आशीष शिंदे
आपल्या अंगणात असो किंवा घराच्या खिडकीत, प्रत्येकजण पक्ष्यांसाठी एक वाटी दाणे आणि पाणी ठेवताना दिसतो. इतकेच काय, तर अनेकजणांची त्या रोज येणार्या पक्ष्यांशी जवळीकता वाढते. ते पक्षी रोज ठरलेल्या वेळेला येतात, दाणे खातात आणि थोडा वेळ किलबिलाट करून परत जातात. अशा या साध्या पण सुंदर नात्याला आता तंत्रज्ञानाचा नवा आयाम मिळाला. गेल्या काही वर्षांत ‘स्मार्ट गार्डनिंग’ आणि ‘स्मार्ट होम’ या संकल्पनांना प्रचंड वेग आला. यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) निसर्गाशी नातं जोडणार्या क्षेत्रांमध्येही दिसू लागली आहे. यामुळेच सध्याच्या गॅजेट वर्ल्डमध्ये अंगणात पक्ष्यांना दाणे घालण्यासाठी ठेवला जाणारा साधा फीडरही आता स्मार्ट झाला आहे. हा अत्याधुनिक फीडर तुमच्या अंगणात किंवा घराच्या खिडकीत येणार्या पक्ष्यांना अन्न तर देतोच; शिवाय त्यांच्या हालचाली, प्रजाती, येण्या-जाण्याची वेळ अशा सगळ्या माहितीचे रेकॉर्ड ठेवतो.
या स्मार्ट फीडरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये बसवलेली एआय प्रणाली. जगभरातील सुमारे 10 हजार पक्ष्यांच्या प्रजाती हा फीडर अचूक ओळखू शकतो. त्यामुळे पक्ष्यांविषयी उत्सुकता असलेल्या निसर्गप्रेमींसाठी, संशोधकांसाठी तसेच शालेय मुलांसाठी हा फीडर जणू एक शैक्षणिक प्रयोगशाळा ठरतो. एखाद्या चिमणीपासून ते दुर्मीळ पाहुण्या पाखरापर्यंत प्रत्येकाची माहिती तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसते. फीडरमध्ये बसवलेला वाय-फाय अँटेना हे त्याचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. तुम्ही घराबाहेर असलात तरी मोबाईल अॅपद्वारे सहज लॉगिन करून अंगणात कोणते पाहुणे पक्षी आले आहेत हे थेट पाहता येते. पक्ष्यांचे फोटो, व्हिडीओ आणि अगदी त्यांच्या नियमित येण्या-जाण्याची वेळही अचूक नोंदवली जाते. म्हणजेच तुमचे अंगण जणू एक स्मार्ट बर्ड वॉचिंग सेंटर बनते.
ऊर्जेच्या बाबतीत हा फीडर सेल्फ सस्टेनेबल आहे. 5000 एमएएच बॅटरी आणि 3 वॅट सोलर पॅनेलमुळे एकदा बसवल्यानंतर तो सतत कार्यरत राहतो. उन्हाळा, पावसाळा किंवा थंडी; हवामान कसेही असो, फीडर बंद पडेल अशी काळजी राहात नाही. ‘सेट इट अँड फरगॉट इट’ या तत्त्वावर काम करणारे हे तंत्रज्ञान घरातील ज्येष्ठ सदस्यांनाही सोयीचे ठरते. याचे इन्स्टॉलेशनही अगदी सोपे आहे. पक्ष्यांच्या छोट्या घरासारखा दिसणारा हा फीडर आकर्षक डिझाईनमध्ये उपलब्ध आहे. यात अन्न व पाणी ठेवता येते. पक्षी आल्यानंतर ते खाताना एआय कॅमेरा आपोआप त्यांना टिपतो आणि त्यांच्या हालचालींची नोंद ठेवतो. अशा स्मार्ट बर्ड फीडरच्या किमती साधारणपणे 15 ते 20 हजार रुपयांपासून सुरू होतात. हे गॅजेट तुमच्या अंगणाला एक वेगळाच दर्जा देते.