भवानीनगर; पुढारी वृत्तसेवा : कर्दनवाडी (ता. इंदापूर) येथील शेतकरी अनिल थोरात यांच्या संकरित गायीला दोन लाख 11 हजार रुपयांची किंमत मिळाली आहे. पशुधनाला एवढ्या मोठ्या प्रमाणात किंमत मिळण्याची ही पहिलीच घटना आहे. कर्दनवाडी येथील अनिल थोरात यांनी 'बाएफ'निर्मित एचएफ 75 टक्के या गायीच्या वासराचे संगोपन केले होते. वासरू 28 महिन्यांचे झाल्यानंतर त्यांनी या गायीची विक्री केली. त्या वेळी या गायीला दोन लाख 11 हजार रुपयांची किंमत मिळाली.
गाय पहिल्या वेताची असून, पहिल्या वेतामध्ये किमान 28 लिटर दुधाचे उत्पादन देईल, असा अंदाज थोरात यांनी व्यक्त केला. पहिल्या वेतानंतर गाईच्या दुधामध्ये आणखी वाढ होणार आहे. गायीचे संगोपन करताना थोरात यांनी चारा म्हणून ऊस, मका, मक्याचा मुरघास व इतर आवश्यक पेंडीचा खाद्य म्हणून वापर केला. आठ एप्रिल रोजी थोरात यांनी या गायीची विक्री केली. लासुर्णे येथील तुकाराम इंगळे यांनी ही गाय पाहिल्यानंतर गायीला दोन लाख 11 हजार रुपये देऊन खरेदी केली.
दिवसाला दीड हजार रुपयांपर्यंत उत्पन्न
एचएफ गायीच्या जातीमध्ये 35 लिटरपर्यंत दूध देण्याची क्षमता आहे. सध्या गायीच्या दुधाला किमान 40 रुपये भाव आहे. ही जास्त दूध देणारी गायीची जात आहे. दिवसाला दूध उत्पादकाला गायीच्या दुधापासून एक ते दीड हजार रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.