पाकिस्तानी हैवानांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांच्या केलेल्या नरसंहारानंतर संपूर्ण देशभर संतापाची लाट पसरली आहे. भारताने तातडीने पावले उचलत पाकिस्तानशी संबंध तोडून टाकताना काही महत्त्वपूर्ण पावले उचलली. या दहशतवाद्यांचे आश्रयस्थान बनलेल्या देशाची सर्व मार्गाने कोंडी करण्याचे सरकारचे धोरण दिसते. अर्थातच सरकार पुढचे पाऊल कधी उचलणार, हे लवकरच कळेल. पंजाब प्रांताची पाण्याची गरज भागवणार्या ‘सिंधू जल करारा’ला स्थगिती देत पाणी तोडण्यात आले. 1960 सालचा हा ‘सिंधू जल करार’ असून, याअगोदरच्या पाकिस्तानसोबच्या युद्धप्रसंगीही भारताने कधीही या कराराला धक्का लावला नव्हता. या कठोर पावलामुळे पाकिस्तानवर कंठशोष करण्याची वेळ येणार आहे. तसेच अटारी भागात सीमा बंद करण्यात आली असून, सार्क व्हिसावर भारतात आलेल्या पाक नागरिकांचा व्हिसा रद्द केला जाणार आहे. त्यांना 48 तासांत हा देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षणविषयक सल्लागारांनाही आठवड्याभरात चालते होण्याचा आदेश देण्यात आला आहे. जगभरातील अनेक देशांनी या भ्याड हल्ल्यावर भारताच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिली. अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी या देशांनी या संकटकाळात भारताच्या पाठीशी उभे राहण्याची भावना व्यक्त केली. घटना घडली, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियात होते. तेव्हा दहशतवादविरोधी मोहिमेसाठी भारताला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी दर्शवली. हल्ल्यात बळी पडलेले नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशी यांनी पतीच्या अंतिम दर्शनावेळी मान उंचावत ‘जयहिंद’ अशी घोषणा दिली, तेव्हा संपूर्ण देशवासीयांची मने हेलावून गेली. देशात ठिकठिकाणी हल्ल्यात बळी गेलेल्यांच्या अंत्यदर्शनाच्या वेळी ‘पाकिस्तान जला दो’अशा शब्दांत हल्ल्याचा धिक्कार करण्यात आला.
देशात सर्वत्र निषेध, मोर्चे काढून वा सभा घेऊन घटनेबद्दलच्या क्षोभाचे प्रदर्शन घडवले जात आहे. पंतप्रधान मोदी यांनीही दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले जाईल आणि पहलगामधील दोषींना कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा दिली जाईल, असा इशारा दिला आहे. उरीनंतर पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक करण्यात आला होता. पुलवामाचा बदला बालाकोटमध्ये घेण्यात आला आणि आताही पाकिस्तानमध्ये शिरून पहलगामचा वचपा काढावा, अशी मागणी देशभरातून होत आहे. निरपराध पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून मारले गेले. याचे कडक प्रत्युत्तर दिले जाईल, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी ठणकावले आहे. 1990च्या दशकात पाकधार्जिण्या हिजबुल मुजाहिद्दीन, लष्कर-ए-तोयबा व अन्य जिहादी संघटनांनी काश्मिरात असंख्य नागरिकांचे बळी घेतले. तेथील सांस्कृतिक एकात्मतेवर आघात करून, हिंदू व मुस्लिम समुदायांमध्ये वैमनस्य निर्माण केले.
हिंदू-मुस्लिम ऐक्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या दोडा या काश्मीर खोर्यातील जिल्ह्याला 1993 पासून हिंसेचे ग्रहण लागले. त्यानंतरच्या सात वर्षांत जिल्ह्यातील हल्ल्यांमध्ये 700 निरपराध जीवांचे बळी गेले. जून 1998 मध्ये लग्नाच्या वर्हाडावर झालेला हल्ला सर्वात भीषण ठरला. शिखांचे शिरकाण करून, त्या समुदायातही दहशत माजवण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी केला. 1 ऑगस्ट 2000 रोजी पहलगाम शहराजवळ 30 यात्रेकरूंना ठार मारण्यात आले. तर 14 मे 2002 रोजी पाक दहशतवाद्यांनी हिमाचल प्रदेशातून काश्मीरकडे येत असलेल्या 10 प्रवाशांची कालूचकच्या जवळ हत्या केली. गोळीबाराचा आवाज ऐकून, घटनास्थळापासून जवळच तैनात असलेल्या भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खातमा केला; पण या घटनेत तीन जवानांसोबतच त्यांच्या कुटुंबीयांसह 28 नागरिकांचे बळी गेले. त्यामुळे भारत व पाकिस्तानमधील तणाव वाढून, उभय देश पुन्हा युद्धाच्या उंबरठ्यावर आले होते. वंधामा या गावात दहशतवाद्यांनी 24 काश्मिरी पंडितांना सामुदायिकरीत्या ठार मारण्यात आले होते. काश्मीरचा इतिहास असा रक्तरंजित आहे.
दीड वर्षापूर्वी हमासने इस्रायलमध्ये घुसून तेथे संगीताचा आनंद घेणार्या समुदायावर भीषण हल्ला केला आणि अनेकांचे अपहरण केले होते. तशीच घटना पहलगाममध्ये घडली असे म्हणता येईल, कारण हल्लेखोरांची मानसिकता समानच आहे. तेव्हा इस्रायलने हमासचा सर्वनाश करण्यासाठी गाझापट्टीत तुफान हल्ले केले. हमासच्या असंख्य दहशतवाद्यांना ठार मारले. भारताने याचप्रकारची कारवाई करावी, अशी मागणी केवळ सामान्य जनतेची नाही, तर अनेक निवृत्त सेनाधिकार्यांचीही आहे. पाक लष्करप्रमुख जनरल मुनीर यांचे घराणे हे सनातनी ‘हाफिझ’ घराणे आहे. ते कट्टर भारतविरोधी आहेत. पाकिस्तानच्या आयएसआयला त्यांचेच पाठबळ असून, तेथील दहशतवादी संघटनांना प्रशिक्षण देण्याचा काम आयएसआयतर्फे केले जाते.
पहलगाममध्ये आलेले लोक पर्यटक नसून हिंदू आहेत, हे दहशतवाद्यांनी जाणीवपूर्वक अधोरेखित केले. म्हणजेच जम्मू-काश्मीरमधील मुसलमान आमचेच आहेत आणि हिंदू मात्र शत्रू आहेत, हे सांगण्याचा पाकचा कुटिल डाव आहे. तो योजनाबद्धरित्या राबवला गेला; पण जम्मू-काश्मीमधील आजपर्यंतच्या दहशतवादात 89 टक्के मुस्लिम मारले गेले आहेत, हे विसरता कामा नये. दशहतवादाच्या आगीत काश्मीरमधील हा समुदाय होरपळतो आहे. तेथील अल्पसंख्य हिंदूंनाही त्याच्या झळा बसत आहेत. पहलगामच्या घटनेनंतर तेथील बळी व जखमींच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी स्थानिक मुस्लिम लोकच पुढे आले. स्थानिकांनी मेणबत्ती मोर्चा काढून पाकिस्तानविरोधात घोषणाही दिल्या, दहशतवाद्यांच्या हातून एके - 47 रायफल हिसकावून घेण्याचा प्रयत्न सैयद हुसैन शाह या जिगरबाज मुस्लिम घोडेस्वाराने केला, त्यालाही दहशतवाद्यांनी ठार केले. संपूर्ण जगाच्या द़ृष्टीने पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र आहे आणि त्याच्या या मूळ वृत्तीत सुधारणा होण्याची शक्यता नाहीच. त्यामुळे जशास तसे उतर द्यावेच लागेल. मात्र त्याचसोबत आपल्या सीमा अधिक सुरक्षित करणे आवश्यक आहे. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक पातळीवर दहशतवादी प्रवृत्ती बळावणार नाहीत, याकडे लक्ष देणेही तितकेच गरजेचे आहे. राज्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम अधिक जोमाने व्हायला हवे. तेथील पर्यटकांचा ओघ थांबता कामा नये.