AI Impact on Students | ‘एआय’चा अभ्यासावर घाला! 
संपादकीय

AI Impact on Students | ‘एआय’चा अभ्यासावर घाला!

पुढारी वृत्तसेवा

सचिन पाटील

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’चा वापर सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या अभ्यास करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला आहे. ‘एआय’चा अभ्यासावर होणारा परिणाम सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू दर्शवतो. ‘एआय’ विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार अभ्यासक्रम आणि शिकण्याची पद्धत बदलू शकते. अवघड गणिती सूत्रे किंवा विज्ञानातील क्लिष्ट प्रयोग ‘एआय’ सोप्या भाषेत समजवून सांगते. भाषा बहुभाषिक एआय साधनांमुळे विद्यार्थ्यांना नवीन भाषा शिकणे, व्याकरण सुधारणे आणि उच्चार शुद्ध करणे सोपे झाले आहे. अंध किंवा मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी एआय-आधारित ‘स्पीच-टू-टेक्स्ट’ आणि ‘टेक्स्ट-टू-स्पीच’सारखी साधने शिक्षणाचा मार्ग सुलभ करतात. नकारात्मक बाजूचा विचार केल्यास रेडिमेड उत्तरे आणि गृहपाठ ‘एआय’कडून थेट मिळवल्यामुळे विद्यार्थ्यांची स्वतःची विचार करण्याची आणि तर्क लावण्याची क्षमता कमी होत आहे.

जागतिक स्तरावर विविध नामांकित संस्थांनी केलेल्या संशोधनातून ‘एआय’चे शिक्षणावरील संमिश्र परिणाम समोर आले आहेत. युनेस्कोच्या जागतिक शैक्षणिक अहवालानुसार, एआय हे विचार प्रक्रियेत भागीदार म्हणून वापरले पाहिजे; शॉर्टकट म्हणून नाही. तंत्रज्ञानाच्या अतिवापराने विद्यार्थ्यांचे वाचन आणि सखोल आकलन कौशल्य कमी होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालानुसार, भविष्यातील ८५ टक्के नोकऱ्यांसाठी ‘एआय’ साक्षरता आवश्यक असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शाळेपासूनच ‘एआय’चा योग्य वापर करण्यास शिकणे आवश्यक आहे.

स्टॉकहोम विद्यापीठाच्या डेव्हिड स्ट्रॉमबर्ग यांनी हाँगकाँग विद्यापीठाच्या व्हिक्टर ले आणि यानहुई वू यांनी चीनमधील १२ ते १८ वयोगटातील सुमारे २७,००० विद्यार्थ्यांवर ३० महिने अभ्यास केला. या अभ्यासात गृहपाठ, मासिक परीक्षा आणि प्रवेश परीक्षांच्या डेटाचा समावेश होता. ‘एआय’चा वापर सुरू केल्यानंतर विद्यार्थ्यांचे गृहपाठातील गुण १८ टक्क्यांनी वाढले, तर प्रत्येक असाइनमेंटसाठी लागणारा वेळ ३० टक्क्यांनी कमी झाला. परंतु, जेव्हा हेच विद्यार्थी एआय शिवाय मासिक परीक्षांना बसले, तेव्हा त्यांचे गुण सहा महिन्यांच्या आत २० टक्क्यांनी घटले. ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमकी को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंटने जानेवारी २०२६ मध्ये प्रकाशित केलेल्या अहवालात असाच निष्कर्ष काढला आहे. जिथे ‘एआय’चा वापर संरचनेशिवाय केला जातो, तिथे केवळ कामे सोपवल्यामुळे कोणतीही खरी शिकण्याची प्रगती होत नाही.

विद्यार्थी समजून न घेता ‘एआय’द्वारे केलेले प्रोजेक्टस्‌ जमा करत आहेत. यावर उपाय म्हणून भारतीय तज्ज्ञांनी परीक्षा पद्धतींमध्ये तोंडी परीक्षा, सादरीकरणे आणि प्रात्यक्षिक शिक्षणावर अधिक भर देण्याची शिफारस केली आहे. असाईनमेंटस्‌ एआय कडून करून घेतल्यामुळे विद्यार्थ्यांची विचार करण्याची आणि संशोधन क्षमता कमी होत आहे. प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी ‘एआय’वर अवलंबून राहिल्याने विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती, कल्पकता मंदावत चालली आहे. अनेकदा एआय साधने चुकीची किंवा काल्पनिक माहिती एआय खरी म्हणून सादर करतात. युनेस्कोच्या ‘ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग रिपोर्ट’नुसार, शिक्षण क्षेत्रात एआय उपयुक्त असले, तरी मानवी शिक्षकाची जागा ते घेऊ शकत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT