आशिष शिंदे
आजकाल आपल्यापैकी अनेकांच्या हातावर स्मार्टवॉच दिसते. आपण आपली पावले मोजतो, झोप मोजतो; पण खरे सांगायचे, तर लग्नसमारंभात किंवा एखाद्या पार्टीत जाताना त्या रबरी पट्ट्याचे स्मार्टवॉच घालणे जरा विचित्रच वाटते ना? आपल्याला टेक्नॉलॉजी हवी असते; पण आपली स्टाईल बिघडू नये याचीदेखील काळजी असते. नेमकी हीच गरज ओळखून ‘गॅजेट वर्ल्ड’मध्ये आता एक असे भन्नाट गॅजेट आले असून, ते फॅशन आणि टेक्नॉलॉजीची सीमाच पुसून टाकेल. ही जगातील पहिली एआय ज्वेलरी वेअरेबल आहे. हे दिसताना एखादे महागडे आणि सुंदर पेंडंट किंवा ब्रेसलेट वाटते; पण यात दडलेय ते भविष्यातील एआय तंत्रज्ञान. हे गॅजेट दिसायला इतके क्लासी आहे की, ऑफिस असो वा रोमँटिक डेट, हे तुमच्या प्रत्येक आऊटफिटवर शोभून दिसेल.
साधे स्मार्टवॉच फक्त तुमच्या हृदयाचे ठोके, पावले ट्रॅकिंग करतात; पण हे तुमचे मन वाचते. हो, ऐकायला आश्चर्य वाटेल; पण हे गॅजेट मूड ट्रॅकर म्हणून काम करते. दिवसभरात तुम्ही कधी आनंदी होतात, कधी तणावात होतात, तुमची एनर्जी लेव्हल कशी होती, या सगळ्याची नोंद हे गॅजेट ठेवते. हे एआय तुमच्या भावना समजून घेते आणि त्यानुसार तुम्हाला कधी विश्रांतीची गरज आहे किंवा कधी तुम्ही जास्त स्ट्रेस घेत आहात, याची जाणीव करून देते. थोडक्यात, हे केवळ गॅजेट न राहता तुमच्या सुख-दुःखाचा एक सोबती बनते.
याची सर्वात भारी गोष्ट म्हणजे ऑटो-जर्नल फीचर. अनेकदा आपल्याला रोजनिशी लिहायची इच्छा असते; पण कंटाळा येतो. हे गॅजेट दिवसभर तुमची सोबत करते आणि रात्री तुमच्या दिवसाचा, भेटीगाठींचा आणि महत्त्वाच्या क्षणांचा सारांश आपोआप तयार करते. इतकेच नाही, तर हे एआय तुमच्या रिलेशनशिप्सवरही लक्ष ठेवते. तुम्ही कोणाशी कसे बोलताय, तुमच्या आवाजातील चढ-उतार यावरून हे तुम्हाला थोडा ब्रेक घे किंवा शांत राहा, असा सल्ला एखाद्या जवळच्या मित्रासारखा देते.
आता प्रश्न येतो की, हे नाजूक दागिने टिकणार कसे? तर काळजी नको, हे अवघ्या 10 ग्रॅम वजनाचे असले तरी ते मजबूत टायटॅनियमपासून बनलेले आहेत. हे पूर्णपणे वॉटरप्रूफ असून, धुळीचाही यावर परिणाम होत नाही. याची बॅटरी दोन दिवस चालते आणि चार्जिंगसाठी यासोबत एक सुंदर ‘ज्वेलरी बॉक्स’ येतो, जो पॉवरबँकचे काम करतो. प्रायव्हसीचा विचार करता, हे डेटा सेव्ह करत नाही आणि यूजरच्या परवानगीशिवाय काहीही रेकॉर्ड करत नाही. थोडक्यात काय, तर आता दागिने फक्त सौंदर्यासाठी नाही, तर आरोग्यासाठी आणि मनाच्या शांतीसाठीही वापरले जातील, हे नक्की! या भन्नाट एआय ज्वेलरीची किंमत 200 डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात अंदाजे 16 हजार 500 ते 17 हजार रुपयांइतकी असणार आहे. हा खर्च त्या छोट्याशा पेंडंटसारख्या डिव्हाईसचा आहे. ते गळ्यात घालण्यासाठी किंवा हातात ब्रेसलेटसारखे वापरण्यासाठी तुम्हाला त्याची चेन किंवा पट्टा वेगळा घ्यावा लागेल. त्याची किंमत सुमारे अडीच ते चार हजार रुपये असू शकते.