Cattle Feed Management | चारा नियोजनाची दिशा 
संपादकीय

Cattle Feed Management | चारा नियोजनाची दिशा

पुढारी वृत्तसेवा

डॉ. व्यंकटराव घोरपडे, सेवानिवृत्त सहायक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली

दुष्काळात पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. रोजगार हमी योजनेतून चारा लागवडीची संधी उपलब्ध असली, तरी तिचे यश कृषी आणि पशुसंवर्धन विभागातील समन्वयावर अवलंबून आहे.

दुष्काळाचा गंभीर परिणाम पशुधनाच्या चाऱ्यावर होणार आहे. गोठ्यातील जनावर उपाशी राहिले, तर शेतकऱ्याचे कुटुंब आणि ग्रामीण अर्थव्यवस्था दोन्ही कोलमडते. ६ नोव्हेंबरच्या शासन निर्णयाने चारा लागवडीला रोजगार हमीचे बळ दिले आहे. आता पशुसंवर्धन आणि कृषी विभागांनी एकत्र काम करण्याची गरज आहे. महाराष्ट्र रोजगार हमी विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) अंतर्गत गायरान जमिनीवर आणि वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेतावर चारा लागवड करता येईल. यापूर्वीच्या पिकांखेरीज मका, ज्वारी, बाजरी, नेपियर गवत, लसूण घास, ज्वारी मल्टिकट आणि जायंट बाजरा यांचा समावेश झाला आहे. एक हेक्टर मक्यासाठी ४७,३०७ रुपयांचे अंदाजपत्रक असून त्यात कुट्टी आणि मुरघास बॅगचाही समावेश आहे. यातील ६३ ते ७५ टक्के रक्कम अकुशल मजुरीची आहे. म्हणजे चारा तयार होईलच व रोजगारही मिळेल.

चाऱ्याच्या सूक्ष्म नियोजनासाठी गावातील गोठ्यांची संख्या आणि जनावरांचे वय लक्षात घेऊन दरमहा लागणाऱ्या हिरव्या व वाळलेल्या चाऱ्याची आकडेवारी कृषी विभागाला मिळाल्यास लागवडीचे नियोजन सोपे होईल. सहायक आयुक्त, तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी कार्यालयाला प्रथमच कार्यक्रम अधिकारी घोषित केले आहे. तथापि पशुसंवर्धन विभागात मात्र सहायक आयुक्तांकडे स्वतंत्र वित्तीय अधिकार नाहीत आणि कार्यालयात लेखापाल हे पदही नाही. याशिवाय रोजगार हमी योजनेंतर्गत इतक्या मोठ्या प्रमाणावरील कामे या विभागाने कधी राबवलेली नाहीत. त्यामुळे अनुभव आणि कार्यपद्धतीही अवगत नाही. दोन्ही विभागांची क्षमता, आस्थापना वेगळी असताना जबाबदारी मात्र समान ठेवणे हे अडचणीचे ठरणार आहे. ही बाबदेखील विचारात घ्यावी लागेल. VBGRAMGSOFT प्रणालीवर त्यांना तातडीने लॉगिन मिळणे आवश्यक आहे.

चारा उत्पादक आणि कंपन्यांना टंचाईग्रस्त भागातील पशुपालकांशी जोडण्यासाठी तालुका स्तरावर ‘चारा व्हॉटस्‌ॲप ग्रुप’ केल्यास अंमलबजावणीस गती मिळेल. मुरघास व साठा या बाबतीत पशुसंवर्धन विभागाने, काही सेवाभावी संस्थांनी जागृती केली आहे. हिरवा चारा मुरघासाद्वारे टिकवण्याचे तंत्रज्ञान पशुपालकांपर्यंत पोहोचवावे लागेल. परिस्थिती गंभीर झाल्यास चारा डेपो किंवा छावण्या सुरू कराव्या लागल्या तर हा साठा काही उपयोगात येईल. सोबत अझोला व हायड्रोपोनिक चाऱ्याबाबत जनजागृतीही चालू ठेवावी. महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ, कृभको, आयसीएआर, कृषी विज्ञान केंद्रांमार्फत बियाणे वेळेत उपलब्ध व्हायला हवेत. प्रत्येक तालुक्यासाठी लागवड क्षेत्र निश्चित केल्यास दृश्य परिणाम चांगले राहतील. गायरान, तालुका बीज गुणन केंद्रे, कृषी विद्यापीठांची प्रक्षेत्रे आणि पडीक शासकीय जमिनींवर रब्बी हंगामात प्राधान्याने चारा लागवड करून प्रात्यक्षिक प्लॉटद्वारे शेतकऱ्यांचे प्रबोधन करावे लागेल. प्रशिक्षण द्यावे लागेल.

ही कार्यप्रणाली राबवण्यासाठी कृषी पर्यवेक्षक तांत्रिक मान्यता, तालुका कृषी अधिकारी प्रशासकीय मान्यता देतील. मोजमाप पुस्तिकेतील नोंदी आणि ऑनलाईन देयके वेळेत होतील, याची काळजी घ्यावी लागेल. रोजगार हमी योजनेत मजुरांकडून होणारी कामे यंत्रांनी करता येत नाहीत. तथापि कस्टम हायरिंग सेंटरकडील कुट्टी व बेलर यंत्रांची माहिती पशुसंवर्धन विभागाला दिल्यास योजनेबाहेरील पीक अवशेषांचे चाऱ्यात रूपांतर करता येईल. पेरणी किती झाली आणि किती टन चारा तयार होणार, याचा साप्ताहिक अहवाल पशुसंवर्धन विभागाला दिल्यास एक सुसूत्रता येईल. दोन्ही विभागांमधील संवाद, माहितीची देवाणघेवाण जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त समिती स्थापन करावी. त्यामध्ये ग्रामपंचायत, कृषी आणि पशुसंवर्धन या तीनही यंत्रणा असाव्यात. समितीने दर पंधरा दिवसांनी चारा उपलब्धता, बियाणे पुरवठा आणि कामांच्या प्रगतीचा आढावा घ्यावा.

पशुसंवर्धन विभागाने ‘मागणी आणि वितरण’ अचूक सांभाळावे, तर कृषी विभागाने ‘उत्पादन आणि तंत्रज्ञान’ भक्कम ठेवावे. एकाच रथाच्या दोन चाकांप्रमाणे दोन्ही यंत्रणा एकमेकांच्या साथीने धावल्या, तर दुष्काळात एकाही मुक्या जनावराला चाऱ्याअभावी उपाशी राहावे लागणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT