उंचावलेल्या शैक्षणिक निकाल आलेखाचे वास्तव  pudhari photo
संपादकीय

उंचावलेल्या शैक्षणिक निकाल आलेखाचे वास्तव

पुढारी वृत्तसेवा
संदीप वाकचौरे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

यावर्षी राज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के लागला. मागील वर्षीपेक्षा निकालात घट झाली असली, तरी प्रथम श्रेणीच्या वर गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ही सुमारे 68 टक्के इतकी आहे. 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणार्‍यांची संख्या 80 हजारांहून अधिक आहे. गुणांचा उंचावलेला आलेख म्हणजे खरेच बुद्धिमत्तेचे फलित आहे की परीक्षा पद्धतीचे, याचा विचार करण्याची गरज आहे. अन्यथा ही सूज चिंता करायला लावणारी ठरू शकते.

गेल्या काही वर्षांत 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने आणि मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. उच्च, प्रथम श्रेणी हा जणू नियम बनू लागला आहे. यावर्षी राज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के लागला. मागील वर्षीपेक्षा निकालात घट झाली आहे, हे खरे असले, तरी इतक्या मोठ्या प्रमाणावर गुणांचा उंचावलेला आलेख नेमके कशाचे द्योतक मानायचे? हे गुण म्हणजे खरंच गुणवत्तेत झालेली वाढ आहे की फुगवटा? हा प्रश्न पडणे साहजिक आहे. निकालामधील गुणांच्या खिरापतीबाबत दरवर्षी हल्ली चर्चा होतात.

अलीकडच्या काळात तर शंभर टक्के मार्क मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्याही वाढत आहे. 100 टक्के निकाल लागणार्‍या शाळाही वाढताहेत. पूर्वी एखाद्या विषयाला पैकीच्या पैकी गुण मिळाले, तरी त्याची बातमी व्हायची. आज पैकीच्या पैकी गुण मिळूनही त्याचे अप्रुप वाटेनासे झाले आहे. अवतीभोवती डोकावून पाहिले, तर हमखास नव्वदपेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी सापडतील. राज्याच्या श्रेणीनिहाय आकडेवारीवर नजर टाकली, तर परीस्थिती नेमकी आनंददायी आहे की चिंता करायला लावणारी आहे, असा प्रश्न पडतो. आज इतके मार्क मिळवले म्हणजे हमखास विज्ञान शाखेची निवड करायची, हे ठरलेले असते. साहजिकच कला शाखेकडे जाण्याची वाट या गुण फुगवट्याने कायमची बंद केली आहे. गणांच्या उंचावलेल्या आलेखामुळे उत्साह उंचावणे समजण्यासारखे आहे; पण नंतर जे वास्तव हाती लागते ते अधिक चिंता करायला लावणारे आहे.

राज्यात यावर्षी दहावीतील 14 लाख 87 हजार 392 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यातील 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ही सुमारे 81 हजार 809 इतकी (पाच टक्के) आहे. 85 ते 90 टक्के मार्क मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ही 1 लाख 11 हजार 878 (7.52 टक्के) इतकी आहेे. 80 ते 85 टक्के मार्क मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ही 1 लाख 39 हजार 774 (9.39 टक्के) इतकी आहे. 75 ते 80 टक्के गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण 1 लाख 56 हजार 375 इतके (10.51 टक्के) आहे. 70 ते 75 टक्के गुण मिळवणारे राज्यात 1 लाख 62 हजार 952 (10.96) विद्यार्थी आहेत. 65 ते 70 टक्के गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ही 1 लाख 63 हजार 26 (10.96 टक्के) इतकी आहे, तर 60 ते 65 टक्के मार्क मिळवणारे 1 लाख 76 हजार 459 (11. 86 टक्के) विद्यार्थी राज्यात आहेत.

या आकडेवारीवर नजर टाकली, तर राज्यात दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत 70 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या 45 टक्के इतकी आहे. साठ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणार्‍यांचे प्रमाण 23 टक्के आहे. याचा अर्थ राज्यात प्रथम श्रेणीच्या वर गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ही सुमारे 68 टक्के इतकी आहे, तर 45 टक्क्यांपेक्षा कमी मार्क मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ही 1 लाख 23 हजार 2999 (8. 29 टक्के) इतकी आहे. विद्यार्थ्यांना मिळालेल्या या गुणांचा आनंद होणे हे मानवी वृत्ती म्हणून समजण्यासारखे आहे; मात्र यातून विद्यार्थ्यांच्या भविष्यासमोर जसे प्रश्न होतात, तसे व्यवस्थेसमोरही प्रश्न निर्माण होत आहेत.

आपल्याकडे विद्यार्थ्यांची शाखानिहाय प्रवेशाची प्रक्रिया ही या गुणांवरच ठरते. अभिरुची, कल याचा विचार होत नाही. शाखांना एक प्रकारे प्रतिष्ठेची उतरंड लाभली आहे. विज्ञान शाखा ही अधिक प्रतिष्ठेची मानली जाते. त्यामुळे अधिक गुणमिळाले म्हणजे शंभर टक्के विज्ञान शाखेलाच प्रवेश घेतला पाहिजे अशी धारणा होते. त्या दिशेने प्रवेशासाठी लोंढे निर्माण होतात. यामध्ये अनुकरणशीलतेचा प्रभाव प्रचंड असतो. प्रत्यक्षात आपल्याला नेमकी आवड, गती कशात आहे, हे तपासण्याचा कोणीच प्रयत्न करत नाहीत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ गेली काही वर्षे कल चाचणी घेत होते. त्या चाचणीचा निकालही प्राप्त होत होता; मात्र त्याआधारे विद्यार्थ्यांची शाखा निवड केली जावी, असे मानणार्‍या पालकांची संख्या अगदी बोटांवर मोजावी एवढीच असते. त्यामुळे सरसकट शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही विज्ञान शाखेकडे ओढा वाढताना दिसत आहे. याचा परिणाम मेरीटवर होत आहे. आज तालुक्याच्या ठिकाणीदेखील प्रवेशासाठी 90 ते 95 टक्के गुण मिळाले, तरच प्रवेश मिळण्याची शक्यता असते. अशा वेळी इतर शाखांच्या जागा रिक्त राहण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. यावर्षी साधारण 45 टक्क्यांपेक्षा कमी गुण असलेले विद्यार्थी 1 लाख 23 हजार आहेत. 45 ते 60 टक्के गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या 3 लाख 71 हजार 820 इतकी आहे.

यातील 50 टक्के विद्यार्थ्यांचा ओढा हा अर्थात विज्ञान शाखेकडेच असणार, यात शंका नाही. यातील काही वाणिज्य शाखेला पसंती देतील; मात्र 65 पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी आणि माता-पित्यांचा कल विज्ञान शाखेकडे असणार. त्यातून राज्यात कला शाखेला प्रवेश घेणारे विद्यार्थी मिळत नाहीत, हेही वास्तव लक्षात घ्यायला हवे. यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, प्रथम आणि उच्च श्रेणी मिळाली म्हणून विज्ञान शाखेला जाणार्‍या विद्यार्थ्यांपैकी किती टक्के विद्यार्थी दहावीइतके मार्क बारावीत मिळवतात? बहुतेकदा हा आलेख घसरलेला असतो. उच्च श्रेेणीतील विद्यार्थी द्वितीय श्रेणीत येऊन पोहोचतात. अगदी शिकवणी लावूनही तीच अवस्था अनुभवास येते.

मुळात परीक्षांमध्ये मिळणार्‍या गुणांवरून कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावा, हे ठरवले जात असेल, तर पदरी निराशा येणे स्वाभाविकच आहे. दहावीत पैकीच्या पैकी गुण मिळवणारे विद्यार्थी जेईई, नीटसारख्या प्रवेश परीक्षांच्या वेळी का चमकत नाहीत? केंद्रीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांमध्ये आपला फार मोठा वरचष्मा आहे असे दिसत नाही.

सध्या मिळणारे गुण म्हणजे अंतर्गत गुणांचा परिणाम आहे का? यासंदर्भाने देखील वास्तवाचा अभ्यास होण्याची गरज आहे. बाह्यमूल्यमापनाच्या प्रमाणात अंतर्गत गुण दिले गेले, तर भविष्यात निकालाच्या शेकडा प्रमाणात निश्चित घट झालेली दिसून यईल. मुळात अंतर्गत मूल्यमापनाचे उद्दिष्ट, हेतू चांगला असूनही त्याकडे पाहण्याचे गांभीर्य संपुष्टात आल्याने निकालात वाढ झालेली अनुभवास येते. त्यामुळे निकालाच्या संदर्भाने वास्तवाचा विचार करायला हवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT