नवी दिल्लीच्या भारत मंडपममध्ये भरलेला ‘एआय इम्पॅक्ट समीट’ हा ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’शी संबंधित तंत्रज्ञानाचा महाकुंभमेळा अवघ्या जगाचेच लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. गलगोटिया युनिव्हर्सिटीने श्वानरूपातील चिनी रोबो ‘मेक इन इंडिया’च्या बॅनरखाली ठेवून या भव्यदिव्य आयोजनाला गालबोट लावण्याचाच ‘नसता उद्योग’ केला; पण इतक्या मोठ्या समीटच्या आयोजनावर या एकाच कारणामुळे एकदम फुली मारण्याचीही अजिबातच आवश्यकता नाही.
जगाच्या पाठीवरील शंभर देशांचे प्रतिनिधी सहभागी झालेल्या या नव्या युगातील महासमीटचे जगभरातून कौतुक होत आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. हा निश्चितच भारतासाठी अभिमानाचाच विषय आहे. समीटमध्ये सहभागी झालेल्या अनेक राष्ट्रप्रमुखांनी तसेच बड्या टेक कंपन्यांनी, पदाधिकाऱ्यांनी या समीटच्या आयोजनाची तसेच भारताच्या या क्षेत्रातील प्रगतीची मुक्तकंठाने प्रशंसा केलेली आहे, त्याकडे डोळेझाक करून चालणार नाही. या समीटमध्ये भारताच्या अवघ्या आठ वर्षांच्या ‘एआयतज्ज्ञा’नेही जगाचे लक्ष वेधून घेतले व भारताचे भविष्य कसे आहे, याचे चित्र या मुलाच्या रूपाने जगाने पाहिले!
या मुलाचे नाव आहे रणवीर सचदेवा. आठ वर्षांचा रणवीर हा देशातील सर्वात लहान वयाचा ‘एआयतज्ज्ञ’ आहे. ‘एआय समीट’मध्ये तो सर्वात लहान वयाचा ‘कीनोट स्पीकर’ ठरला आणि त्याच्या अभ्यासपूर्ण भाषणाचेही सर्वांनी कौतुक केले. आपल्या भाषणात रणवीरने प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाची सांगड आधुनिक तंत्रज्ञानाशी घातली. एआय विकसित करण्यासाठी वेगवेगळे देश कशाप्रकारे वेगवेगळ्या रणनीती अवलंबत आहेत, हे त्याने स्पष्ट केले. तो म्हणाला की, आज जे तंत्रज्ञान विकसित होत आहे, ‘त्याचे भविष्य आमची पिढी ठरवेल.’ त्याच्या मते, केवळ मिलेनियल्सच नाही, तर ‘जेन झी’ आणि ‘जेन अल्फा’ हे खरे बदल घडवून आणणारे असतील. एआय आपल्या सर्वांचे जीवन मोठ्या प्रमाणात बदलून टाकेल, असेही रणवीरने नमूद केले.
रणवीरने आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरही आपली ओळख निर्माण केलेली आहे. 23 सप्टेंबर 2024 रोजी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात आयोजित ‘यूएनजीए समीट ऑफ द फ्युचर’मध्ये तो सर्वात लहान वयाचा सहभागी व्यक्ती होता. 2023 मध्ये त्याने ‘ॲपल’चे सीईओ टिम कुक यांच्यासमोर आपली ‘स्विफ्ट’ प्रोग््राामिंग कौशल्ये दाखवली. दिल्लीतील ॲपल स्टोअरच्या उद्घाटनादरम्यान त्याला ही संधी मिळाली होती. त्यावेळी तो अवघ्या पहिलीत शिकत होता. टिम कुक त्याच्या प्रतिभेने इतके प्रभावित झाले की, त्यांनी रणवीरला त्याच वर्षी जूनमध्ये आयोजित ‘वर्ल्डवाईड डेव्हलपर्स कॉन्फरन्स’ साठी आमंत्रित केले.
रणवीरने आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर एक पुस्तकही लिहिले आहे, ज्याचे नाव ‘आर यू बॉर्न वुईथ एआय?’ असे आहे. या पुस्तकात त्याने जबाबदार एआय आणि तरुणांची भूमिका यावर आपले विचार मांडले आहेत. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनीही त्याच्या पुस्तकाचे कौतुक केले. भारताचे भविष्य खरोखरच अशा मुलांच्या हातात सुरक्षित आहे!