पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाने SAFF चॅम्पियनशिपची सुरूवात विजयाने केली. बुधवारी (दि. २१ जून) स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ४-० अशा गोल फरकाने पराभव केला. हा सामना बंगळरूच्या श्रीकांतीरवा स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्याचा हिरो ठरला तो म्हणजे भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्री. त्याने चमकदार कामगिरी करत पाकिस्तानवर गोलचा पाऊस पाडला. सामन्यात छेत्रीने हॅट्ट्रिक केली. त्याच्याशिवाय उदांता सिंगने एका गोलची नोंद केली. (SAFF Championship 2023)
भारतीय संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक चाली रचत पाकिस्तानवर दबाव ठेवला होता. हा दबाब पाकिस्तानी बचावफळी फारकाळ सहन करू शकली नाही. भारतीय कर्णधार सुनील छेत्रीने सामन्याच्या १०व्या मिनिटाला पहिला गोल केला. यानंतर १६व्या मिनिटाला पाकिस्तानच्या खेळाडूने टीम इंडियाच्या खेळाडूला अवैधरित्या अडवल्यामुळे टीम इंडियाला रेफ्रींनी पेनल्टी किक बहाल केली. या संधीचा फायदा घेत छेत्रीने दुसरा गोल नोंदवला.
मध्यंतरापर्यंत स्कोअर २-० असा टीम इंडियाच्या बाजूने होता. टीम इंडियाने पहिल्या उत्तरार्धातील आक्रमक खेळी दुसऱ्या उत्तरार्धातही सुरू ठेवली. टीम इंडियाच्या खेळांडूनी केलेल्या शानदार खेळीमुळे पाकिस्तानी खेळाडू चकित राहिले.
सामन्याच्या ७४व्या मिनिटाला पाकिस्तानच्या खेळाडूने छेत्रीला डेंजर झोनमध्ये अवैधरित्या पाडल्यामुळे पुन्हा एकदा टीम इंडियाला पेनल्टी देण्यात आली. या सुवर्णसंधीचा फायदा घेत छेत्रीने गोंल नोंदवत आपली हॅट्रिक साजरी करत संघाला भक्कम आघाडी मिळवून दिली. छेत्रीनंतर उदांता सिंगने ८१व्या मिनिटाला जोरदार फटका मारत गोल करत ४-० आघाडी मिळवून दिली.
सामन्याच्या दोन्ही उत्तरार्धात पाकिस्तानच्या खेळाडूंनी टीम इंडियाची आघाडी करण्यासाठी आक्रमक खेळी केली. यासह त्यांनी अनेक चाली रचत टीम इंडियाची बचावफळी बेदण्याचा प्रयत्न केला. परंतु, टीम इंडियाच्या बचावपटूंनी केलेल्या शानदार खेळीमुळे पाकिस्तानच्या खेळाडूना पूर्ण वेळेत टीम इंडियाची बचावफळी भेदता आली नाही. यासह टीम इंडियाने पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवला.
SAFF चॅम्पियनशिपच्या १४ व्या आवृत्तीत सहभागी होणाऱ्या आठ संघांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. अ गटात भारतासह कुवेत, नेपाळ आणि पाकिस्तानचा संघ आहेत. तर ब गटात लेबनॉन, मालदीव, भूतान आणि बांगलादेश यांचा समावेश आहे.
सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या स्पर्धेतील फिफाचा सर्वोत्तम मानांकित संघ आहे. फिफा क्रमवारीत टीम इंडिया १०१ व्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेत खेळणाऱ्या संघांमध्ये पाकिस्तान हा संघ तळातील संघ आहे. फिफा क्रमवारीत पाकिस्तान १९५ व्या स्थानावर आहे
सामन्यात पाकिस्तानी खेळाडू टीम इंडियाने टाकलेल्या दबावाचा सामना करू शकले नाहीत. सामन्या दरम्यान त्यांचा संयम सुटला आणि त्यांनी भारतीय प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वास्तविक, जेव्हा चेंडू भारतीय प्रशिक्षकाकडे गेला. तेव्हा ते बॉल पाकिस्तानी खेळाडूपासून दूर नेण्याचा प्रयत्न करत होते.
हे पाहून पाकिस्तानच्या अब्दुल्ला इक्बालचा संयम सुटला आणि त्याने स्टीमॅकशी वाद घालण्यास सुरुवात केली. हे पाहून अनेक पाकिस्तानी खेळाडूंनी स्टिमॅक यांना घेरले. एवढेच नाही तर पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक शहजाद अन्वर यांनीही भारतीय प्रशिक्षकाशी वाद घालण्यास सुरुवात केली.
या वादावार कठोर निर्णय घेत रेफ्रींनी भारतीय प्रशिक्षक स्टिमॅक यांना रेड कार्ड दाखवून सामन्यातून बाहेर काढले. रेफ्रींनी पाकिस्तानी संघाला थ्रो देण्याचा निर्णय घेतल्याने स्टिमॅक निराश झाले होते.
हेही वाचा;