अभिनेते अतुल परचुरे Pudhari File Photo
संपादकीय

आनंददायी अतुलचा वियोग

पुढारी वृत्तसेवा
पुरुषोत्तम बेर्डे, ज्येष्ठ दिग्दर्शक

मराठी रंगभूमी, सिनेमा, मालिका यांसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप उमटवणार्‍या अतुल परचुरे या कसदार अभिनेत्याची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आणि नियतीनं त्याला आपल्यातून हिरावून नेलं आहे. त्याचं निधन सर्वांनाच चटका लावणारं ठरलं. अतुलची मेमरी अतिशय शार्प होती. लूक छान होता. विनोदाची शैलीही अफलातून होती. त्यामुळं अतुलचा अभिनय प्रवास अडखळला नाही.

मराठी रंगभूमी, मालिका, चित्रपटांबरोबरच हिंदी सिनेसृष्टीमध्येही आपल्या अभिनयाची वेगळी शैली जपत छाप उमटवणार्‍या अतुल परचुरे या उमद्या अभिनेत्याच्या निधनाची बातमी सर्वांनाच धक्का देणारी ठरली. साधारण वर्षभरापूर्वी त्यानं एका पॉडकास्टमध्ये आपल्याला कर्करोग झाल्याचं जाहीरपणानं सांगितलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता. एका नाटकाच्या रिहर्सलच्या दरम्यान मी अतुलला पाहिलं तेव्हा मीही हादरलो होतो. त्यावेळी तो नुकताच आजारातून उठला होता. त्यामुळं त्याला काळजी घेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पाच-सहा महिन्यांपूर्वी माझी आणि त्याची भेट झाली, तेव्हा तो आऊट ऑफ डेंजर होता; पण अतुलला कॅन्सरनं गाठणं हेच मुळात दुःखद होतं, कारण कॅन्सरवर पूर्णपणे मात करणारे नशीबवानच म्हणायला हवेत. अलीकडील काळात अशा प्रकारची उदाहरणं अवती-भोवती दिसतातही; पण त्यामध्ये कॅन्सरचं निदान कोणत्या टप्प्यावर झालं आहे, हे महत्त्वाचं असतं. अतुलला कर्करोगाचं निदान होण्यासच उशीर झाला होता आणि अखेरीस ही दुर्धर व्याधी त्याला आपल्यातून हिसकावून घेऊन गेली.

व्यक्तिशः माझ्या पूर्वीच्या एकाही नाटकात किंवा सिनेमामध्ये अतुलनं काम केलेलं नाही; पण ‘टुरटूर’ या महत्त्वाच्या नाटकामध्ये अतुलनं काम केलेलं आहे. या नाटकाच्या निमित्तानं महाराष्ट्रात काही दौरेही झाले. अतुल हा विजय केंकरेंचा मित्र. त्यामुळं पूर्वी शिवाजी मंदिरच्या प्रयोगांना तो आवर्जून यायचा. त्यावेळी तो लहान होता.

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असणार्‍या पु. ल. देशपांडे यांच्यासमोर त्यांची व्यक्तिरेखा साकारणारा अतुल हा एकमेव कलाकार होता. त्यानंतर ‘पुलं’वरती कोणतीही कलाकृती करायची झाल्यास दिग्दर्शकांना अतुलचीच आठवण यायची; पण यामुळं अतुल टाईपकास्ट झाला होता. खरं म्हणजे अतुलसारख्या नटाला एका विशिष्ट धाटणीत बसवणं मला योग्य वाटलं नाही. स्वतः ‘पुलं’नी अतुलच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली होती; पण याचा अर्थ ऊठसूट ‘पुलं’वरील कार्यक्रमांसाठी अतुललाच निवडावं असा नाही. दिलीप प्रभावळकरांनाही अशाच प्रकारे चिमणरावांच्या चौकटीत अडकवण्यात आलं होतं; पण ते ठरवून यातून बाहेर पडले. तशाच प्रकारे अतुलनंही स्वतःला ‘पुलं’च्या इमेजमधून बाहेर काढलं असावं. त्यामुळंच नंतरच्या काळात त्याची ‘गुरू’सारखी काही नाटकं पाहायला मिळाली; अन्यथा एकसुरीपणा हा कोणत्याही कलाकाराच्या करिअरला मर्यादा आणणारा ठरतो.

अतुलची उंची कमी असली तरी त्याच्या गुबगुबीत किंवा गोलमटोलपणामुळं खूप चांगल्या भूमिका त्याला मिळत गेल्या. दिलीप प्रभावळकर आणि रिमा लागू यांच्यासोबत ‘नातीगोती’मध्ये त्यानं अतिशय सुंदर अभिनय केला. बच्चू नावाच्या एका मतिमंद मुलाची संवाद नसणारी व्यक्तिरेखा अतुलनं आपल्या हावभावांच्या ताकदीवर लोकप्रिय केली. ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकात त्यानं साकारलेला मुकुंदाही प्रेक्षकांना भावला. ‘गुरू’ नाटकातील त्याची भूमिकाही मला आवडली होती. पाच-सहा वर्षांपूर्वी ‘झी’साठीच्या एका इव्हेंटमधील माझ्या स्कीटमध्ये अतुल आणि विजय कदम झळकले होते. कर्करोगाचं निदान झाल्यानंतर उपचार घेऊन त्यानं कमबॅकही केलं होतं. ‘सूर्याची पिल्ले’च्या जाहिरातीत त्याचा फोटोही दिसायचा; पण नंतर तो दिसेनासा झाला आणि आता तर त्यानं या जगातूनच एक्झिट घेतली. मराठी रंगभूमीच्या द़ृष्टीनं त्याचा हा वियोग अतिशय दुःखद आहे. 57 व्या वर्षी एक सशक्त नट आपल्यातून निघून गेला आहे. अतुलला आणखी आयुष्य मिळालं असतं, तर 10-20 वर्षांत त्यानं अनेक चांगल्या भूमिका निश्चितपणानं केल्या असत्या; पण नियतीला ते मंजूर नव्हतं. येणार्‍या काळात त्याच्या भूमिकांचं कलेक्शन छोट्या पडद्यावर आणि समाजमाध्यमांवर पाहायला मिळेल. ते पाहताना अतुल आपल्यात नसल्याची खंत सदैव जाणवत राहील.

(शब्दांकन : हेमचंद्र फडके)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT