Young Entrepreneur Mana Jampala | माना जंपाला 
संपादकीय

Young Entrepreneur Mana Jampala | माना जंपाला

पुढारी वृत्तसेवा

तानाजी खोत

कृत्रिम बुद्धिमत्तेने आज संपूर्ण जगाला कवेत घेतले आहे. हे तंत्रज्ञान किती वेगाने सामान्यांच्या जगण्याला कशी नवी दिशा देत आहे, याचे सर्वात जिवंत उदाहरण सध्या कॅनडातील १२ वर्षांची चिमुरडी माना जंपाला ठरत आहे. ज्या वयात बहुतेक मुले शाळा, गृहपाठ, मैदानी खेळ आणि व्हिडीओ गेम्सच्या दुनियेत रमलेली असतात, त्या वयात माना चक्क स्वतःची ‘एआय’ कंपनी चालवत आहे. तिच्या क्षमतेने, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजही अवाक्‌ झाले आहेत.

कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया येथे राहणाऱ्या मानाने सुरू केलेला 'Voxa' हा एआय आधारित व्हर्च्युअल रिसेप्शनिस्ट प्लॅटफॉर्म सध्या लघू आणि मध्यम उद्योगांसाठी वरदान ठरत आहे. अनेक छोट्या व्यावसायिक किंवा दुकानदारांना पूर्णवेळ रिसेप्शनिस्ट ठेवणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. हीच अडचण ओळखून मानाने हे व्यासपीठ तयार केले. ग्राहकांचे फोन उचलणे, त्यांच्या सोयीनुसार अपॉईंटमेंट निश्चित करणे, व्यस्ततेमुळे राहून गेलेल्या मिस्ड कॉल्सची अचूक नोंद ठेवणे, थेट ऑर्डर्स स्वीकारणे आणि ग्राहकांशी झालेल्या संभाषणाचा संपूर्ण सारांश व्यवसायिकांना उपलब्ध करून देणे, अशी अनेक कठीण कामे हे एआय प्लॅटफॉर्म पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने करते. यामुळे छोट्या व्यावसायिकांनाही आता कॉर्पोरेट कंपन्यांप्रमाणे २४ तास अखंड ग्राहक सेवा देणे शक्य झाले आहे.

मानाचे वडील व्यावसायिक आहेत. त्यांच्या कार्यालयात कर्मचारी वेळेअभावी किंवा कामाच्या गडबडीत सर्व फोन उचलू शकत नसल्याने अनेक ग्राहक परत जात असल्याचे तिने जवळून पाहिले. जर माणसाला मर्यादा असतील आणि एआय हे काम अधिक कार्यक्षमतेने करू शकत असेल, तर व्यवसायाचे होणारे आर्थिक नुकसान सहज टाळता येईल, या एकाच विचाराने तिने एआय डेव्हलपिंगच्या दिशेने पावले टाकली. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी, जेव्हा मुले प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवत असतात, तेव्हा मानाचा एआय क्षेत्रातील प्रवास सुरू झाला होता.

तिने एका कोडिंग कॅम्पमध्ये प्रवेश मिळवला आणि अल्पावधीतच ‘पायथॉन’ सारख्या अवघड संगणकीय भाषेवर प्रभुत्व मिळवले. यानंतर तिची पावले थेट एआय डेव्हलपमेंटकडे वळली. तिने चॅटजीपीटी आणि क्लॉडसारख्या साधनांचा वापर फक्त गृहपाठ करण्यासाठी किंवा तयार कोड कॉपी-पेस्ट करण्यासाठी करते, त्याचा वापर मानाने एका शिक्षकासारखा केला. तिने या साधनांच्या माध्यमातून कोडच्या रचनेमागील विज्ञान समजून घेतले, त्यात सुधारणा केल्या आणि स्वतःचे तंत्रज्ञान विकसित केले. त्यामुळे एआय तिच्यासाठी केवळ एक साधन न ठरता एक उत्तम मार्गदर्शक आणि सहकारी बनले.

‘Voxa’च्या अभूतपूर्व यशानंतर तिने ‘Voxa Agents’ नावाचे आणखी एक क्रांतिकारी व्यासपीठ बाजारात आणले आहे. मानाची ही यशोगाथा एआयमुळे वेगाने बदलणाऱ्या एका नव्या जागतिक व्यवस्थेची नांदी आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत एखादे टेक-स्टार्टअप सुरू करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक, शेकडो अनुभवी अभियंते आणि अद्ययावत पायाभूत सुविधांची गरज असायची. मात्र, आजच्या डिजिटल युगात केवळ तीव्र जिज्ञासा, योग्य मार्गदर्शन आणि एआय साधनांच्या हुशारीच्या जोरावर १२ वर्षांची मुलगीही जागतिक दर्जाची कंपनी उभी करू शकते, हे सिद्ध झाले आहे. माना जंपालाने घेतलेली ही उत्तुंग झेप एआय युगातील बदल बदलत्या वास्तवावर शिक्कामोर्तब करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT