अॅड. प्रशांत माळी, सायबर क्राईमतज्ज्ञ
सध्याच्या फेस्टिव्ह सिझनमध्ये एआयचा वापर करून ग्राहकांची सहजगत्या फसवणूक केली जाण्याची शक्यता आहे. आर्थिक आणि डिजिटल सुरक्षा जपणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. फेस्टिव्हल ऑफरचा मोह ठेवावा; पण फेस्टिव्हल फ्रॉडपासून सावध राहावे. कारण, सावधगिरीच खरी सुरक्षितता आहे.
सणासुदीचा काळ आला की, बाजारपेठा आकर्षक ऑफर्स, डिस्काऊंटस् आणि कॅशबॅकच्या मोहात रंगून जातात. प्रत्येक ई-कॉमर्स साईट, बँक आणि ब्रँड ग्राहकांना बिग सेल, मेगा ऑफर किंवा लिमिटेड टाईम डील अशा घोषणांनी खरेदीकडे खेचतात; पण या डिजिटल उत्सवाच्या आड एक गुप्त, धोकादायक उत्सवही सुरू असतो, तो म्हणजे ‘फेस्टिव्हल फ्रॉड!’ आणि आता या फसवणुकीला नव्या पिढीचं हत्यार मिळालं आहे कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’.
सायबर गुन्हेगार एआयच्या मदतीने अगदी वास्तवासारखे दिसणारे आवाज, व्हिडीओ आणि संदेश तयार करू लागले आहेत. डीपफेक ही संकल्पना याचे जिवंत उदाहरण आहे. गुन्हेगार तुमच्या नातेवाईकांचा किंवा मित्रांचा आवाज आणि चेहरा हुबेहुब क्लोन करून मला आता पैसे हवे आहेत, अडकलो आहे, असे भावनिक कॉल किंवा व्हिडीओ पाठवतात. अनेकदा लोकभावनेच्या भरात पैसे ट्रान्स्फर करून बसतात आणि नंतर कळते की, तो संदेश बनावट होता.
एआयमुळे फिशिंग मेल्स आणि फसवे संदेश अधिक बुद्धिमान झाले आहेत. आधी जिथे फसव्या मेलमध्ये भाषेची चूक किंवा संशयास्पद लिंक दिसायची, तिथे आता एआय चॅटबॉटस्च्या मदतीने अगदी व्यावसायिक दर्जाचे, खरी बँक किंवा सरकारी विभागाकडून आल्यासारखे मेल तयार होतात. वापरकर्त्याने फक्त एकदा क्लिक केलं की, त्याची वैयक्तिक माहिती, कार्ड डिटेल्स किंवा पासवर्ड हॅकर्सच्या हाती जातात. फसवणुकीचा आणखी एक धोकादायक प्रकार म्हणजे टार्गेटेड स्कॅम. सोशल मीडियावरून गुन्हेगार तुमचे फोटो, आवडीनिवडी, खरेदीच्या सवयी आणि पोस्टस् विश्लेषित करतात. मग, ते तुमच्यासाठी खास ऑफर तयार करतात. उदा. तुम्ही अलीकडे मोबाईल शोधत असाल, तर ते तुम्हाला फेस्टिव्हल सवलत नावाने फेक लिंक पाठवतात. त्या लिंकवर क्लिक केल्यावर डेटा चोरी किंवा पेमेंट फसवणूक घडते.
काही गुन्हेगार फेक कस्टमर केअर या नव्या तंत्राचाही वापर करत आहेत. ते एआय-चॅटबॉटस्द्वारे बनावट हेल्प डेस्क तयार करतात. तुम्ही तक्रार नोंदवायला फोन किंवा चॅट केल्यावर ते तुमच्याकडून बँक माहिती, ओटीपी किंवा कार्ड क्रमांक मागतात आणि क्षणार्धात खाते रिकामे होते. एआयचा वापर करून बनवलेले क्यूआर कोड स्कॅम्सदेखील वेगाने वाढत आहेत. दिसायला जेन्युइन वाटणारे क्यूआर कोड प्रत्यक्षात फसवे असतात. तुम्ही स्कॅन करून पेमेंट करता; पण पैसे ज्या खात्यात जायला हवेत तिथे न जाता थेट स्कॅमरच्या खात्यात पोहोचतात.
या सर्व फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी ग्राहकांनी काही सोपी पण महत्त्वाची पावले उचलली पाहिजेत. प्रथम ‘टू गुड टू बी ट्रू’ अशा ऑफरवर कधीही लगेच विश्वास ठेवू नका. कोणतीही ऑफर अत्यंत मोहक वाटत असेल, तर ती बहुतेक वेळा फसवणुकीची असते. दुसरे म्हणजे मल्टिफॅक्टर ऑथेंटिकेशन वापरा. फक्त ओटीपीवर विसंबून न राहता सिक्युरिटी अॅप्स किंवा डिव्हाईस व्हेरिफिकेशन सक्षम ठेवा. तिसरे, खरेदीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटस् किंवा अॅप्सचाच वापर करा. गुगल सर्चवर दिसणार्या जाहिरातींवर क्लिक करू नका. कारण, त्या जाहिरातींच्या मागे अनेकदा बनावट साईटस् दडलेल्या असतात. चौथे, क्यूआर कोड स्कॅन करण्यापूर्वी तो कोणी पाठवला आहे हे तपासा. अनोळखी व्यक्तीकडून आलेला कोड कधीही स्कॅन करू नका. कस्टमर केअर नंबरसाठीही विशेष काळजी घ्या. गुगलवर शोधण्याऐवजी थेट संबंधित कंपनीच्या अधिकृत साईटवरूनच संपर्क क्रमांक मिळवा. सोशल मीडियावर वैयक्तिक माहितीचे अतिरेकी प्रदर्शन टाळा. जितकी माहिती कमी, तितका धोका कमी.
डीपफेक तंत्रज्ञानामुळे वास्तव आणि बनावटपणाच्या सीमारेषा धूसर होत आहेत. एआयच्या युगात खरा स्मार्ट ग्राहक तोच, जो प्रत्येक व्यवहारापूर्वी विचारपूर्वक पाऊल टाकतो. डिजिटल साक्षरतेचा अर्थ फक्त मोबाईल किंवा संगणक चालवता येणे एवढाच मर्यादित नाही. ती म्हणजे तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर कसा करायचा, माहितीचे मूल्यमापन कसे करायचे, फसवणूक कशी ओळखायची आणि डिजिटल नैतिकतेची जाणीव कशी ठेवायची या सर्व गोष्टींची समज. अॅप इन्स्टॉल करा, क्यूआर कोड स्कॅन करा किंवा ओटीपी द्या या वाक्यांमागे कोणता धोका दडलेला आहे, हे अनेकांना समजत नाही. त्यामुळे सायबर फसवणुकीचे सर्वाधिक बळी हे प्रामुख्याने विश्वासाने प्रत्येक डिजिटल सूचना पाळणारे ग्राहक असतात.
यासाठी सर्वप्रथम गरज आहे ती शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर डिजिटल साक्षरता हा विषय अनिवार्य करण्याची. सरकारने सायबर सुरक्षा जागरूकता सप्ताह, राष्ट्रीय डिजिटल साक्षरता मिशन यांसारख्या उपक्रमांद्वारे योग्य दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत; परंतु हे उपक्रम ग्राम पातळीपर्यंत पोहोचले पाहिजेत. प्रत्येक जिल्ह्यात सायबर प्रशिक्षण केंद्रे, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कार्यशाळा, शेतकर्यांसाठी सुरक्षित ऑनलाईन बँकिंग या विषयांवर प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जाऊ शकतात. एखाद्या जाहिरातीमागील फसवणूक ओळखणे, ऑनलाईन व्यवहारातील अटी व शर्ती समजून घेणे किंवा खूप चांगली ऑफर असली, तरी तिची सत्यता तपासणे हे कौशल्य विकसित करण्यासाठी सामुदायिक प्रशिक्षण वर्ग सुरू केले पाहिजेत. सोशल मीडियावर येणार्या प्रत्येक बातमीवर किंवा व्हिडीओवर विश्वास ठेवणं धोकादायक ठरू शकतं. डीपफेक तंत्रज्ञानामुळे बनावट व्हिडीओ आणि ऑडिओ इतके वास्तव वाटतात की, सामान्य नागरिकांना फसवले जाणे सहज शक्य होते. त्यामुळे ‘शेअर करण्याआधी तपासा’ ही सवयप्रत्येक नागरिकात रुजली पाहिजे. सायबर फसवणुकीविरोधात त्वरित कृती करणे हेही ग्राहक शिक्षणाचा भाग आहे.
संशयास्पद कॉल, ई-मेल किंवा ट्रान्सॅक्शन झाल्यास ताबडतोब तक्रार नोंदवणे हे नुकसान टाळण्याचे पहिले पाऊल ठरते. कुठला कॉल किंवा संदेश संशयास्पद वाटला, तर त्वरित तक्रार नोंदवा. भारत सरकारची राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन 1930 वर कॉल करून फसवणुकीची माहिती द्या, पैसे ट्रान्स्फर झाले असल्यास खाते गोठवण्याची विनंती करा. महाराष्ट्रातील नागरिकांनी 1945 या राज्य सायबर हेल्पलाईनवर कॉल करून ईएफआयआर दाखल करावा किंवा ‘सायबर क्राईम डॉट जीओव्ही डॉट इन’वर ऑनलाईन तक्रार नोंदवावी.
(लेखक मुंबई उच्च न्यायालयात वकील आहेत.)