संपादकीय

पर्यटनाची गर्दी

Arun Patil

मावळत्या वर्षाला निरोप देण्याची लगबग सर्वत्र सध्या सुरू आहे. 31 डिसेंबरचा सूर्य मावळेल, तेव्हा आपण कुठल्यातरी समुद्रकिनार्‍यावर असले पाहिजे, ही एक नवीनच प्रथा देशभरात सुरू झालेली आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याला तसा 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे; पण तुलनेत कोकणात गर्दी कमी आणि भौगोलिकद़ृष्ट्या टिचभर असलेल्या गोव्यामध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी, हे नेहमीचे द़ृश्य झालेले आहे. किती बरे ती हौस म्हणायची? एरव्ही वर्ष संपलं तर तुमच्या-आमच्यासारख्या सामान्य लोकांच्या आयुष्यात फारसा काही बदल होणार नसतो. तेल, तूप, डाळीचे भाव कमी होणार नसतात की, साखर, दूूध स्वस्त मिळणार नसते. तरीही उत्साह मात्र मानला पाहिजे. या सगळ्याचा परिणाम म्हणजे, कोकण आणि गोव्याच्या दिशेने जाणार्‍या सर्व रस्त्यांवर आतापासूनच प्रचंड गर्दी झाली आहे. पर्यटन याद़ृष्टीने विचार केला, तर स्थानिक लोकांसाठी खूप चांगली बाब आहे; पण वाहतुकीचा विचार केला, तर दहा किलोमीटरच्या रांगा सर्वत्र लागलेल्या आहेत.

नुकत्याच मुंबईकडून गोव्याकडे जाणार्‍या रस्त्याच्या दिशेवर असणार्‍या घाटांमध्ये वाहनांच्या तीन-तीन, चार-चार तास लागणार्‍या रांगा लागलेल्या होत्या. एवढी प्रयत्नांची पराकाष्ठा करून समुद्रकिनार्‍यावर पोहोचणे आणि सूर्य मावळताना आणि पुढे रात्रभर मादक द्रव पदार्थ पिऊन नाच करणे म्हणजे एन्जॉयमेंट, अशी व्याख्या झालेली आहे. ही मजा करण्यामध्ये फक्त तरुणाईच नव्हे, तर मध्यमवयीन लोकसुद्धा आघाडीवर आहेत. या आनंद उत्सवामध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिलासुद्धा सर्वच प्रांतांमध्ये आघाडीवर आहेत. नृत्य झाले की, रील्स तयार केल्या जातात आणि लगेच त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर पोहोचत असतात. या लोकांची वर्षअखेरची ही धमाल बघण्यासारखी असते.

31 डिसेंबर साजरा करण्याची वेळ येते, तेव्हा भारतभर सर्वत्र थंडी असते. थंडी म्हणजे पर्यटनाचा मोसम. तसा हिवाळा सर्व प्राणिमात्रांना आरोग्यदायी समजला जातो. पचन संस्था नीट काम करत असते, एरव्ही येणार्‍या घामापासून सुटका झालेली असते. दिवस लहान आणि रात्र मोठी असते. याचा अर्थ किरकोळ होणारे सर्दी-पडसे सोडले, तर हिवाळा हा अत्यंत आरोग्यदायी आणि सुखावह असा ऋतू आहे, हे आपल्या लक्षात येईल. साहजिकच, 31 डिसेंबर हिवाळ्यात येत असल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. 'पाऊले चालती पणजीची वाट' असे म्हणत दक्षिण गोवा आणि उत्तर गोवा पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेलेला असतो. काही प्रमाणात कोकणातील समुद्रकिनार्‍यांवरही आता खूप गर्दी व्हायला लागली आहे.

मुंगीच्या पावलांनी सरकणारी या काळातील वाहतूक पाहता नेहमीची स्थळे पर्यटनासाठी शोधण्यापेक्षा जिथे फारशी गर्दी नाही अशी स्थळेही शोधता येतील. याचे कारण म्हणजे गर्दीतून वाट काढून तुम्ही त्या लोकप्रिय पर्यटनस्थळावर पोहोचलात, तर तिथे तुमचे स्वागत करायला गर्दीच असणार आहे. या काळामध्ये हॉटेलचे दर आणि एकंदरीतच सर्व भाव वाढलेले असतात.

त्यापेक्षा ऑफ बीट म्हणजे निसर्गरम्य असणार्‍या; परंतु फारशी लोकांना माहिती नसणारी ठिकाणे शोधली पाहिजेत आणि तिथे गेले पाहिजे, तरच हे पर्यटन सुखावह होऊ शकते. नाही तर दरवर्षीप्रमाणे 'येरे माझ्या मागल्या' म्हणत लाँग वीकेंडला सुट्टीवर जायचे आणि गर्दी आणि ट्रॅफिक जामचा अनुभव घेत कसेबसे घरी परत यायचे, हे टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पर्यटन म्हणजे निखळ आनंद देणारी गोष्ट आहे; पण सुट्ट्यांमुळे ट्रॅफिक होत असल्याचे काहीसा त्रास सहन करावा लागतो.

SCROLL FOR NEXT