New Era of Computing Power | संगणक सामर्थ्याचे नवे पर्व  File Photo
संपादकीय

New Era of Computing Power | संगणक सामर्थ्याचे नवे पर्व

पुढारी वृत्तसेवा

गणेश काळे, संगणकतज्ज्ञ

कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान संशोधन, औषधनिर्मितीपासून संरक्षण क्षेत्रापर्यंत नवे क्षितिज खुले करणाऱ्या ‘परमप्रज्ञा’ महासंगणकामुळे भारताच्या संशोधन क्षमतेला नवी गती मिळणार आहे.

अतिवेगवान संगणकीय प्रणाली म्हणजेच महासंगणक हे आज राष्ट्रांची गरज बनले आहेत. भारताने या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत ‌'परमप्रज्ञा‌’ या नव्या महासंगणकाचे उद्‌घाटन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयआयटी दिल्लीच्या सोनीपत परिसरात या उच्च कार्यक्षमतेच्या संगणकीय सुविधेचे उद्‌घाटन केले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मोठ्या प्रमाणातील माहितीवर आधारित संशोधनासाठी ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे.‌

'परमप्रज्ञा‌' हा भारतातील महासंगणकांच्या ‌'परम‌' मालिकेतील नवीन टप्पा आहे. ही प्रणाली सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग अर्थात सी डॅकने विकसित केली आहे. भारताच्या महासंगणकीय प्रवासाला मोठा इतिहास आहे. १९९१ मध्ये ‌'परम ८०००' हा भारताचा पहिला महासंगणक विकसित करण्यात आला. त्या काळात महासंगणकाच्या क्षेत्रात स्वावलंबन मिळविणे ही मोठी वैज्ञानिक कामगिरी होती. त्यानंतर भारताने या क्षेत्रात सातत्याने प्रगती केली. ‌'परमप्रज्ञा‌' त्याच प्रवासातील आधुनिक पिढीचे प्रतिनिधित्व करते.

आपल्या संगणकावर एखादी गणना केली, तर ती ठरावीक प्रक्रियेतून पूर्ण होते. महासंगणक मात्र एका मोठ्या समस्येचे अनेक छोटे भाग करतो आणि त्यावर एकाच वेळी अनेक प्रक्रिया करणाऱ्या घटकांकडून काम करून घेतो. त्यामुळे प्रचंड प्रमाणातील गणना अत्यल्प वेळेत पूर्ण करता येते. हवामानाचे हजारो घटक एकाच वेळी तपासणे, मोठ्या प्रमाणातील वैज्ञानिक माहितीचे विश्लेषण करणे किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मोठ्या प्रारूपांना प्रशिक्षण देणे यांसारखी कामे सामान्य संगणकांसाठी अत्यंत वेळखाऊ ठरू शकतात. महासंगणक अशा कामांना मोठ्या वेगाने हाताळू शकतो.

‘परम प्रज्ञा’चे वैशिष्ट्य म्हणजे तिची रचना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माहिती विज्ञानाच्या आधुनिक गरजा लक्षात घेऊन करण्यात आली आहे. मोठ्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रारूपांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रचंड संगणकीय क्षमता आवश्यक असते. एखाद्या भाषेचे प्रारूप तयार करताना त्याला कोट्यवधी वाक्ये, शब्द, ध्वनिमुद्रण, चित्रे आणि इतर माहितीवर प्रक्रिया करावी लागते. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गणना आवश्यक असते. ‌'परमप्रज्ञा‌'सारख्या उच्च कार्यक्षमतेच्या संगणकीय प्रणालीमुळे संशोधकांना अशी कामे अधिक वेगाने करता येऊ शकतात.

या प्रणालीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी आवश्यक असलेले वेगवान प्रक्रिया घटक, चित्र प्रक्रिया करणाऱ्या प्रक्रिया प्रणालींचे समूह आणि मोठ्या प्रमाणातील माहिती साठविण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे मोठ्या माहिती संचाचे विश्लेषण, खोल शिक्षणावर आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता प्रारूपांचे प्रशिक्षण आणि गुंतागुंतीची वैज्ञानिक गणिते यासाठी तिचा वापर करता येईल. ‌'परमप्रज्ञा‌'चा उपयोग संगणकशास्त्रापुरता मर्यादित न राहता अभियांत्रिकी, माहिती विज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जैवतंत्रज्ञान आणि इतर आंतरशाखीय संशोधनासाठीही तिचा उपयोग होऊ शकतो.

हवामान आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात या क्षमतेचा मोठा फायदा होऊ शकतो. वैद्यकीय संशोधनातही ‌'परमप्रज्ञा‌'सारख्या महासंगणकांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. नवीन औषध विकसित करण्यासाठी हजारो संयुगांचा अभ्यास करावा लागतो. त्यातील कोणते संयुग विशिष्ट रोगावर परिणामकारक ठरू शकते, याचा अंदाज संगणकीय पद्धतीने घेता आला, तर संशोधनाचा वेळ आणि खर्च कमी होऊ शकतो. मानवी शरीरातील गुंतागुंतीच्या जैविक प्रक्रियांचे संगणकीय नमुने तयार करून त्यांचा अभ्यास करण्यासही मदत मिळू शकते. अभियांत्रिकी क्षेत्रात प्रत्यक्ष उत्पादन करण्यापूर्वी संगणकावरच एखाद्या वस्तूची रचना आणि तिची कार्यक्षमता तपासता येते. विमान, वाहन, यंत्रसामग्री किंवा मोठ्या औद्योगिक संरचनांची त्रिमितीय प्रारूपे तयार करून त्यांची सुरक्षितता तपासता येते. त्यामुळे प्रत्यक्ष नमुना तयार करण्यासाठी लागणारा वेळ आणि खर्च कमी होण्यास मदत होईल.

एखाद्या यंत्रावर विविध परिस्थितींमध्ये किती ताण येतो, ते कसे वागते आणि कुठे दोष निर्माण होऊ शकतो, याचेही संगणकीय अनुकरण करता येते; मात्र महासंगणकांचा प्रभावी वापर करण्यासाठी प्रशिक्षित संशोधक, दर्जेदार माहिती, आवश्यक सॉफ्टवेअर आणि सातत्यपूर्ण संशोधनाची परिसंस्था निर्माण करावी लागते. संगणकीय शक्ती उपलब्ध असूनही तिचा वापर करणारे कुशल मनुष्यबळ कमी असेल, तर अपेक्षित परिणाम साध्य होणार नाही. त्यामुळे ‌'परमप्रज्ञा‌'च्या स्थापनेसोबतच विद्यापीठे, संशोधन संस्था, उद्योग आणि नव्या तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या तरुण संशोधकांना या सुविधेचा व्यापक वापर करता येईल, अशी व्यवस्था उभी करणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT