- तानाजी खोत
ऑस्ट्रेलियाच्या सरकारी आरोग्य विभागाच्या वेबसाईटवर एका प्रगत एआय इंजिनने घुसखोरी केली आणि धक्कादायक बाब म्हणजे या घटनेची माहिती संबंधित यंत्रणेला तब्बल तीन महिन्यांनंतर नुकतीच देण्यात आली. हे कृत्य डार्क वेबवरील एखाद्या अज्ञात हॅकरने नाही, तर एआय जगतातील महासत्ता मानल्या जाणाऱ्या आघाडीच्या ओपन एआय या टेक कंपनीच्या प्रक्रियेतून घडल्याचे समोर आल्याने संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. थेट नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या सरकारी डेटाबेसवर झालेला हल्ल्यामुळे जग आता अधिकृतरीत्या ‘वेपनायझेशन ऑफ टेक’च्या अत्यंत धोकादायक टप्प्यावर पोहोचले असल्याचे सिद्ध झाले आहे.
आजवर सायबर हल्ले मानवी कौशल्यावर आणि वेळेवर अवलंबून असत; मात्र आता ‘एजंटिक एआय’ने हे चित्र पूर्ण बदलले आहे. स्वायत्त एआय मॉडेल्स मानवी हस्तक्षेपाशिवाय संपूर्ण देशाची नागरी जीवनरेखा रुग्णालये, वीजपुरवठा ग्रिड्स, विमान वाहतूक आणि बँकिंग नेटवर्क काही सेकंदांत भेदून ठप्प करू शकतात. अणुबॉम्बचा स्फोट झाला, तर उपग्रहावरून लगेच दिसतो; पण एआय-प्रणित सायबर घुसखोरी कोणी केली, डेटा कुठे गेला आणि तो कशासाठी वापरला गेला, हे शोधणे तांत्रिकदृष्ट्या प्रचंड गुंतागुंतीचे असते.
एआयच्या या धोक्याच्या आडून आता जागतिक राजकारणात नवा भूराजकीय डाव मांडला जात आहे. २००३ मध्ये इराकवर हल्ला करताना 'त्यांच्याकडे रासायनिक संहारक शस्त्रे आहेत' हा सोयीस्कर बागुलबुवा उभा केला गेला होता. पुढे त्या दाव्यात तथ्य आढळले नाही, तरी एका देशाचा विध्वंस झाला. येत्या काळात अशीच नवी खेळी खेळली जाण्याची शक्यता आहे. ज्या महासत्तांच्या देशांत अशा कंपन्या आहेत, त्या स्वतः अब्जावधींचे सायबर प्रकल्प चालवणार; मात्र स्वतंत्र परराष्ट्र धोरण बाळगणाऱ्या विकसनशील देशावर थेट संशयाचा शिक्का मारून 'हा देश आक्रमक सायबर वेपन्स बनवत आहे' असे लेबल लावले जाईल. या नव्या ‘टुम’च्या आडून चिप्स, हार्डवेअर आणि तंत्रज्ञान नाकेबंदी लादून ‘डिजिटल वसाहतवाद’ आणि ‘टेक- अस्पृश्यता’ लादण्याचा हा उघड प्रयत्न होताना दिसत आहे.
म्हणूनच जगाला आता एका न्याय्य ‘सायबर नॉनप्रॉलिफरेशन’ कराराची तातडीने गरज आहे; मात्र हा करार एकतर्फी नसावा. अशी अपेक्षा आता ग्लोबल साऊथचे देश व्यक्त करत आहेत. सर्वात दिलासादायक बाब म्हणजे, या अभूतपूर्व संकटावरचा खरा उतारा ‘एआय’ तंत्रज्ञानच ठरणार आहे. विषावर जसे विषच उतारा ठरते, तसेच आक्रमक अल्गोरिदमचा मायक्रोसेकंदांतील मुकाबला करण्यासाठी मानवी नियंत्रणाखालील ‘डिफेन्सिव्ह एआय’ हीच सर्वात भक्कम ढाल ठरेल. हे बचावात्मक एआय मॉडेल्स अब्जावधी डेटा पॅकेट्स तपासून सिस्टीममधील त्रुटी हल्ला होण्याआधीच स्वयंचलितरीत्या दुरुस्त करू शकतील. जगातील सर्वात मोठा आणि सर्जनशील कोडिंग टॅलेंट पूल आज भारताकडे आहे. सिलिकॉन व्हॅलीच्या प्रयोगशाळांपासून ते बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी पदांपर्यंत भारतीय बुद्धिमत्तेचा प्रभाव आहे; परंतु विसाव्या शतकातील अण्वस्त्र स्पर्धेप्रमाणेच एकविसाव्या शतकात ‘सायबर आणि एआय नॉनप्रॉलिफरेशन’चा बडगा उगारून भारतासारख्या उदयोन्मुख महासत्तेची कोंडी करण्याचा एक चतुर भूराजकीय डाव आखला जाऊ शकतो. त्यावर मात करून आपली सार्वभौम एआय यंत्रणा उभी करणे हे भारतासमोरील या पुढील काळातले आव्हान असेल.