राजेंद्र उट्टलवार
नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे कंपनीतील भीषण स्फोटात 23 कामगारांचा मृत्यू झाल्याने औद्योगिक सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्याचवेळी नागपूरच्या माजी महापौर मायाताई इवनाते यांची राज्यसभेवर निवड आणि नवनीत राणा यांच्या नाराजीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी कंपनीच्या भीषण स्फोटात 23 कामगारांचा मृत्यू झाला. अनेक गंभीर जखमी महिला कामगार अद्यापही खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनेपूर्वी गेल्या दीड वर्षात 47 कामगारांचे विविध कंपन्यांतील स्फोटांत बळी गेले आहेत. ही नक्कीच चिंतेची बाब आहे. 15 दिवसांपूर्वी रविवारी सकाळी सहा वाजता नेहमीप्रमाणे सर्व कामावर आले असताना साडेसातच्या सुमारास डीटोनेटरच्या स्फोटात, भीषण आगीत या कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. डीएनए माध्यमातून ओळख पटविण्याची, होळीच्या दिवसात गावागावांत अंत्यसंस्काराची नातेवाईकांवर वेळ आली. अनेकजण अजूनही आपली पत्नी, आपली मुलगी घरी परत येईल या भाबड्या आशेने डबडबलेल्या डोळ्यांनी प्रतीक्षा करीत आहेत. मुळात असे किती स्फोट होणार आणि किती जणांचे हकनाक बळी जाणार, हा यक्ष प्रश्न या स्फोटाने पुन्हा एकदा उपस्थित केला आणि अनुत्तरित ठेवला आहे.
शासन, कंपनी व्यवस्थापनातर्फे मृतांच्या नातेवाईकांना 82 लाख आणि जखमींना 25 लाखांची मदत दिली जात असली, तरी कुणाच्याही कुटुंबातील अनमोल जीवापुढे ती कवडीमोलच नाही का? यामुळेच आता एसबीएलसारख्या भीषण स्फोटाची पुनरावृत्ती नको, अशा सुधारणांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर दिला आहे. अतिज्वलनशील स्फोटकांची हाताळणी स्वयंचलित पद्धतीने करता येईल का, हे तपासण्याची गरज अधोरेखित केली. 2008 चे नियम आज 2026 मध्ये फारसे उपयुक्त नाहीत, या मर्मावर बोट ठेवत यासंदर्भात एक अभ्यासपूर्ण अहवाल केंद्र सरकारकडे पाठविला जाईल, अशी ग्वाही दिली.
मालक, संचालकांसह 21 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला. 11 जणांना अटक, पोलिस कोठडी दिली गेली. 10 जणांवर देश सोडून जाऊ नये म्हणून नोटीस बजावली गेली. अर्थात, यात मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा झाला, हे उघड झाले आहे. याप्रकरणी कुठे चूक झाली, हे सविस्तर तपासात उघड होणार आहे. भविष्यात असे अपघात होऊ नयेत, यासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व स्फोटकनिर्मिती कंपन्यांचे सेफ्टी ऑडिट होणार आहे. सध्या कंपनीला सील असून कामगारांचे पगार सुरू राहणार आहेत; मात्र पुन्हा जेव्हा सील उघडेल त्यावेळी चित्र बदललेले असेल का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी पुन्हा कामगारांना तिकडे जावेच लागणार आहे.
मायाताई झाल्या खासदार
एकीकडे राज्याच्या अर्थसंकल्पाने विदर्भातील चित्रनगरीसह विविध प्रकल्प,विकासकामांना आर्थिक पाठबळ दिले. दुसरीकडे नागपूरच्या माजी महापौर, आदिवासी नेत्या मायाताई चिंतामण इवनाते या बिनविरोध भाजपच्या राज्यसभेच्या खासदार झाल्या आहेत. अलीकडेच झालेल्या मनपा निवडणुकीत त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या. मनपा अग्निशमन समितीच्या सभापती म्हणूनही त्यांना नुकतीच संधी मिळाली. आता त्यांनी थेट दिल्लीच्या दिशेने आगेकूच केली आहे. यापूर्वी राष्ट्रीय आदिवासी जनजाती आयोग सदस्य, भाजपच्या राष्ट्रीय आदिवासी मोर्चाच्या माध्यमातून त्या राष्ट्रीय पातळीवर कार्यरत होत्या. यामुळेच अनपेक्षित पण कार्यकर्त्यांच्या द़ृष्टीने अनेकांना हा सुखद धक्का म्हणता येईल. यानिमित्ताने आदिवासी समाजाला पक्षाने संधी दिली असून यापूर्वी धनगर समाजाचे नेते पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांना नागपुरातून राज्यसभेची संधी मिळाली होती.
दुसरीकडे राज्यसभेची संधी हुकल्याने नवनीत राणा यांची नाराजी प्रकर्षाने पुढे आली आहे. अमरावती लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या माजी खासदार नवनीत राणा नाराज आहेत. ‘मैं किसी भी मोड से नई शुरुआत कर सकती हूँ’ असे नवनीत राणांनी आपल्या स्टेटसमध्ये म्हटले असून अर्थातच त्यांचा हा भाजपला दिलेला इशारा कुचकामी ठरतो की काही मिळवून देतो, हे येणारा काळच सांगणार आहे.