मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा, राजस्थान राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आदमापूर ता. भुदरगड येथील संत सद्गुरु बाळूमामा यांचा 131 वा जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साही धार्मिक वातावरणामध्ये बाळूमामाच्या नावानं चांगभलं चा जयघोष, ढोल कैताळचा गगनभेदी आवाज, भंडाऱ्याची मुक्तहस्ते उधळणीत व पुष्प वृष्टीत संपन्न झाला. बाळूमामाच्या जन्मकाळ सोहळ्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. बाळूमामांच्या मंदिरात, गाभाऱ्यात, समाधीस्थळ व मूर्तीची विविध प्रकारच्या फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती .
बुधवार दि. 25 रोजी पहाटे श्रीं ची नित्य पूजा, अभिषेक,आरती, विना पूजनाने जन्मोत्सव सोहळ्या सुरुवात झाली.विनापुजन राजनंदिनी धैर्यशील भोसले यांच्या हस्ते झाले . सायंकाळी हे.भ.प बाळासाहेब ईश्वरा पाटील यांचे प्रवचन तर हे.भ.प नानासो दत्तात्रय पाटील यांची कीर्तन सेवा झाली. माणगाव येथील धनगरी बांधवांनी ढोल वादन करून, आदमापूर येथील भजनी मंडळाने हरी जागर केला. बाळूमामांचा पाळणा विविध रंगांच्या झेंडूच्या व जरबेरा फुलांनी सजवण्यात आला होता. संपूर्ण मंदिर व कळसावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
बाळूमामांचे निर्वाण स्थळ श्री मरगुबाई मंदिर मधून समाधीस्थळी श्रींच्या आश्वासह भंडारा आणुन. भाविकांनी व सुवासिनी पालखीचे व आश्वाचे औक्षण केले. श्रींचा पाळणा पूजन राजनंदिनी धैर्यशील भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. दि.26रोजी काकड आरती, अभिषेक, समाधी पूजन, धार्मिक विधी पार पडले. दुपारी हे.भ.प.भाऊसाहेब पाटील सेकिन हासुर यांची कीर्तन सेवा झाली. दुपारी 4 वाजून 23 मिनिटांनी श्रींचा जन्मकाळ सोहळा संपन्न झाला. यावेळी श्रींच्या पाळण्यावर भाविकांनी फुलांचा वर्षाव केला. मानकरी राजनंदिनी भोसले व सुवासिनींनी पाळणा पूजन केले. .पाळणा गीत गायले. यावेळी भाविकांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. भाविकांनी बाळूमामाचे व पाळण्याचे दर्शन घेण्यासाठी आणि फुले वाहण्यासाठी गर्दी केली. यावेळी सुंटवडा वाटण्यात आला. त्यानंतर मंदिराभोवती श्रींचा पालखी सोहळा संपन्न झाला. यावेळी धैर्यशील भोसले, दत्तात्रय पाटील, शिवराज नाईकवडे,हजारों भक्त उपस्थित होते. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.