जगातील दहशतवादास जे दोन देश मुख्यत्वे जबाबदार आहेत, त्यात अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांचा समावेश होतो. 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेतीच्या आर्थिक सामर्थ्याचे प्रतीक वर्ल्ड ट्रेड सेंटरचे जुळे मनोरे ‘अल कायदा’च्या दहशतवाद्यांनी विमानांच्या साहाय्याने उद्ध्वस्त केले. त्यानंतर अमेरिकेने ‘अल कायदा’च्या तळांवर अफगाणिस्तानात तुफान बॉम्बहल्ले केले. त्याअगोदर ऑगस्ट 1998 मध्ये ‘अल कायदा’ने टान्झानिया आणि केनियात अमेरिकेच्या वकिलातींवर हल्ले केले होते. लादेन, अल जवाहिरी, अहमद ताहा, शेख मीर हमजा या दहशतवाद्यांनी अमेरिकेविरुद्ध फतवा जारी केला होता. अरब प्रदेशावर अमेरिकी लष्कराचा ताबा, इराकवर आर्थिक निर्बंध आणि इस्रायलला अमेरिका देत असलेले पाठबळ, ही तीन कारणे त्यामागे होती. वास्तविक, अफगाणिस्तानात लादेन व तालिबानला अमेरिकेनेच प्रोत्साहन दिले होते.
1980 च्या दशकारंभी सोव्हिएत रशियाने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर रशियाला नामोहरम करण्याच्या उद्देशाने अमेरिका आणि पाकिस्तानने अफगाणिस्तान आणि मध्य पूर्व आशियातील बंडखोरांसाठी लष्करी प्रशिक्षण तळ उभे केले. त्यातूनच तालिबानचा उदय झाला. 1980 च्या दशकाच्या अखेरीस रशियाने कब्जा सोडल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला आणि या शक्तींवर कोणाचेच नियंत्रण राहिले नाही. पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद या संघटनांना तालिबानचेही पाठबळ मिळाले. मात्र, त्यानंतर अमेरिकेने पाकिस्तान व अफगाणिस्तानमध्ये कळसूत्री सरकारे स्थापन केली.
काही वर्षांपूर्वी अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर तो पुन्हा तालिबानी राजवटीच्या ताब्यात गेला. वास्तविक, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हे दोन्ही दहशतवादाला खतपाणी घालणारे देश. त्यामुळे त्यांच्यात नैसर्गिक मैत्री असली पाहिजे, अशी अपेक्षा होती. परंतु, आश्चर्य म्हणजे, दहशतवादाच्या मुद्द्यावरून तालिबानसोबत सुरू असलेल्या पाकच्या वाटाघाटी अयशस्वी ठरल्या आहेत. पाकिस्तानने बुधवारी तालिबान दोहा करारातील आश्वासन पाळत नसल्याचा आरोप केला. अफगाणी दहशतवादी पाकमध्ये धुमाकूळ घालत असून, त्यांना काबूत आणण्यासाठी सहकार्य करा, असा पाकचा आग्रह होता.
तालिबानी राजवट पाकविरोधी दहशतवाद्यांना मदत करतेे, असा आरोप पाकिस्तानचे माहिती व प्रसारणमंत्री अताउल्ला तरार यांनी केला. पाकिस्तानात जे अफगाण घुसखोर शिरले आहेत, त्यांना शोधून देशाबाहेर हाकलून द्या, असे पाकच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरयम नवाज म्हणाल्या. तालिबानी उघडपणे देवबंदी इस्लामवादाचे समर्थन करतात. ही विचारधारा कट्टर धर्मवादी आहे. राष्ट्र ही संकल्पना न मानता ती धर्मसत्तेच्या स्थापनेस महत्त्व देते.
पाकमधील झिया-उल-हक असो की आताचे लष्करप्रमुख मुनीर. यांनी जिहादींचा वापर राष्ट्रासाठी करण्याचा निर्धार केला. त्यातूनच तालिबान आणि पाकिस्तानी राजवट यांच्यातील मतभेद अधोरेखित झाले. पाकिस्तानला अफगाणिस्तानमध्ये पख्तुन आणि इतर संस्कृती समाप्त करून, स्वतःची निरंकुश सत्ता प्रस्थापित करायची आहेे. त्यामुळे तालिबान 2.0 राजवट पाकिस्तानच्या तशी विरोधातच आहे. तालिबानने ऑगस्ट 2021 मध्ये काबूलचा ताबा घेतला, तेव्हा पाकने ताबडतोब तेथे राजनैतिक व लष्करी दूत पाठवले. अफगाणिस्तान आपल्या आदेशानुसार चालावा, ही पाकची इच्छा त्यामधून प्रतिबिंबित झाली. हे तालिबान राज्यकर्त्यांना बिलकूल रुचलेले नाही. या वर्षाच्या प्रारंभीच पाकिस्तानातील 80 हजार अफगाण निर्वासितांना त्यांच्या देशात चालते होण्यास फर्मावले. दीड वर्षापासूनच पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यातील संघर्ष तीव्र होत आहे. तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) वर अंकुश ठेवा, अशी मागणी तीन वर्षांपासून पाकिस्तान करत आहे. पाकचे सैनिक, तसेच नागरिकांवर होणारे हल्ले थांबवा, अशी अपेक्षा पाकने तालिबानकडे व्यक्त केली. मात्र, तालिबानने ‘टीटीपी’विरुद्ध कारवाईची मागणी फेटाळली. तसे केल्यास दोन्ही देशांसह आसपासच्या भागांतही अस्थिरता निर्माण होईल, असे तालिबानचे म्हणणे आहे.
‘टीटीपी’ने पाकिस्तानच्या पेशावरमधील शाळेवर 2014 मध्ये केलेल्या हल्ल्यात दीडशे विद्यार्थी मारले गेले होते. मात्र, पाकिस्तानदेखील अफगाणिस्तानात हिंसाचार माजवतो, असे अफगाण नगरिकांचे मत आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानात घुसून, तेथील 21 चौक्या ताब्यात घेतल्या. तर, अफगाणिस्तानने पाकिस्तानचे 58 सैनिक ठार मारले. काबूलमध्ये पाकिस्तानने बॉम्बस्फोट घडवून आणला. पाकच्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानचे तीन क्रिकेटपटू ठार झाले. ड्युरंड सीमेवरील संघर्षात तालिबानचे 20 सैनिक ठार झाले. मुशर्रफ अध्यक्ष असताना, पाकिस्तानने अमेरिकेच्या दहशतवादविरोधी आघाडीत सामील होत अफगाणविरोधी भूमिका घेतली होती.
2009 ते 2018 दरम्यान, बैतुल्लाह महसूद, हकीम उल्लाह महसूद आणि मुल्ला फझुल्लाह हे तालिबानचे तीन नेते अमेरिकी हवाई हल्ल्यात मारले गेले. त्यासाठी पाकिस्तानने सहकार्य केले होते. एकूण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हे दोन्ही दहशतवादी देश दहशतवादाचे बळीदेखील ठरले आहेत. मात्र, काबूल आता दिल्लीच्या हातातले बाहुले बनले आहे, असा आरोप पाकच्या संरक्षणमंत्र्यांनी केला आहे. तालिबानचे परराष्ट्रमंत्री अमिरखान मुत्ताकी नुकतेच भारत दौर्यावर आले. पहलगाम हल्ल्याचा तालिबान राजवटीने निषेध केला होता. भारताने तालिबानी राजवटीशी जुळवून घेतले आहे. तसेच, भारत चाबहार बंदर इराणमध्ये विकसित करत असून, तेथून मध्य आशियात व्यापार करण्यासाठी तालिबानचे सहकार्य आवश्यक ठरते. अफगाण भूमीवरून भारतविरोधी कोणतीही कृती होणार नाही, अशी हमी तालिबान्यांनी दिलेली आहे. तालिबानी राजवटीच्या दहशतवादी धोरणांना वा त्यांच्या महिलाविरोधी द़ृष्टिकोनास भारताने अजिबात समर्थन दिलेले नाही. मात्र, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील नवीन व्यावहारिक संबंधांमुळे पाकची पोटदुखी होणे स्वाभाविक आहे. पाकिस्तानवर चाप लावण्यासाठी अफगाणिस्तानचा वापर करून घेणे भारतासाठी श्रेयस्करच ठरले आहे. काट्याने काटा काढण्याची भारताची रणनीती यशस्वी होताना दिसते.