आशिष शिंदे
कोणाचा लाडका टॉमी, कोणाचा रुबाबदार रॉकी, तर कोणाची अल्लड स्विटी. घराच्या उंबरठ्यावरून आत पाय ठेवताच शेपूट हलवत अंगावर झेपावणारा श्वान हा केवळ एक पाळीव प्राणी उरत नाही, तर तो कुटुंबाचा एक अविभाज्य, लाडका आणि जिव्हाळ्याचा सदस्य बनून जातो. घरातल्या प्रत्येकाचा मूड सांभाळणारा हा अबोल मित्र माणसाला नि:स्वार्थी प्रेमाची व्याख्या शिकवतो; पण याच मुक्या प्राण्यांचे दुखणे समजून घेणे हे प्रत्येक ‘पेट पेरेंट’समोरील सर्वात मोठे आव्हान असते. पोटात होणारी कळ असो, अंगाला सुटलेली खाज असो वा आतून पोखरत जाणारी अस्वस्थता. प्राण्यांना आपली व्यथा शब्दात मांडता येत नाही. पाळीव प्राण्यांच्या याच मूक वेदनेला वाचा फोडण्यासाठी ‘गॅजेट वर्ल्ड’मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा एक क्रांतिकारी आणि अत्यंत संवेदनशील आविष्कार अवतरला आहे.
‘एआय-पॉवर्ड स्मार्ट कॉलर’ लाडक्या श्वानाच्या दैनंदिन वर्तनावर, हालचालींवर आणि आरोग्यावर २४ तास अत्यंत बारीक लक्ष ठेवतो. एखाद्या निष्णात डॉक्टरप्रमाणे हा पट्टा तुमच्या पाळीव मित्राच्या शरीराची प्रत्येक भाषा अचूक वाचून त्याचे विश्लेषण करतो. या स्मार्ट कॉलरची करामत थक्क करणारी आहे. श्वान दिवसभरात किती पावले चालला किंवा किती वेळ शांत झोपला, या प्राथमिक नोंदींपलीकडे जाऊन हा पट्टा त्याच्या सूक्ष्म हालचाली अचूक टिपतो. श्वान दिवसातून किती वेळा भुंकला, त्याने स्वतःचे शरीर किती वेळा चाटले, अंगाला किती वेळा खाजवले, तसेच त्याने वेळेवर किती अन्न खाल्ले आणि किती पाणी प्यायला, या दैनंदिन बदलांचा हा पट्टा तब्बल ८० टक्के अचूकतेने मागोवा घेतो.
पाळीव प्राण्यांच्या वर्तनात अचानक झालेला कोणताही सूक्ष्म बदल, जसे की पाण्याचे प्रमाण कमी होणे किंवा खाजवणे वाढणे. हे भविष्यातील मोठ्या आजाराचे प्राथमिक लक्षण असू शकते. हा कॉलर नेमकी हीच बाब अचूक हेरून आजार बळावण्याआधीच मालकाच्या मोबाईलवर थेट सावधगिरीचा इशारा देतो. आरोग्यासोबतच सुरक्षिततेच्या आघाडीवरही या गॅजेटने मोठी झेप घेतली आहे. यामध्ये दुप्पट संवेदनशील असणारी प्रगत ‘जीपीएस’ प्रणाली बसवण्यात आली आहे. अनेकदा खेळण्याच्या नादात किंवा फटाक्यांच्या आवाजाने घाबरून श्वान घराबाहेर पळतात आणि हरवतात. अशावेळी दुर्गम भागात किंवा कमी नेटवर्कच्या ठिकाणीही हा पट्टा काही सेकंदांत श्वानाचे नेमके लोकेशन शोधून काढतो. शिवाय, यात थेट स्मार्ट वॉचचे इंटिग्रेशन दिलेले असल्याने, मोबाईल खिशातून बाहेर न काढता केवळ मनगटावरील घड्याळाकडे पाहून मालकाला आपल्या पाळीव श्वानाच्या प्रत्येक हालचालीची रिअल टाईम माहिती एका क्लिकवर मिळते.
विशेष म्हणजे, याच्या ॲपमध्ये कुत्र्याचे जुने वैद्यकीय रिपोर्टस्, लसीकरणाचे वेळापत्रक आणि औषधांच्या चिठ्ठ्या सुरक्षित ठेवण्याची सोय आहे. एआय या सर्व कागदपत्रांचे विश्लेषण करून जुना इतिहास आणि सध्याचे वर्तन यांचा ताळमेळ घालते, ज्यामुळे डॉक्टरांना योग्य निदान करणे अतिशय सोपे जाते. डिझाईनचा विचार केला, तर हा पट्टा अत्यंत स्लिम, वजनाने हलका, वॉटरप्रूफ आणि २४ तास परिधान करण्यासाठी अत्यंत आरामदायक आहे. एकदा चार्ज केल्यावर याची बॅटरी तब्बल तीन महिने अविरत चालते. जागतिक बाजारपेठेत हे गॅजेट सदस्यत्व मॉडेलवर उपलब्ध करण्यात आले असून, याचे मासिक शुल्क भारतीय चलनात १,३३० ते १,३५० रुपयांच्या दरम्यान आहे. येत्या काही दिवसांत हा भन्नाट स्मार्ट कॉलर भारतातदेखील उपलब्ध होईल.