलेटर गळ्यात घालताच, ते मज्जासंस्थेतील अतिशय संवेदनशील मानल्या जाणाऱ्या व्हॅगस नर्व्हला सूक्ष्म लहरींद्वारे स्पर्श करते आणि अवघ्या काही क्षणात डोक्यातील विचारांचे वादळ शांत करून मनाला कमालीचे रिलॅक्स बनवते.
हे गॅजेट कानाच्या मज्जातंतूंना अतिशय सूक्ष्म आणि सुरक्षित इलेक्ट्रॉनिक लहरी देऊन मज्जासंस्थेला शांत करते. यात रिलॅक्स, स्लीप, रीलिफ, मेडिटेशन, फोकस आणि डायजेस्ट असे ६ विशेष क्लिनिकली प्रूव्हन मोडस् दिले आहेत. वापरकर्त्याच्या शारीरिक स्थितीनुसार योग्य त्या लहरी देऊन रात्रीची झोप सुधारणे, पचनक्रिया सुरळीत करणे आणि कामात एकाग्रता वाढवणे ही कामे हे गॅजेट अत्यंत प्रभावीपणे करते.
हे हाय टेक वेअरेबल गॅजेट वापरणे अत्यंत सोपे आणि दैनंदिन दिनचर्येत सहज बसणारे आहे. हे गॅजेट वापरण्याची पद्धत साधारणपणे आपण नेकबँड स्टाईल ब्लूटूथ हेडफोन वापरतो अगदी तशीच आहे. याच्या मुख्य बॉडीची डिझाईन गळ्याभोवती अडकवण्यासाठी नेकबँडसारखी दिलेली आहे व त्यातून निघणारे लहान सेन्सर क्लिप्स कानावर/कानात अगदी हेडफोनसारखेच फिट बसतात. त्यामुळे फोनचे हेडफोन्स घालून गाणी ऐकावीत, अगदी तितक्याच सहजपणे तुम्ही हे उपकरण कानात लावून ऑफिसमध्ये काम करताना किंवा आराम करताना व्हॅगस नर्व्ह थेरपी घेऊ शकता.
दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे, यातील कंटिन्युअस ट्रॅकिंगची अचूकता. याद्वारे वापरकर्त्याच्या हृदयाची गती, झोपेचा आलेख आणि हार्ट रेट व्हॅरिएबिलिटी (एचआरव्ही) यासारख्या जैविक घटकांवर २४ तास बारीक लक्ष ठेवले जाते. या उपकरणाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, यात दिलेला मल्टी-मॉडल एआय कोच. हा एआय कोच व्हॅगस नर्व्हच्या रिसर्च डेटाबेसवर आधारलेला आहे. याच्या ॲपमध्ये दिलेल्या एआयशी थेट बोलून तुमच्या सध्याच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीची माहिती देऊ शकता. वापरकर्त्याचा ताण नक्की कशामुळे वाढला आहे किंवा झोप का अपुरी झाली आहे. याचे क्रॉस ॲनालिसिस करून हा एआय कोच तुम्हाला कोणत्या मोडमध्ये किती वेळ थेरपी घ्यायची, याचे अचूक आणि वैयक्तिक मार्गदर्शन करतो.
हे गॅजेट दैनंदिन वापरासाठी अत्यंत सोपे आणि कम्फर्टेबल बनवले आहे. ऑफिसच्या कामामध्ये छोटा ब्रेक घेताना किंवा रात्री झोपण्यापूर्वी फक्त काही मिनिटांचे सेशन्स घेऊन तुम्हाला तत्काळ शांतता आणि ताजेतवाने वाटू लागते. या हाय टेक एआय गॅजेट सिस्टीमची किंमत भारतीय चलनात अंदाजे २६ ते ३० हजार रुपयांच्या घरात जाते.