आशिष शिंदे
सकाळी उठल्यावर दात घासणे ही आपल्या रोजच्या दिनचर्येतील अत्यंत साधी; पण तितकीच महत्त्वाची सवय! दातांचे आरोग्य बिघडले की, त्याचा थेट परिणाम हृदयविकार आणि मधुमेहासारख्या गंभीर आजारांवर होतो, हे वैद्यकीय विज्ञानाने आधीच सिद्ध केले आहे; पण रोज सकाळी दात घासताना आपण तोंडाचा प्रत्येक कोपरा खरोखरच स्वच्छ करतो का, की नकळत काही जागा अस्वच्छच राहतात, हा प्रश्न नेहमीच अनुत्तरित असायचा. याच गूढ प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आणि ओरल हेल्थकेअरच्या दुनियेत क्रांती घडवण्यासाठी आता चक्क टूथब्रशमध्येच ‘एआय’ अवतरले आहे! एका दिग्गज ब्रँडने लाँच केलेला हा हाय टेक टूथब्रश केवळ दात स्वच्छ करत नाही, तर तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून दात घासण्याच्या योग्य पद्धतीचे थेट मार्गदर्शन करतो.
हा हायटेक टूथब्रश हातामध्ये धरताच त्यातील प्रगत ‘एआय’ आणि मोशन सेन्सर्सचे जाळे सक्रिय होते. दात घासताना तुम्ही ब्रश तोंडाच्या कोणत्या कोपऱ्यात, किती कोनात आणि किती वेगाने फिरवत आहात, याचा अचूक मागोवा हे एआय तंत्रज्ञान प्रतिसेकंद घेत असते. या ब्रशवर दिलेल्या विशेष माऊथ मॅप आणि लाईट रिंगच्या मदतीने तोंडाचा कोणता भाग स्वच्छ झाला आहे आणि कुठला कोपरा घासायचा राहिला आहे, याचे थेट दृश्य चित्र ब्रशच्या हँडलवर उमटते. तुम्ही घाईघाईत दातांवर किंवा हिरड्यांवर जास्त जोर लावला, तर हे एआय लगेच ते ओळखून ब्रशची फिरण्याची तीव्रता आपोआप कमी करते. थोडक्यात, एखाद्या निष्णात दंतवैद्यकाने शेजारी उभे राहून मार्गदर्शन करावे, अगदी तसाच अचूक आणि सुरक्षित दात घासण्याचा अनुभव हे एआय तंत्रज्ञान तुम्हाला देते.
साध्या टूथब्रशच्या तुलनेत हा स्मार्ट ब्रश तब्बल २० पटीने दातांवरील पिवळट थर (प्लाक) काढून टाकतो आणि अवघ्या सहा आठवड्यांत हिरड्या १५ पटीने अधिक सुदृढ बनवतो. अनेकदा लोक घाईघाईत किंवा ताकदीने दात घासतात, ज्यामुळे हिरड्यांना इजा पोहोचते. ही चूक टाळण्यासाठी यात या ब्रशमध्ये स्मार्ट प्रेशर सेन्सिंग तंत्रज्ञान दिले आहे. दात घासताना जर तुम्ही जास्त जोर लावला, तर ब्रशची तीव्रता आपोआप कमी होते आणि लाईट रिंगद्वारे त्वरित अलर्ट मिळतो. यात त्यांच्या गरजेनुसार ८ वेगवेगळे मोडस् आणि ३ तीव्रतेच्या लेव्हल्स निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. या स्मार्ट ब्रशमधील सॉनिकेअर फ्लुईड ॲक्शन प्रणाली दातांच्या मधोमध आणि हिरड्यांच्या कडेला द्रवाचे सूक्ष्म लहरी प्रवाह सोडते. यामुळे ब्रशचे तंतू न पोहोचणाऱ्या कठीण भागातील बॅक्टेरिया सहज बाहेर फेकले जातात. विशेष म्हणजे, या नव्या जनरेशनच्या मोटारमुळे दात घासताना अत्यंत कमी आवाज होतो, ज्यामुळे एक अतिशय शांत आणि आरामदायी अनुभव मिळतो. याच्या आकर्षक हँडलवर दिलेले पर्याय फक्त स्वाईप करून बदलता येतात, ज्यामुळे हे गॅजेट वापरणे सोपे ठरते.
याच्या ब्रश हेडसाठी ७० टक्के बायो बेस्ड प्लास्टिक वापरले असून, संपूर्ण पॅकेजिंग कागदी स्वरूपातील आहे. तसेच, याच्या बॅटरीची रचनाही सहज दुरुस्त किंवा रिप्लेस करता येईल अशी आहे. ब्रशसोबत स्टाईलिश रिचार्जेबल ट्रॅव्हल केस आणि लक्झरी चार्जिंग ग्लास मिळतो, ज्यामुळे तुमच्या बाथरूमच्या सौंदर्याला एक प्रीमियम लूक मिळतो. हे हायटेक गॅजेट आंतरराष्ट्रीय बाजारात आणि प्रमुख रिटेल स्टोअर्सवर टप्प्याटप्प्याने उपलब्ध केले जात आहे. भारतीय चलनात याची किंमत सुमारे ३५ हजार रुपयांपासून सुरू होते आणि मॉडेलनुसार ती ६० ते ७० हजार रुपयांपर्यंत जाते.