एकाच अखंड खडकातून कोरलेली बाप्पाची १८ फूट उंच मूर्ती!  
संपादकीय

Ganesh idol : एकाच अखंड खडकातून कोरलेली बाप्पाची १८ फूट उंच मूर्ती!

काळ्या ग्रॅनाइट दगडात साकारलेले अद्‌भुत रूप

पुढारी वृत्तसेवा

बेंगळुरू : दक्षिण भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या बेंगळुरूमधील डोडा गणपती मंदिरामध्ये दररोज हजारो भाविक लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी करतात. कन्नड भाषेत ‘डोडा’ या शब्दाचा अर्थ ‘मोठा’ असा होतो. आपल्या नावाप्रमाणेच या मंदिरात श्रीगणेशाची भव्य आणि विशाल मूर्ती विराजमान आहे. बेंगळुरूच्या ऐतिहासिक बसवनगुडी भागात वसलेले हे मंदिर ‘बुल टेम्पल रोड’वर प्रसिद्ध नंदी मंदिराच्या मागे स्थित आहे. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील बाप्पाची मूर्ती. १८ फूट उंच आणि १६ फूट रुंद असलेली ही प्रचंड गणेशमूर्ती काळ्या ग्रॅनाइटच्या एकाच अखंड खडकातून अत्यंत कौशल्याने कोरून तयार करण्यात आली आहे.

दक्षिण भारतातील ही सर्वात अद्‌भुत आणि भव्य गणेशमूर्ती मानली जाते. एकाच खडकात कोरलेली एवढी मोठी मूर्ती पाहणे हा भाविकांसाठी एक नयनरम्य अनुभव असतो. डोडा गणपती मंदिरातील आणखी एक खास परंपरा म्हणजे देवाला अर्पण केला जाणारा लोण्याचा नैवेद्य. विशेष सणांच्या वेळी आणि उत्सवाच्या प्रसंगी श्रीगणेशाच्या संपूर्ण मूर्तीला तब्बल १०० किलो लोणी लावून विशेष शृंगार केला जातो. देवाला अर्पण केलेले हे लोणी वितळत नाही, हे येथील एक वैशिष्ट्य मानले जाते. पूजेनंतर हेच लोणी भाविकांना पवित्र प्रसाद म्हणून वाटले जाते. काही इतिहासकारांच्या मते, हे मंदिर ब्रिटिशांच्या काळातील असून, या मंदिराचा परिसर अत्यंत ऐतिहासिक आहे. या मंदिराच्या मागे जगातील सर्वात मोठ्या नंदी मूर्तींपैकी एक असलेली ‘बुल टेम्पल’ची नंदीची प्रतिमा आहे. निसर्गरम्य परिसर आणि ऐतिहासिक वास्तुकलेमुळे हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ न राहता पर्यटकांचेही प्रमुख आकर्षण केंद्र बनले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT