फेकीली मुक्ताफळे Pudhari File Photo
संपादकीय

फेकीली मुक्ताफळे

पुढारी वृत्तसेवा

आपल्या देशात कुणाच्याच बोलण्यावर धरबंध राहिलेला नाही, हे निश्चित! कुणीही यावे आणि कुणावरही वाट्टेल तसे आरोप करावेत, हे रोजचेच झालेले आहे. ज्याच्या मनाला जे येईल ते आणि वाटेल तसे बोलत राहायचे, एवढा एकमेव राष्ट्रीय कार्यक्रम सध्या सुरू आहे. महाराष्ट्राला हे आवडणार नाही, महाराष्ट्राला ते आवडणार नाही, महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावला गेला आहे, महाराष्ट्राची अस्मिता धोक्यात आली आहे अशी राजरोस मुक्ताफळे भिरकावली जात आहेत आणि मीडिया त्याला भरपूर प्रसिद्धी देत आहे, हे सध्याचे चित्र आहे. एखाद्या व्यक्तीचा अपमान किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर केलेली टीका ही संपूर्ण महाराष्ट्रावर केलेली टीका कशी काय असू शकते, हे अद्याप आमच्या ध्यानात आले नाही.

दररोज सकाळी कॅमेर्‍यासमोर येऊन वाटेल ते बोलणारे एक सद्गृहस्थ महाराष्ट्राला न चुकता दररोज दर्शन देत असतात. ‘मुक्ताफळे’ या शब्दाचा अर्थ नवीन पिढीला कळणार नाही. या शब्दाचा साधा सोपा अर्थ म्हणजे, वाटेल ते तोंडातून बाहेर पडलेले बोल होय. महाराष्ट्रातील विविध नेत्यांवर वाटेल तशी मुक्ताफळे उधळणार्‍या आणि सकाळी साडेनऊ वाजता दर्शन देणार्‍या नेत्याने तोल सोडून एका राजकीय कार्यकर्त्याच्या पत्नीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि इथून सुरू झाला एक नवीन अध्याय! आरोप झालेल्या राजकीय कार्यकर्त्याची पत्नी ही साधी गृहिणी आहे आणि नवरा करत असलेल्या कुठल्याही कार्यात तीचा थेट सहभाग नसतो. ही गृहिणी चिडली आणि तिने सरळ सरळ बोलघेवड्या गृहस्थावर मानहानीचा दावा केला. मानहानीचा दावा कित्येक महिने चालतो आणि बर्‍याचदा त्याचा निकाल येत नाही; परंतु सदर गृहिणीने चिकाटीने पाठपुरावा करत ती केस लढवली आणि जिंकलीसुद्धा!

कुठल्याही पुराव्याशिवाय वाटेल तसा आरोप करण्याची शिक्षा म्हणून कोर्टाने सदर गृहस्थांना पंधरा दिवस साध्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. खालच्या कोर्टाने शिक्षा दिल्यानंतर वरच्या कोर्टात जाण्याची सुविधा असते. शिक्षा झालेल्या गृहस्थांनी आपण न्यायालयाचा आदेश मान्य करतो, असे म्हणत जामीन मिळवला आणि वरच्या न्यायालयात जाण्याची तयारी केली.

अशा प्रकारची मुक्ताफळे भिरकावणारे मोजकेच काही लोक महाराष्ट्रात आहेत. त्यांनी या प्रकरणापासून धडा घेतला पाहिजे. राजकीय नेत्यांना आरोप-प्रत्यारोप नवीन नसतात; परंतु काहीच कारण नसताना त्यांच्या कुटुंबीयांना यामध्ये खेचणे हे महाराष्ट्राला शोभणारे नाही, हे निश्चित! विरोधकांचाही आदर करणारी नेते मंडळी या राज्याने पाहिली आहेत. यानंतर तरी असे प्रकार थांबतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. काही दशकांपूर्वी नैतिकेतवर आधारित राजकरण केले जायचे. राजकीय टीका केल्या जायच्या. त्यात काही मर्यादा असायच्या; पण आताच्या राजकारणाला काहीच ताळतंत्र राहिलेला नाही. खालच्या पातळीवरची टीका केले जाते शिवाय त्यावेळी एखाद्या नेत्याचे ज्येष्ठत्व राखले जात नाही. म्हणजे एकूण राजकारणात इतकी मोठी राजकीय चिखलफेक केली, आपण काय बोलतो हेच काहींना कळेनासे झाले आहे. आता लोकांसमोर जाण्याची अनेक माध्यमे उपलब्ध झाली असल्याने रोज दिसणारे चेहरे पाहून लोकांनाही त्यांचा वीट आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT