संपादकीय

Meta YouTube legal case | मेटा, यूट्यूबला नडली 20 वर्षीय कॅले...

पुढारी वृत्तसेवा

तानाजी खोत

गेल्या आठवड्यात तंत्रज्ञान विश्वात एक महत्त्वाची घटना घडली. अमेरिकेतील एका 20 वर्षांच्या तरुणीने सोशल मीडिया क्षेत्रातील महाकाय कंपन्यांविरुद्ध दिलेला लढा एका ऐतिहासिक निकालासोबत यशस्वी झाला. हा निकाल अशा वेळी आला आहे, जेव्हा जगभरात सोशल माध्यमांच्या सामाजिक परिणामांवरून विशेषतः मुलांच्या सुरक्षेबाबत मंथन सुरू आहे. कॅले असे या मुलीचे नाव आहे. तिचे पूर्ण नाव उघड केले गेलेले नाही. कॅलेचा हा प्रवास एका दिवसाचा नाही. सहाव्या वर्षापासून सोशल मीडिया अ‍ॅडिक्ट झालेल्या कॅलेला अनेक शारीरिक व मानसिक समस्या निर्माण झाल्या. सहाव्या वर्षापासून ती यूट्यूब आणि नवव्या वर्षापासून इन्स्टाग्रामच्या आहारी गेली. तासनतास पडद्यासमोर घालवल्यामुळे तिला किशोरवयातच मानसिक व्याधींनी ग्रासले. अनेकांना वाटले की, हा केवळ वैयक्तिक निर्णयाचा परिणाम आहे. मार्क झुकेरबर्गच्या मेटा किंवा गुगलच्या यूट्यूबला यासाठी जबाबदार धरणे हा निव्वळ वेडेपणा आहे. पण, कॅलेने या परिस्थितीसाठी स्वतःला दोष न देता या टेक जायंटमधील तंत्रज्ञानाला जबाबदार धरण्याचे ठरवले.

कंपन्यांकडे असणारी वकिलांची फौज आणि तांत्रिक पाठबळ पाहता, हा लढा ‘डेव्हिड विरुद्ध गॉलिएथ’ असाच होता; पण कॅलेने न्यायालयात अत्यंत कल्पकतेने आपला युक्तिवाद मांडला. तिने सिद्ध केले की, तिचे व्यसन ही केवळ तिची ‘निवड’ नव्हती, तर ती प्लॅटफॉर्मच्या ‘रचने’चा परिणाम होती. ‘इन्फायनाइट स्क्रोल’, ‘ऑटोप्ले’ आणि सततचे नोटिफिकेशन्स यांसारखे फीचर्स मुलांच्या मेंदूला खिळवून ठेवण्यासाठीच बनवले गेले आहेत, हे तांत्रिक पुरावे तिने न्यायालयासमोर ठेवले. या तांत्रिक बाबी सिद्ध करणे सुरुवातीला अशक्य वाटत होते; पण कॅलेच्या जिद्दीने हे शक्य करून दाखवले. लॉस एंजेलिसच्या न्यायालयाने या कंपन्यांना दोषी धरत 6 दशलक्ष डॉलर्सचा दंड ठोठावला. यातील 70 टक्के रक्कम मेटाने, तर 30 टक्के रक्कम यूट्यूबने द्यायची आहे.

हा निकाल अशा वेळी महत्त्वाचा ठरतोय, जेव्हा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या देशांनी आधीच मुलांच्या सोशल मीडियाबाबत कडक नियमावली लागू केली आहे. या निकालाने सोशल मीडियाच्या सामाजिक परिणामांसाठी या कंपन्यांना उत्तरदायी धरण्याच्या जागतिक मोहिमेला एक मोठे बळ दिले आहे. आता टेक कंपन्यांना ‘आम्ही फक्त माहितीचे व्यासपीठ आहोत’ असे म्हणून हात झटकता येणार नाही. मुलांना व्यसनाधीन करणार्‍या अल्गोरिदमवर आता जगभरातून कायदेशीर दबाव येईल. या प्लॅटफॉर्मच्या वापरामुळे होणार्‍या सामाजिक आणि मानसिक परिणामांची जबाबदारी आता थेट कंपन्यांवर असेल. विविध देशांतील सरकारांना टेक जायंटस्वर नियंत्रण मिळवण्यासाठी एक भक्कम कायदेशीर आधार मिळाला आहे. कॅलेने हे सिद्ध केले की, सत्याची बाजू घेऊन जेव्हा एक व्यक्ती उभी राहते, तेव्हा ती महाकाय साम—ाज्यांनाही उत्तरदायी ठरवू शकते. पण, यातून एक वेगळीच समस्या उद्भवू शकते. तिला मिळालेला भरपाईचा प्रचंड आकडा पाहता असे अनेक खटले उभे राहायला लागल्यास, या कंपन्यांसमोर मोठे संकट उभे राहू शकते. कारण, डिजिटल व्यसनामुळे नुकसान झालेली कॅले ही एकमेव नाही...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT