Aam Aadmi Party crisis | ‘झाडू’ झडती! (Pudhari File Photo)
संपादकीय

Aam Aadmi Party crisis | ‘झाडू’ झडती!

पुढारी वृत्तसेवा

आम आदमी पक्षातील सात राज्यसभा खासदारांनी पक्षाला रामराम केला. हे सातही खासदार भाजपमध्ये दाखल झाले. खा. राघव चढ्ढा यांच्यासह इतर नेत्यांचा यात समावेश आहे. या फुटीचा ‘आप’ला जबरदस्त फटका बसणार आहे. भ्रष्टाचाराविरोधात एल्गाराची गर्जना करत तेरा वर्षांपूर्वी ‘आप’ची स्थापना झाली. पक्ष संस्थापक अरविंद केजरीवाल सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले होते. भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाची हमी देत त्यांनी सत्ता मिळवलीही. तथापि, नाकाने कांदे सोलणार्‍यांचे जे होते, तेच केजरीवाल यांच्याही कपाळी आले. साधनसुचितेचा अविर्भाव दाखवणारे केजरीवाल मनमानी पद्धतीने वागू लागले.

पक्ष स्थापनेपासून खांद्याला खांदा लावून लढणार्‍या दिग्गज आणि लोकप्रिय नेत्यांवर त्यांनी वक्रद़ृष्टी ठेवली. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. केजरीवाल यांनी जे स्वप्न दाखवले, तेच मुळी ठिसूळ पायावर उभे होते. बिनीच्या शिलेदारांना कस्पटासमान वागविण्याची त्यांची कृती अंगलट आली आहे. ज्या विश्वासाने लोकांनी ‘आप’ला साथ दिली त्या विश्वासाला तडा गेला. चौदा वर्षांपूर्वी अण्णा हजारे यांनी नवी दिल्लीत भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन उभारले होते. आंदोलनावेळी केजरीवाल आणि अण्णांमध्ये मतभेद झाले. केजरीवाल बाहेर पडले आणि त्यांनी आम आदमी पार्टीची स्थापना केली. 2013 मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’ला 70 पैकी 28 जागा मिळाल्या. काँग्रेसच्या कुबडीने केजरीवाल मुख्यमंत्री झाले. 2015 च्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने दिल्लीत 70 पैकी 67 जागा जिंकून विक्रम प्रस्थापित केला.

2020 च्या निवडणुकीत 62 जागा जिंकून तिसर्‍यांदा सत्ता मिळवली. केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाची हॅट्ट्रिक केली. 2022 मध्ये पंजाब विधानसभा निवडणुकीत पक्षाने 117 पैकी 92 जागा जिंकून नवा विक्रम केला. पक्षाने गुजरात, गोवा येथेही निवडणूक लढवली; पण फारसे यश पदरात पडले नाही. पण दिल्ली आणि पंजाबमध्ये लोकांना पर्याय मिळाला. या दोन्ही राज्यांत एकेकाळी प्रबळ काँग्रेस विकलांग झाली. नव्या पिढीने काँग्रेस पक्षाकडे पूर्ण पाठ फिरवली. पर्यायाच्या शोधात त्यांनी आम आदमी पक्षाला पसंती दिली. पंजाबात शिरोमणी अकाली दल पक्ष निष्प्रभ झाला होता आणि भाजपचे म्हणावे तेवढे ताकदवान अस्तित्व नव्हते. या पोकळीचा आम आदमी पक्षाला फायदा झाला. म्हणजे पक्षाला जे यश मिळाले ते बर्‍याचशा नकारात्मक पार्श्वभूमीवर, हे लक्षात घेतले पाहिजे. तथापि, आपल्यामुळेच हे यश आले, ही ‘ग’ ची बाधा केजरीवाल यांना झाल्याचे म्हटले जाते. त्यातून त्यांच्या अहंपणाच्या फुग्यात हवा भरली, असा सर्वसाधारण तर्क काढला, तर तो चुकीचा ठरणार नाही.

दिल्लीत ‘आप’ सरकारने चांगली कामेही केली. वीज दरात 50 टक्के कपात, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा, यमुना नदी शुद्धीकरण या निर्णयांचे लोकांनी स्वागत केले. भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यातही सरकारला प्रसंगी यश आले. तथापि, यानंतर केजरीवाल यांच्यात ‘डॉन क्विक्झोट’ संचारला असावा. कथित मद्य घोटाळ्यात ते अडकले आणि त्यांना जेलयात्रा करावी लागली. ते दोषमुक्त झाले, तरी ठपका राहिला आणि त्यातच एकेकाळच्या खंद्या समर्थकांशी त्यांचा आपपरभाव सुरू झाला. केजरीवाल कारावासात असताना राघव चढ्ढा परदेशी गेले होते. तेथे त्यांचे काही फोटो प्रसिद्ध झाले. त्यावरून पक्षात उलटसुलट चर्चा होऊ लागली. केजरीवाल यांची तेव्हापासून राघव चढ्ढा यांच्यावर खप्पामर्जी झाल्याचे सांगितले जाते. त्यातूनच नेते आणि केजरीवाल यांच्यात दुरावा निर्माण होत गेला. तथापि केजरीवाल यांनी समंजस भूमिका घेतली असती, तर राघव चढ्ढा व इतर नेत्यांत बंड करायची वेळ आली नसती. केजरीवाल यांच्या स्वभावामुळे, वर्तणुकीने ती वेळ आली, अशीच याबाबत नोंद झाल्याशिवाय राहणार नाही. सात नेत्यांनी बंडाचे निशाण फडकावल्यावर केजरीवाल यांनी ही पंजाबच्या जनतेशी गद्दारी आहे, असे म्हटले आहे. तो पश्चात मिलाप झाला. ज्या नेत्यांनी हिरीरीने कष्ट करून ‘आप’च्या पंजाबमधील ऐतिहासिक यशात सिंहाचा वाटा उचलला, त्या नेत्यांवरच जर दूषणं उलटणार असतील, तर त्या नेत्यांनी काय करावे? केजरीवाल यांच्याकडून होणार्‍या मुस्कटदाबीला किती काळ सहन करावे?

नेता जरी सर्वोच्च स्थानावर असला, तरी खंदे अनुयायी बरोबरीनेच मानणारा नेता यशस्वी होतो. केजरीवाल यांचा इतिहास कच्चा असावा आणि त्यांना वर्तमानाचेही भान नसावे, असाच निष्कर्ष या बंडावरून काढावा लागतो. ‘आप’विषयी लोकांना अपेक्षा होत्या, काही तरी नवीन अनुभवाला येईल, अशी आशा होती. ‘आप’ दिलासा देईल, भ्रष्टाचारमुक्त राजवट देईल, अशी लोकांची भावना होती. तथापि, लोकांची निराशा झाली. इतर पक्षांप्रमाणेच ‘आप’ची वाटचाल चालू झाल्याने केजरीवाल यांच्याविषयी प्रारंभी असलेल्या विश्वासाला जबरदस्त धक्का बसला आहे. जे सात खासदार पक्षातून बाहेर पडले, ते केजरीवाल यांच्याच तोलामोलाचे होते. राघव चढ्ढा हे सुशिक्षित उमदा चेहरा होते. केजरीवाल कारावासातून बाहेर आल्यावर त्यांनी चढ्ढा यांची राज्यसभेच्या उपनेते पदावरून हकालपट्टी केली. त्यांच्या जागी अशोक मित्तल यांची नियुक्ती केली; पण मित्तल यांनीही पक्षत्याग केला. संदीप पाठक हे राजनीतीकार म्हणून गाजलेले आहेत. पंजाबच्या यशामध्ये त्यांचे महत्त्वाचे सूत्रसंचालन होते. लवकरच पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे या फुटीचा ‘आप’ला फटका बसण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये सत्तांतर झाले आणि भाजप सत्तेवर आला, तर आश्चर्य वाटायचे कारण नाही. आता राज्यसभेतील भाजपचे संख्याबळ 153 झाले आहे. त्यामुळे राज्यसभेत भाजपला विधेयक मंजूर करण्यात अडचण येणार नाही. सत्तेची नशा डोक्यात गेली की, स्वतःच्याच पायावर कुर्‍हाड मारून घेण्याची अवदसा आठवते. ‘आप’मध्ये जे बंड झाले, त्याची पुनरावृत्ती होणार नाही, असे नाही. त्यामुळे स्वतःच्याच पायावर कुर्‍हाड मारून घेण्याचा उद्योग पुन्हा होणार नाही, असे नाही; पण ‘आप’मधील या घटनाक्रमाच्या निमित्ताने लोकशाहीतील एक उमलत्या स्वप्नाचे तुकडे व्हावेत हा दैवदुर्विलास आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT