Teaching equality to children | मुलाला समानतेची दीक्षा देण्याचा दिवस 
संपादकीय

Teaching equality to children | मुलाला समानतेची दीक्षा देण्याचा दिवस

पुढारी वृत्तसेवा

प्रवीण टाके, उपसंचालक, विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर

उद्या 8 मार्च, जागतिक महिला दिन. स्त्री-पुरुष समानतेसाठी घराघरांतील मुलींना नव्हे, मुलांना लिंग समानतेचा संदेश देण्याची आज खरी गरज आहे.

जागतिक महिला दिन. हा केवळ साजरा करण्याचा दिवस नाही, तर आत्मपरीक्षणाचा, नव्या संकल्पांचा आणि पुढच्या पिढीसमोर नवा आदर्श ठेवण्याचा दिवस आहे. समाज परिवर्तनाच्या वाटचालीत स्त्री-पुरुष समानतेचा विचार हा केवळ घोषवाक्य न राहता तो घराघरांत कृतीत उतरला पाहिजे. त्यासाठी पुरुषांच्या तुलनेत महिलांनी काकणभर पुढे सहभाग नोंदवला पाहिजे. त्यासाठी घरातील मुलींना नव्हे, मुलांना लिंग समानतेचा संदेश देण्याची आज खरी गरज आहे. भारतीय समाजात पितृसत्ताक विचारांचा पगडा अद्यापही दिसून येतो. मुलाने कसे वागावे, मुलीने कसे वागावे, कोणते कपडे योग्य आणि कोणते अयोग्य, असे पूर्वग्रह अजूनही आहेत. ते राहू नयेत यासाठी गरजेचे आहे शिक्षण, संवाद आणि आधुनिक द़ृष्टिकोन. आजच्या नवशिक्षित व अशिक्षित मातांनीही नव्या समाजनिर्मितीसाठी आपले हे दायित्व समजून घेणे म्हणजे महिला दिन साजरे करणे होय.

लहानपणापासून ‘हे मुलांचे काम, हे मुलींचे काम’ असे शिकवले तर मनावर लिंगभेदाचे ठसे उमटतात. आईला पाणी हातात मागणारी, आंघोळीनंतर स्वत:ची चड्डी-बनियनही धुवायला लावणारी पिढी अजूनही अस्तित्वात आहे. ही संस्कृती लिंगभेद कधीही नष्ट करणार नाही. सहशिक्षण आणि परस्पर आदराची जाणीव ही समतेची पहिली पायरी आहे. ‘आपली मैत्रीण ही कुणाची तरी बहीण आहे’ आणि ‘आपल्या बहिणीलाही मित्र असू शकतो’ ही सहज आणि सन्मानपूर्वक मान्यता देणे, ती मुलांमध्ये रुजविणे आवश्यक आहे. मुलगा आणि मुलगी यांच्यात कोणताही भेद न करता दोघांनाही समान प्रेम, समान शिस्त, समान जाणीव आणि समान संधी देणे हे आईच्या हातात आहे. मुलांना निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेणे, मुलींना स्वतःचे मत मांडण्याचे स्वातंत्र्य देणे, महिलांप्रती मुलांमध्ये आदर निर्माण करणे, या कृतीतून समतेचा पाया मजबूत होतो. मुलींसोबत कसे वागावे याचे बाळकडू प्रत्येक घरातील आईनेच देणे महत्त्वाचे आहे. घरातून लिंगभेद नाकारला, कृतिशील वस्तुपाठ अंमलात आला तर ‘निर्भया’ प्रकरणासारख्या घटना देशात घडणार नाहीत. या पायाभरणीची शपथ घेण्याचाही हा दिवस आहे.

संपत्ती आणि वारसा या संदर्भातही समानतेची जाणीव रुजवणे आवश्यक आहे. ‘बायकांना व्यवहारात ठेवू नये’, ‘महिलांना व्यवहारातले काय कळते’ या पूर्वापार अंधश्रद्धांना दूर करण्याचा आजचा दिवस आहे. शेतीच्या काही गुंठ्यांसाठी सही करण्यापुरती बहिणीची भूमिका मर्यादित नाही. लहानपणापासूनच मुलींना आर्थिक साक्षरता, मालमत्तेची जाणीव, स्वावलंबनाचे शिक्षण देणे ही नव्या समाजव्यवस्थेची गरज आहे. यासाठी स्वतः आईने या समान हक्काची पेरणी लहानपणीच करायला हवी. कार्यालयातील महिलांच्या पेहरावावर, त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर उपरोधिक टिप्पणी करणे थांबवले पाहिजे. असे करणे अपमान तर आहेच; पण आपल्यातील समतेच्या शिक्षणातील उणीवही दर्शवते.

भारतात अशी परिस्थिती निर्माण व्हावी की, अर्ध्या रात्री एकटा जाणारा मुलगा आणि एकटी जाणारी मुलगी या दोघांच्या सुरक्षिततेत कोणताही फरक उरू नये. ही सुरक्षितता केवळ कायद्याने नव्हे, तर संस्कारांनी निर्माण होते. मुलगा आणि मुलगी यांच्यातील अंतर कमी करून, त्यांना समानतेचे आणि सहजीवनाचे मूल्य शिकवूनच हा बदल साध्य होईल. स्वीडन, नॉर्वे, फिनलँड या देशांमध्ये पालकत्व रजेचे धोरण स्त्री-पुरुष दोघांसाठी समान आहे. त्यामुळे मुलांची जबाबदारी केवळ आईची हा समज आपोआप कमी झाला. आईसलँडने समान कामासाठी समान वेतन हा कायदा कठोरपणे अंमलात आणला. न्यूझीलंडने राजकीय नेतृत्वात महिलांचा सक्रिय सहभाग वाढवून सामाजिक दृष्टिकोनात बदल घडवून आणला. घराघरातील मुलांना लिंग समानतेचा संदेश वागण्यातून आणि संस्कारांतून देऊया. हीच खरी महिला दिनाची सार्थकता ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT