AI Kitchen Sink | किचन सिंकमध्ये अवतरले ‘एआय’! 
संपादकीय

AI Kitchen Sink | किचन सिंकमध्ये अवतरले ‘एआय’!

पुढारी वृत्तसेवा

आशिष शिंदे

ऑफिसमधील कामाचे वाढते तास, दिवसभराची धावपळ आणि संध्याकाळी थकून, भागून घरी परतल्यावर किचन सिंकमध्ये पडलेला खरकट्या भांड्यांचा ढीग पाहताच अनेकांच्या अंगावर अक्षरशः काटा येतो. कितीही कंटाळा आला तरी पोटाची भूक भागवण्यासाठी जेवणाची तयारी करावीच लागते. अशावेळी स्वयंपाकघरातील सर्वात उपेक्षित कोपरा म्हणजे ‘किचन सिंक.’ जिथे केवळ खरकटी भांडी घासणे किंवा नळाखाली भाज्या धुण्यापलीकडे कोणतीही कल्पकता आजवर पोहोचली नव्हती; पण याच सिंकमधून भांडी स्वच्छ करण्यासाठी आपोआप गरम पाणी मिळाले आणि नळाखाली तुम्ही नेमकी कोणती भाजी धुवत आहात हे अचूक ओळखून, त्यापासून कोणकोणत्या चवदार रेसिपीज बनवता येतील याचे मार्गदर्शन खुद्द सिंकनेच केले तर, नवलंच वाटेल ना? पण एखाद्या हॉलीवूड चित्रपटातील सायन्स फिक्शन गॅजेटप्रमाणेच, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या झंझावातात आता किचन सिंकचे रूपडे पूर्णपणे पालटले आहे. ‘गॅजेट वर्ल्ड’मध्ये नुकतेच अवतरलेले हे जगातील पहिले एआय पॉवर्ड स्मार्ट सिंक आहे. हा सिंक म्हणजे निव्वळ पाण्याचा नळ नसून, संपूर्ण स्वयंपाकघराचा ताबा घेणारे एक हाय टेक डिजिटल नियंत्रण केंद्र आहे.

आपल्या नजरेसमोर ‘हाय टेक सिंक’ म्हटले की, केवळ फॅन्सी डिझाईनचा नळ, पाण्याचा आकर्षक फ्लो किंवा गरम, थंड पाण्याचे पर्याय एवढीच मर्यादित व्याख्या येते; पण हे नवे एआय सिंकमधील फीचर्स तुम्हाला थक्क करून सोडतील. या सिंकमध्ये दिलेले एआय व्हिज्युअल सेन्सर्स तुम्ही नळाखाली धुत असलेल्या भाज्या किंवा मांसाहाराची अचूक ओळख पटवतात आणि क्लाऊडवरील १५ हजारांहून अधिक रेसिपीजमधून त्यापासून काय आणि कसे शिजवायचे, याचे थेट टचस्क्रीनवर स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन करतात. ‘लाईफस्टाईल लार्ज लँग्वेज मॉडेल’ आणि अत्याधुनिक कॉम्प्युटर व्हिजन तंत्रज्ञानाने सज्ज असलेले हे सिंक स्वयंपाकाची तयारी, स्वच्छता आणि अन्‍न शिजवण्याच्या प्रक्रियेला एकाच धाग्यात गुंफते. ‘मला फक्त एक तास द्या, मी तुम्हाला उत्तम शेफ बनवेन,’ या अनोख्या संकल्पनेवर आधारलेले हे उपकरण स्वयंपाक न येणाऱ्या नवशिक्यापासून ते गृहिणींपर्यंत सर्वांचा स्वयंपाकघरातील वावर अत्यंत सुसह्य आणि रंजक बनवते.

स्वयंपाकघरात काम करताना हात ओले किंवा मसाल्यांनी भरलेले असतात, ही अडचण ओळखून यामध्ये ‘हँडस्‌-फ्री व्हॉईस असिस्टंट’ आणि स्मार्ट टचस्क्रीनची जोड देण्यात आली आहे. आवाजाच्या एका इशाऱ्यावर सिंकमधील ही टच स्क्रीन काम करते. भांड्यांच्या आवाजात किंवा मिक्सरच्या गोंधळातही यूजरचा आवाज हे अचूक ओळखते. हा एआय कोच तुम्हाला एकावेळी दोन पदार्थ कसे बनवायचे, गॅसची आच किती ठेवायची आणि प्रत्येक टप्प्यावर कोणती कृती करायची, याचे प्रत्यक्ष मार्गदर्शन करतो. एखाद्या निष्णात मार्गदर्शकाप्रमाणे हा व्हर्च्युअल शेफ तुमच्या सोबतीला उभा राहतो.

स्वयंपाकघरात कोणता कच्चा माल किती दिवस शिल्लक आहे, याची स्वयंचलित नोंद ठेवून ते मोबाईलवर किराणा सामानाची यादीदेखील या सिंकमधील एआय तयार करून देते. याशिवाय, काम करताना कंटाळा येऊ नये म्हणून संगीत आणि व्हिडीओ मनोरंजनाची व्यवस्थाही यातील स्मार्ट स्क्रीनवर उपलब्ध आहे. हे हायटेक किचन सिंक आगामी काही महिन्यांत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल, तेव्हा याची अधिकृत किंमत आणि व्हेरिएंटस्‌ जाहीर केले जातील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT