महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर अनेक आश्चर्याचे धक्के बसले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेने निकाल कमी लागला. पैकीच्या पैकी गुण मिळविणार्यांच्या संख्येत घट झाली. गुणांचा टक्का घसरला. पण, सर्वात धक्कादायक म्हणजे मराठी भाषेत 94 हजार विद्यार्थी नापास झाले. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. महाराष्ट्रात शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत 94 हजार विद्यार्थी नापास होतात, ही अतिशय चिंतेची आणि महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारी गोष्ट आहे. या आकडेवारीने राज्यात मराठी भाषेच्या उन्नतीसाठी जे आग्रही असतात, त्यांना जबर धक्का बसला आहे.
दहावीच्या परीक्षेला यंदा नियमित, खासगी आणि पुनर्परीक्षा देणारे असे सर्व मिळून 16 लाख 14 हजार विद्यार्थी बसले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेने सर्वच आघाड्यांवर निकाल कमी लागला आहे. गेल्या वर्षी 94.10 टक्के निकाल होता, यंदा 92.09 टक्के लागला आहे. गेल्या वर्षी शंभर टक्के गुण मिळविणारे 211 होते, यंदा ही संख्या 179 आहे. 90 टक्केपेक्षा जास्त गुण मिळविणारे गेल्या वर्षी 81 हजार 809 होते, यंदा ही संख्या 65 हजार 279 आहे. गुणवत्ताधारकांची संख्या यंदा कमी झालीच आहे; पण 35 ते 60 टक्के या दरम्यान गुण मिळविणार्या विद्यार्थ्यांची संख्या मात्र गेल्या वर्षीपेक्षा बरीच वाढली आहे. गेल्या वर्षी 35 ते 60 टक्के गुण मिळविणारे विद्यार्थी 4 लाख 95 हजार 109 (33.29 टक्के) होते. यंदाच्या वर्षी ही संख्या 5 लाख 44 हजार 226 (37.34 टक्के) आहे. निकालाची घसरण ही महाराष्ट्राला मुळीच भूषणावह नाही. मराठी विषयात नापासांची संख्या एक लाखाकडे झेपावणारी असेल तर शाळा, शिक्षक, पालक, शिक्षण मंत्रालय या सर्वांनाच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.
राज्य शिक्षण मंडळ एकूण 35 विषयांची परीक्षा घेते. एवढ्या विषयांची परीक्षा घेण्याचा बोजा अन्य कोणत्याही राज्यातील शिक्षण मंडळावर नसावा. राज्यात सुरुवातीपासूनच रोजगारासाठी उत्तर तसेच दक्षिण भारतातील विविध भाषिक नागरिक नोकरी, व्यवसाय, व्यापार, रोजगार या निमित्ताने येतात. अन्य राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्रात पायाभूत सेवा सुविधा चांगल्या आहेत. कायदा सुव्यवस्था चांगली आहे. शिक्षण, आरोग्य सेवा व्यापक आहे. विशेष म्हणजे भविष्य घडविण्यासाठी महाराष्ट्र हे सुरक्षित राज्य आहे. म्हणून बाहेरून आलेले लोक परत आपल्या राज्यात न जाता या राज्यात स्थायिक होतात. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, सिंधी, तेलगू अशा भाषा माध्यमांतून राज्य शिक्षण मंडळ परीक्षा घेत असते. दरवर्षी हिंदी, उर्दू, इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या लक्षणीय वाढत आहे. मराठी विषयाचा निकाल पाहता विद्यार्थी अभ्यास करीत नाहीत, शिक्षक मनापासून शिकवत नाहीत की नव्या पिढीला मराठीविषयी प्रेम आणि आपुलकी नाही? असे प्रश्न उपस्थित होतात.
अभिमान मराठीचा किंवा ‘आम्ही मराठी’ या नावाने अनेक मराठी संस्था, संघटना मराठी भाषेसाठी चळवळ करीत असतात. मराठीवर अन्याय होऊ नये व महाराष्ट्रात मराठीची गळचेपी होऊ नये म्हणून अनेक संघटना, राजकीय पक्ष सतत आवाज उठवत असतात. मग या राज्यात मराठी विषयात एवढ्या मोठ्या संख्येने मुले नापास होतात, याला जबाबदार कोण? मराठी विद्यार्थी मराठी भाषेतच नापास होत असतील तर चूक कोणाची आहे? मराठीचा अभ्यास करायला, मराठीचा सन्मान राखायला किंवा मराठीचा अभिमान बाळगायला आपल्याला वेळ नाही की परीक्षेतील मराठी विषयाचे शिक्षक, पालक व विद्यार्थांना गांभीर्य वाटत नाही? दहावीच्या परीक्षेत 35 विषयांपैकी बारा विषयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
प्रथम भाषा म्हणून मराठीची निवड करणार्या 10 लाख 87 हजार 699 पैकी 80 हजार 803 विद्यार्थी म्हणजेच 7.42 टक्के विद्यार्थी नापास झाले. गेल्या वर्षी प्रथम भाषा मराठी घेऊन 10 लाख 85 हजार 176 जणांनी परीक्षा दिली होती, पैकी 63 हजार 658 (5. 86 टक्के) नापास झाले होते. यंदा नापासांचे प्रमाण वाढले आहे. द्वितीय किंवा तृतीय भाषा म्हणून निवड केलेल्या 4 लाख 13 हजार 917 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी मराठीत 13 हजार 741 जण नापास झाले. द्वितीय किंवा तृतीय म्हणून गुजराती, संस्कृत, अरेबिक अशा अन्य भाषांची ज्यांनी निवड केली त्यांचा निकाल उत्तम लागला. मग मराठीची घसरण का व्हावी? इंग्रजी माध्यमांचा ओढा वाढला आहे; पण अशा शाळेत गेलेल्या मुलांना धड इंग्रजी येत नाही व मराठीही त्यांची कच्ची असते असे सर्वेक्षणातून आढळून आले आहे.
महाराष्ट्रात विद्यार्थी पटसंख्या कमी होत असल्याचे कारण पुढे करून मराठी शाळा दरवर्षी धडाधडा बंद होत आहेत आणि दुसरीकडे दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात हजारो विद्यार्थी नापास होत आहेत. दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन, महाराष्ट्र दिन, मराठी अभिजात दिन, असे तीन मराठीचे उत्सव आपण साजरे करतो; पण ते केवळ दिखावू राहणार असतील तर मराठीला कसे सावरणार? मराठी भाषा हे फक्त संवादाचे माध्यम नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीची, इतिहासाची आणि अस्मितेची ओळख आहे. त्यामुळे मराठी विषयातील वाढती नापासांची संख्या ही केवळ शैक्षणिक अपयश नसून, सामाजिक चिंतेचाही विषय आहे. शाळांमध्ये मराठी वाचन, लेखन आणि संभाषण यावर अधिक भर देण्याची गरज आहे. पालकांनीही मुलांमध्ये मराठी भाषेविषयी आत्मीयता निर्माण केली पाहिजे. डिजिटल युगात इंग्रजीचे महत्त्व मान्य असले, तरी मातृभाषेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
शासनाने मराठी शिक्षकांचे प्रशिक्षण, अभ्यासक्रमातील बदल आणि भाषिक उपक्रम यावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. मराठी शाळांचे अस्तित्व टिकविण्यासाठी ठोस धोरण आखले गेले पाहिजे. मराठी भाषा टिकवायची असेल, तर तिचा वापर केवळ भाषणांपुरता किंवा उत्सवांपुरता मर्यादित ठेवून चालणार नाही. विद्यार्थ्यांच्या मनात मराठीविषयी प्रेम, अभिमान आणि आत्मीयता निर्माण झाली, तरच भविष्यात मराठी भाषा अधिक सक्षमपणे टिकून राहील. अन्यथा मराठीचा गौरव केवळ घोषणांमध्ये राहील. मराठीचे जतन करण्याची भाषा आपण करत राहू आणि प्रत्यक्षात मात्र मातृभाषेची पकड हातातून निसटत जाईल.